कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, ७ जून, २०२०

निसर्ग.. सावर रे मना


सावर रे मना


भव्यदिव्य पुस्तिकाच
ज्ञानप्रभा हा निसर्ग
आहे धरणीवरचा
मनोहारी प्रतिस्वर्ग ...||१|

खुले रश्मी उधळण
प्राची अंगणी उमले
रेखाटतो नभी रवी
रोज नवी नक्षीफुले... ||२||

पानोपानी गुंजे शीळ
पावा हरीचा मधूर 
संतरुप जागोजागी
श्वास देती तरुवर...||३||


भरतीची ओहोटीची
अचूकता साधलेली
नानारंगी ऋतुराज्ञी 
सोहळ्यांत नटलेली....||४||

पंकातील दल सांगे
दुःखातही साधा स्थैर्य 
पूर आणि वादळेही
शिकविती धीर-धैर्य....|| ५||

गुणातीत सौंदर्यास 
ओवाळीते काव्यज्योती
प्रज्ञा तोकडी माझिया 
वर्णावया कलाकृती...||६||

ठायीठायी संजीवनी 
ज्ञानामृत घे प्राशून 
चैतन्यास जागवूनी
घेई विराट दर्शन... ||७||

तया आदरे नमती
नित्य पशु नि पाखरे
तुज का न ये प्रचिती
नरा अट्टाहास पुरे...||८||

मना सावरुनी या रे
सारे वात्सल्यकुशीत
होऊ 'माणूस',चला हो
'देणे' शिकू घेत घेत...||९||

रचना
शिल्पा म वाघमारे 
सहशिक्षिका बीड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: