युगप्रवर्तक शिवराय
राजे मनामनातले
त्या गर्द भयाण काळोखी
भयभीत जनता होती
तिमिरास उखडण्यासाठी
वाट फक्त सूर्याची होती...१
तेजोनिधी हिरण्यगर्भाचा
उदय जिजाई मर्दानी पोटी
घडवले अद्भुत वीरोत्तम
संस्कारतेज ओतूनी कोटी... २
स्वराज्य स्वप्न एक पाहिले
स्वयंभूची शपथ घेऊनी
मैत्र मावळे चेतवले
आत्मप्रेरणा जागवूनी... ३
गनिमी काव्याने सारे
मुघलदल चक्रावले
अमुर्त अदम्य साहसी
युक्तीपुढे शक्ती ना चाले... ४
गडकिल्ले शान अनोखी
वैभवीच माय महाराष्ट्राची
आशीर्वत हेच चिलखत झाले
पर्वा नच केली जीवाची... ५
केवळ स्वराज्य होते लक्ष्य
तोवरी मनास नव्हते चैन
आव्हाने पेलली, वादळे झेलली
तयापुढे राजसुखही गौण... ६
सर्वधर्मीय बंधुसम तुम्हा
मायभगिनींचे तारणहार
तुम्हासम होणे नाही आता
युगप्रवर्तक पुन्हा महीवर...७
मायभगिनी भयभीत आज का?
स्वराज्य आपण जे निर्मिले
शिवबा हवा सर्वांना तरीही
जिजाईचे पंख जातात कापले... ८
फक्त जयकार गर्जतो राजं
नीती जाऊ पाहताहे लया
कळकळीने प्रार्थिते यावे एकदा
हे पिसाटलं जन उद्धाराया... ९
मनामनातले राजे आहेत शिवबा
केवळ जयंतीला का आठवावे?
रुजवा, कोरा, तो विचार मनोमन
ठायी ठायी ते अस्तित्व जागावे... १०
रचना
शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द ता गेवराई
जि बीड
दि १९.०२.२०२०
