प्रकार- मुक्तछंद
शीर्षक -माणुसकीच्या शोधात...
माणुसकी म्हणजे.....
एक अनामिक सुगंधाचा दरवळ
सहजता मुक्त अशी
शुद्ध स्नेहाची गुंफण अन्
कर्तव्याची संधी
जी करविते प्राप्ती मोक्षाची......
धर्मग्लानी हा तर महिमा
कलियुगाच्या फेऱ्यांचा
विकारांनी ग्रासलेले, भारलेले मन
विश्वासाचे कोंडलेले श्वास नि
तडकलेली बंधने काचेसमान...
नीतीमूल्यांच्या उरावर
विकृतीची वादळे
नि उफाळत्या ज्वालेसम
अवचित जागणार्या भेसूर वासना....
या सर्वांमध्ये कुठे हरवली असेल माणुसकी?
या शोधातच पालथी घातली गावेच्या गावे...
पण भेटले फक्त मुखवटे स्वार्थाचे
आणि भ्रष्टाचाराच्या बेटावर वास करणारे
अहंकारांच्या भग्न शिळांवर बिभत्स हास्य करणारी
छाती बडवत मस्तीत दंग....
त्यांच्याच बंद मुठीत
चिरडली जात असावी
कदाचित् माणुसकीही
असे भासत होते मला कुठेतरी...
किड्यामुंग्यांसारखी खचाखच भरलेली माणसे....
माणुसकीची शालीन वस्त्रे उतरवून.....
षड्विकारांची
चमचमीत तोकडी कापडं घालून
मायानगरीमध्ये....
आंतरजालाच्या भयंकर विळख्यात गुंतलेली.....
अन त्यातून पुन्हा सुटका व्हावी
असा मानसही नसलेली...
कोणते वळण आहे हे जीवनातले?
माणुसकी शिकवण्याची वेळ आली माणसालाच
पुढच्याच पिढीला "माणुसकी" हा शब्द
शब्दकोशात पाहण्याची वेळ येऊ नये
म्हणजे पावलं......
का वागू नये माणसाने माणसासारखं?
कित्येकदा या प्रश्नाने मन विच्छिन्न होते
अन् वादळांची काहूरं उठतात मनात
नि तोडू पाहतात माझ्यातल्या मलाच..
दूरदूरवर विचारांच्या गावात
नाहीच मिळत मला उत्तर या प्रश्नाचे....
कुठे करावी स्पर्धा?
ही सद् सद् विवेकबुद्धीही
वापरायची तारतम्य नसलेली..
बुडत्याला हात देण्याऐवजी...
मनमुरादपणे त्याच्यासह सेल्फी काढत बसणारी
किती सहज सोपं आहे हे!
मग पाणी तरी कुठे मुरतयं?
या धरेवरच स्वर्ग अवतरेल
पण हे का इथे कुणाला कळतंय?...
एकतर मनमस्तिष्काचं साधर्म्य असावं
वा त्याने गावही न पुसावं माणुसकीचं......
चला. ..
सारे भेद विसरून
निरागस फुलपाखरांसारखं बागडूया
निसर्गमातेच्या कुशीमध्ये
राहूया.... माणूस म्हणून ....
कोमेजलेली माणुसकी आपसूकच उमलेल पुन्हा....
हळूच हृदयोद्यानातून....
आतून...
खूप खूप खोलातून......
रचना
©शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड