*हायकू विश्लेषण क्र.४७*
*नाही पाऊस*
*तरी डोळ्यात पूर*
*मनी काहूर*
- *शिल्पा वाघमारे*
जैवविविधता जपण्यासाठी पाण्याचे योगदान फारच मोलाचे आहे. पाणी हे जीवन आहे. अवर्षण, पाणी टंचाई दुष्काळ ह्या गोष्टी आता नित्याच्याच झाल्या आहेत, नवीन राहिल्या नाहीत. म्हणून आता पाण्याच्या उत्पादन मूल्यानुसार शेतीला, उद्योगांना आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आसवांचे पाट वाहू लागले आहेत.
इथला पाऊसही बेभरवशाचा झाला आहे. पाऊस पडला तिथे अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ तर जिथे पडलाच नाही तिथे कोरडा दुष्काळ अशी अवस्था आहे. पाऊस पडणे हे नैसर्गिक असल्यामुळे माणूस त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. सततच्या अवर्षणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याच शहरी तसेच ग्रामीण भागात सुद्धा दरवर्षी आ वासून उभी राहते. त्यामुळे पावसाच्या धारा नसल्या तरी डोळ्यात मात्र अश्रूच्या धारांचा पूर आला आहे. मन सैरभैर, उदास झाले आहे. विचारांचे काहूर मनात हैदोस घालत आहे असा हृदयस्पर्शी क्षण हायकूतून टिपलाय शिल्पा वाघमारे यांनी. एका संवेदनशील मनाची व्यथा मांडणारा हा हायकू मला आवडला. मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील हायकू वाटचालीसाठी शुभेच्छा!
- गंगाधर मेश्राम