कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
कृष्णार्पित काव्यशिल्प लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कृष्णार्पित काव्यशिल्प लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

चाहूल दिपावलीची, झळ महागाईची

 चाहूल दिपावलीची, झळ महागाईची


लगबग चाललेले 

 भादवही  अश्विनही 

  धामधूम उत्सवांत

   अनामिक काहूरही...१


दिवाळीच्या चाहुलीने 

 जगी हर्षाचा वसंत

  माझ्या डोई चिंता भार

   क्षणीकही ना उसंत...२


 विष्णुप्रियेच्या स्वागता

  जळीस्थळी रेलचेल 

   प्रश्न छळती उद्याचे

    मनी माझ्या  घालमेल...३


 दुष्काळ, महागाईची

  झळ केवढी सणाला

   सदाचीच हुरहुर

    जीर्ण माझ्या नशीबाला..४


 आस पिल्लांच्या डोळ्यांची

   उद्या जाईल सुकुनी

     ना फटाके,करंज्या

       तरारेल दुःख मनी...५


आसमंत उजळेल

 लक्ष लक्ष त्या दिव्यांनी

  वाट तुझी मी पाहीन 

   तेज डोळ्यांत आणुनी...६

  

दिवा एक तरी तेवावा

 लक्ष्मी माझ्या गं अंगणी 

  सुख येवो  संसारात 

   माये  तुझ्या पावलांनी...७


रचना

शिल्पा म. वाघमारे

सहशिक्षिका,बीड

सुहास्यखळी

 ही सुहास्यखळी निर्मळ

सहसा आता दिसत नाही

खऱ्या आनंदाची चांदणी

गालावरती खुलत नाही... १


खोलपण हरवलं

खोटं खोटं झालं जन

ओलं शुष्काने गिळली

अहंभावाच्या मस्तीनं...२


काम मिळालं हातांना

दोघे राबतील नेटानं

घास भेटंल पोटाला

आज किती दिवसानं...३


 आज पारावार नाही

सुख मायेना मनात

चिलीपिली हसतील

देव भेटे दगडांत... ४


हे जीणं जरी कष्टाचं

झोप देईल समाधानी

जग नासलं नासू दे

हेच सुख तया खाणी...५


✍🏻रचना

©शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

दि ३०.०३.२०२०

आज दाटले अश्रू नयनी...

 आज दाटले अश्रू नयनी...


धडधडीत जे खोटं बोलतात

स्वार्थात जे सुख शोधतात

मी पणा केवळ मिरवतात

तेव्हा मला राग येतो...१

एकच बाजू ऐकून नित्य

न्याय देण्याचा आव आणतात

स्वतःसच जेव्हा शहाणे जाणतात

तेव्हा मला राग येतो...२

नियम टांगत धाब्यावर

इतरांनाही धोक्यात टाकतात

व्यसनात जेव्हा सुख मानतात

तेव्हा मला राग येतो....... ३


स्वातंत्र्य हिरावून इतरांचे

मुजोरपणा दाखवतात

इतरांच्या जीवनास

आपल्याच बापाची सत्ता मानतात..

तेव्हा मला राग येतो... ४!

माझा राग, माझा असतो

त्यांना फरक पडत नाहीव

अमर स्वतःला मानतात ते

तेव्हा मला राग येतो... 

*आज दाटले अश्रू नयनी*

अशक्य मज का हे थांबवणे 

प्रभो द्यावी ऐसी शक्ती तू

आनंदघन करीन साऱ्यांचे जीणे... 



रचना

© शिल्पा म वाघमारे

स शि बीड

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

माझे बालपण

 माझे बालपण... 


कलिकेसम मृदुल 

सुंदर ते सारे क्षण

निरागस कोवळे

ते सोनेरी बालपण... १


अवखळ चंचल भारी

ना भय ना चिंता कसली

'परी' नव्हते आकाशीची

परी साऱ्यांची लाडली... २


खेळ बाहुल्यांच्या संगे

भातुकलीत रमून जाणे

मधुर सुरांच्या संगे

जगताना जीवनगाणे...३


सदैव वाटे मनात माझ्या 

आसक्ती मोठे होण्याची 

पण मातृकुशीतच होती

सुखे तिन्ही लोकींची... ४


रचना

शिल्पा म वाघमारे

स शि जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द

ता गेवराई जि बीड

दि १४.११. १९

कर्तव्याची दोरी


कर्तव्याची दोरी


आतातरी सोड मित्रा 

अहंभाव जो साचलेला

सांभाळून चाल रणी या

काळ अल्पसा वाचलेला... १


जीवनबाग सुगंधी सुंदर 

माळरानात तू परिवर्तली

इंद्रियसुखापायी राजस

अमृतलता का कुस्करली...२


विकारशैवाली निसरडी

ठेवित चालशी पाऊले

जाणीव ना नरजन्माची

जन्म कित्येक जरी रे सरले...३ 


विसर तुला चालण्याचा

कर्तव्याच्या दोरीवरती

जरी कसोटी अवघड भासे

सुप्तानंद तो, जा पुढती... ४


नको डळमळू, निर्भय हो

कर्तव्य कर्म विस्मरु नको

तारणार या भयाण युगी जे

कसूर तयांत तीळमात्र नको...५


अनासक्त होऊनी सदा तू

कर्म करावे जीवांसाठी

भेदरहित भाव मनाचा

कारण ठरेल तव मोक्षासाठी... ६


रचना

©शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

भ्र क्र ९५२७०५४२०५ 

दि. ५.४.२०

रविवार, ३१ जुलै, २०२२

मौन ते बोलके


 कळी नेणिवांची


ते मौन बोलके होते नि 

अजुनी जे ओठी साठलेले 

भावनांच्या अन् चेतनांच्या

ऊरी करकचून बांधलेले... १


धरणीस तृप्त कराया वेगे

नभ होतसे ना उतारु

त्या संत का न म्हणावे 

मुक्तानंद उधळती जे तरु... २


मी फक्त गाळते अश्रू 

मजला नच काही कळते 

शब्दांत न गुंफता येई

हे मौन मजला छळते...३


अशा कुण्या रे दागिन्यांनी

मढवसी आम्हा नित्य नित्य 

जणू अमृते नहातो वाहतो

कर्म साधते फक्त निमित्त...४


युगे बंद जाहली कैक

कल्पांतही साही वेदना 

मौनातील वेचूनी बोल 

कधी जाणशील का मना...५


शब्दातीत सारे काही 

ही जाणीव खोल जावी 

सल हाय सलते भलती 

कळी नेणिवेची खुलावी...६


रचना

*शिल्पा म.वाघमारे*

सहशिक्षिका

बीड 

बुधवार, १ जून, २०२२

सार्थ इथले येणे... आई


आई


रोज पहाटे जागताच तू

चैतन्य घरास गे लाभते

की उमलता तुझी पापणी

पहाट रोजची जागते... ||१||


रांगोळीत तू अंगणीच्या

सांजवातीत तेवणारी

तूच तुळशीच्या मृदुल

मंजिरींतून गंधाळणारी... ||२||


तवस्पर्शाने न्हाले पियूषी 

चंदनगंधी मी भारले

तुझ्या पावित्र्याचे तेज

नभी चंद्र-तारे ल्याले... ||३||


फांदी माझी वाकलेली

तुझ्या वात्सल्यऋणांनी

साशंकता तुजसामोरी

राहे शून्य शून्य होऊनी... ||४||


श्वास फुंकता शिल्पात

'इथले येणे' जाहले सार्थ 

असीम, निर्व्याज प्रितीचा

'आई' तूच केवळ अर्थ... ||५||


अनुपम निर्मिती तू प्रभूची 

स्वरात्मिका शब्दजगती

मज आभाळ तोकडे माये 

तुझी वर्णावया गं महती... ||६||


आई तुझिया हृदयाकाशी 

विरघळती विकार सारे

चराचरांत मातारुप

रुप 'माऊली' साकारे... ||७||

रचना

©शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खु ता गेवराई जि बीड 

गुरुवार, २४ मार्च, २०२२

अन्न हे पूर्णब्रह्म

 अन्न हे पूर्ण ब्रम्ह


जीवन ध्येय आहे एक

ध्यास घेऊन चालणे व्हावे

जगण्यासाठी अन्नग्रहण

यज्ञकर्म दुजे जाणावे...


सत्त्व रज तम जरी 

सामोरी मांडले तीन 

वरकरणी भुलू नकोस

सात्त्विक घे निवडून... 


अन्न असावे ताजे,

साधे नि सुपाच्य 

पौष्टिकतेची जेथे

पातळी असावी उच्च...


अन्न हे पूर्णब्रह्म 

आहार तसा विचार 

प्राप्ती तेथेच आहे 

जीवन करण्या साकार 


रचना 

शिल्पा म. वाघमारे 

सहशिक्षिका बीड 

दि. 24.03.2022

बुधवार, १६ मार्च, २०२२

जग सुंदर आहे

 जग सुंदर आहे


जग सुंदर आहे

असं बरेच जण म्हणतात

सगळे का म्हणत नाहीत

ते नेमकं काय पाहतात


अनुभवाचे बोल अन्

दृष्टीची सकारात्मकता

जगाचं सौंदर्य दाखवते

चैतन्य नि आत्मियता 


वास्तवाशी नाळ जोडून 

राहता यायला हवं

मातीत पाय घट्ट रोवून 

उगवता यायला हवं


घेऊनिया निरागसता 

फूलं नि पाखरांची

तटस्थता चोरता यावी 

सरिता, वृक्ष लतिकांची


डोळ्यांवरची रुक्ष झापड

काढता यायला हवी 

जग सुंदर आहेच मुळी 

सात्विकाची जाण हवी



रचना

शिल्पा म वाघमारे 

सहशिक्षिका बीड

रविवार, १६ जानेवारी, २०२२

शृंगार मनाचा... हरीनामाचा...

शृंगार मनाचा हरीनामाचा 


फक्त एक नाम तुझे

कानी पडते ज्या क्षणी

तेच डूल शोभते, डुलते

लटकते जणू हिरकणी...१


नामगंधाने मोहरे पवन

 अंगअंगी रोमांच उभे 

नासिकेस का हवी नथ नि

चित्तास शांतता लाभे... २


या अधरांवर, नामबासरी

कृष्णराग अविरत गाते

ओठी, गाली येते लाली

बेगडी शृंगारा लाजविते... ३


तनमन हे रंगले, दंगले

पैंजणाविना हे नाद कसे? 

तुझिया अर्पण 'मी' पण आता

शृंगार दुजा मज ठाव नसे... ४



रचना

श्रीमती. शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका

बीड

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

असे यावे वर्ष नवे


'असे यावे वर्ष नवे' 


मळभ दाटल्या मना कोमला

मलूल प्रेमाची लकेर हवी

स्नेहफुलांचा रंग लेऊनी 

उमलावी गंधपहाट नवी... १ 


नवी नव्हाळी पदोपदी तुज

काल, आज वा असे उद्या 

भिंतीवर चाले लपंडाव जरी

तोच सूर्य अन् तरु, नद्या... २


उषा व्हावी जगी मनाच्या

जाळूनी सल, पेटवू दिवे

कुट्ट जाहल्या, रानी पेटल्या 

नवकिरणांचे येणे व्हावे...३


किती करु माधवा याचना

पुन्हा तेच का पुढती यावे? 

लुप्त होता  विकार, दंभ

'सत्य' नभी चांदणे व्हावे...४


तरी विझेना अनल आतला

एकदाच 'तू' बरसून जावे

आत्मानंदी चिंब होऊनी

माणसा 'माणूसपण' यावे... ५


गीत गावे माझिया धरेने

सूरताल धरावे गगनाने

असे यावे वर्ष नवे की

अमृते भिजावे शब्दाने..६


रचना

शिल्पा म. वाघमारे

सहशिक्षिका

गेवराई,जि. बीड

भ्र. क्र. 9527054205

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

एक झुळूक वाऱ्याची...

 *एक वार्‍याची झुळूक*


एक वार्‍याची झुळूक

नीज देई तान्हुल्यास

जणू कुशीत झुलवी

यशोदाच कान्हुल्यास...१


एक वार्‍याची झुळूक

जशी स्फुर्ती नवी नवेली

यशशिखरे करण्या सर

मन सागराची भरती...२


एक वार्‍याची झुळूक

हळुवार स्पर्शता गाली

देई निरोप साजनाचा

मी गं लाजेत नाहली...३


एक वार्‍याची झुळूक

ओल्या मातीचा दरवळ

तना-मनास पेलेना हा

त्याचा गंधधुंद परीमळ...४


एक वार्‍याची झुळूक

सांगे होई आता रिते

सारा बाजार मायेचा

सांग काय तुझे होते...५


एक वार्‍याची झुळूक

सोडविते मोहमाया

जगण्याचे मर्म दावी

जन्म न जावो हा वाया...६


काव्यरचना

✒️शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

कान्हा तुझ्यासाठी

 कान्हा साजिरा गोजिरा

लळा लावी रुप तुझं

'मी' विरघळला देखता

भान हरवलं माझं... १


सावळ्या घना दाटशी

मनाकाशी सामावून

विषयांचा न लगे ठाव

जाती क्षणांत वाहून... २


किती आळवावं नाम

तृप्त होईना हे मन

संसाराच्या अनलात

पोळतेया सारे तन... ३


तुझा अफाट पसारा 

तेथे माझा काय लाग

तुझ्या एक नजरेसाठी

गाते कान्हा भक्तीराग... ४


धन्य करी माझ्या जीवा

एकवार येऊनीया

श्वास, ध्यास, अन् आस

तुझ्या पायी वाहूनिया... ५

रचना 

शिल्पा म. वाघमारे 

स. शि. मालेगाव खु ता गेवराई जि बीड 



शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

पोटासाठी


       पोटासाठी .... 


कशी जीवनाची माझ्या 

देवा रचली कहाणी 

तुझी लेकरे सारीच

मग मी का दीनवाणी? ... १

भुईलाच थाटलेला

भग्न भकास संसार 

लेकरांच्या भविष्याची

स्वप्ने झाली निराधार...२


पोटातल्या रानी सदा

आगडोंब उठलेले

दुष्काळच छाताडात 

पाजू कशी मी तान्हुले? ... ३


पाणी पीठात कालवी

पाणी डोळ्यांत आणुनी

कधी कोरड्या घशाला

टाकतेया ओलावूनी...४


पोटासाठी तुझ्या माझ्या

रोज नवे करु काय? 

मन धाव घेई नभी

आखडती हात पाय... ५


धनी घालतोय घाव  

लोहावर - भुकेवर

बाळा निजवून शेजी

लावी तया हातभार...६

 

धनी राबतो उन्हात 

समाधान खुले मनी

लोहापरी बळ देई

देवा तयाच्या पदरी...७



रचना

शिल्पा म.वाघमारे

स.शि. जि प प्रा शाळा,

मालेगाव खुर्द

ता गेवराई जि बीड

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

रक्षाबंधन

 रक्षाबंधन

राखी - एक पावन धागा

वचन रक्षणाचे

राखी- एक मर्म

सुखावल्या मनाचे...१


राखी - नाते जपलेले

जन्म जन्मांतरीचे

राखी-भाव स्पर्शलेली

अखंड प्रतिक स्नेहाचे...२


राखी- अविरत जणू सरीता

वाहे गात मेघ मल्हार 

राखी- रिमझिम पावसाची 

मना सुखावती सर...३


राखी - श्वासांचा आधार

मन जेथे वाहे भार

राखी - आनंदी न्हालेलं

सये श्रावणी माहेर...४ 


राखी - नाजुकला बंध

तया स्पर्श निरागस 

राखी- होवो न मलिन 

स्पर्श होऊनी आकस...५


राखी - तेवते नंदादीप

आशा बावरी मनाची

राखी - वाट माहेराची

निखालस आनंदाची...६


रचना 

शिल्पा म. वाघमारे (सहशिक्षिका) मालेगाव खुर्द ता. गेवराई जि. बीड

रविवार, २७ जून, २०२१

पाहिले न मी तुला... देवा

 पाहिले न मी तुला

असे मला का वाटते

अणुरेणूंत नित्य जर

तुझेच रुप थाटते


मी उगाच ताडीते मना

हट्टास कधी पेटते

जीवांत भोवतालीच्या

चैतन्य तुझे नाचते...


आधारास हात आखडे

पाऊल मागे सारते

अन् तरी दर्शनाचे दान

मन वेडे मागते...


कधी सरेल खेळ हा? 

विकारांस जाळू पाहते

कृपादान देई माऊली

सर्वस्व पायी अर्पिते...

शनिवार, २६ जून, २०२१

योगसाधना


योगसाधना 


देह एक देवालय

आत्मा ईश्वर गाभारीचा

शुचिता सात्विकता

हाचि ठेवा आरोग्याचा ... 


नियम निसर्गाचे सारे

पालन करता करता

पाऊले पुढे टाकावी

आनंदास कवेत घेता... 


शुद्ध कायेमध्ये तेव्हा

मन निरवील शांत

विचारांची गुंतागुंत

अन् विरेल सारी भ्रांत...


पहाटे उठून सारे

स्विकारु उषःपाना

शौचकर्म आवरोनी

करु योगाची साधना... 


योग सातत्य पाळूनी

संयम शांती  येई

चिरंतन सुख समृद्धी 

पायी लोळण घेई... 


नको स्पर्श तामसी तो

सात्विक घेऊया अन्न

सदासर्वकाळ चित्तास

ठेविन ते प्रसन्न...


पुढेच नित्य चालवू

योगविद्येचा वारसा

सधन करु विश्वा नि

भारता सृष्टीचा आरसा..


रचना ✍️ 

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

शुक्रवार, १८ जून, २०२१

सुख लाभो प्रिया तुला



विषय... सुख लाभो तुला..


प्रितपाखरा रे...


माझ्या प्रितपाखरा रे 

सख्या, प्रिया, प्रियतम

तुझ्या संगतीने माझे

प्रितबंध जन्मजन्म...१


आधार तू प्राणाचा 

पतीराजा परमेश्वर

तुझ्या स्पर्शाने फुलले

घर झाले हो मंदिर...२


प्रेरणा तू ठायीठायी

प्रगतीचे कारणही

आत्मबल वाढवण्या

विश्वासाचा तू अर्थही...३


तुझ्या संगे सप्तपदी

चालुनिया आले दूर

वचनांस निभावून

संसारास देऊ सूर...४


 पुजिते मी वटराजा

देई सौभाग्याचं दान

संसाराच्या दालनास

मांगल्याचं दे तोरणं...५


सुख लाभो माझे तुला 

दुःख तुझी मज मिळो 

हेचि  मागणे हरीसी

जन्मोजन्मी सेवा घडो... ६


रचना

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

दि ५.१०.२०२०

मंगळवार, ४ मे, २०२१

मैत्र म्हणजे... (मैत्री)

 मैत्र म्हणजे... 


मैत्र म्हणजे बंधन

      हृदयाचे अविरत स्पंदन

मैत्र म्हणजे आधार

      योग्यायोग्यतेचा स्विकार... १ 


मैत्र म्हणजे तिसरा हात

       पदोपदी सहृदय साथ

मैत्र  एक पर्व आहे

       गौण बाकी सर्व आहे... २


मैत्र म्हणजे जिव्हाळा

       मनी प्रितीचा उमाळा

मैत्र म्हणजे विश्वास 

      प्राण देणारा श्वास.. ३


मैत्र म्हणजे कला

      जगणे शिकवते आम्हांला

मैत्र म्हणजे सुंदर नातं

       खोल काळजाच्या आत.. ४


रचना✍🏻

✨शिल्पा म.वाघमारे✨

         स.शि. बीड

गुरुवार, १८ मार्च, २०२१

साहित्य साधना


साधना 


साहित्य क्षेत्रात आजकाल

नवीनच ट्रेंड आला आहे

मीच मोठा, तो खोटा

सारा बोलबाला आहे... 


कुणी लिहितं भावस्पर्शी 

कुणी फक्त यमकं जोडतयं

पतंगासारखी ओढूनताणून 

केवळ काटाकाटी खेळतयं... 


ना भाव भक्ती, प्रेमाचा कुठे

ना गंध दिसतो स्पर्शणारा

स्पर्धा, चुरस, मान, सन्मान

यासाठी कुणी धावणारा... 


काळजातून उमलावा शब्द शब्द 

प्रतिभेच्या गर्भातून कृती जन्मा यावी

प्रसवकळा सोसल्याविनाच

अनुभूती 'ती' कशी यावी... 


खेळ होतो आहे कुठे 

कुठे वाहे निर्मळ धारा

साहित्य ही साधना आहे 

समजून घेऊया जरा... 


ध्येय असू दे अटळ मनी

कर शुद्ध विचार पेरणी

समाजसेवा घडावी साहित्यातून

तेजात न्हाऊ दे लेखणी... 


रचना 

© शिल्पा म वाघमारे 

स शि बीड 

दि १८.३.२१