क्रांतिज्योती साऊ
ज्योती कसली, ती धगधगती
मशाल होती ज्ञानक्रांतीची
तमास हरवले असे तिने की
आभाही लाजली सूर्याची...१
तूफानांचाही हाणून पाडला
डाव अनोख्या ढंगात
बहु साहले, आपदा झेलित
आम्हा रंगवूनी ज्ञानरंगात...२
फुलवले माळरानावरही
खळखळते सुहास्य मुक्त
पंख होऊन विश्वासाचे
दिधले एकीचेही सुक्त...३
असह्य वार छाताडावर
झेलणारी मर्दानी साऊ
तेजप्रभा लोचना दीपवी
चांदण्यात चला गं न्हाऊ... ४
ज्ञानशारदा वंदनीय ती
अज्ञानकोंदणी विद्या उदय
बिथरल्या भेदरल्या कोमलांना
केवळ एकच ती अभय... ५
सावित्री तूच लावलेली ती
पण'ती' आजही सज्ज आहे
रणांगणातील तलवारही
लेखणीपुढती सलज्ज आहे ... ६
जीव तिने जाळला अन्
अक्षरांचे उजळले दिवे
विश्व दीपले, जणू दिवाळी
जग जन्मले पुन्हा नवे ... ७
फुलल्या कलिका स्नेहाने
काव्यफुलेही बहरा आली
अंक अक्षरे गाली हसली
ज्ञानोद्याने मोहरली...८
खेचलीस तू काळोखाची
काजळी अशी गं त्वेषाने
खडबडून जागे झाले जग हे
चपराक दिली तव मौनाने... ९
साऊ तुझ्या लेकी आम्ही
निडर आणि निष्ठावंत
अमृतस्पर्श तुझा लाभता
युगायुगांची नुरली भ्रांत... १०
विश्वास देते पुन्हा एकदा
तुझ्या लेंकींमध्ये तुझी दिसेल छबी
संध्या होणार नाही आता
ज्ञानसूर्य तेवत ठेवू नभी... ११
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द,
ता गेवराई जि बीड
दि. ३.१.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा