शीर्षक : माहेराच्या वाटेवर...
पारिजात, बकुळ की
तयाहुनी गंधलेली
वाट माझ्या माहेराची
सदा वसंत ल्यालेली...||१||
पोर उनाड कालची
जरी संसारी मुरली
माहेरच्या आठवांनी
मनकळी भिजलेली...||२||
ओढ ओढी माहेराची
पंख फुटले मनाला
देह शिणला झेपावी
क्षणभर विसाव्याला... ||३||
शब्द स्नेहरंगी न्हात
ओंजळीत गंधाळले
ओठी ओल, भाव मृदू
मुक्त फक्त प्रीत व्याले... ||४||
रुणुझुणु श्रावणात
झुला झुले फांदीवरी
हरखल्या वर्णावया
कोडे पडे शब्दांघरी...||५||
उभी असेल दारात
माय कडा ओलावूनी
सजवेल वाट माझी
पापण्यांस अंथरुनी... ||६||
तिच्या पदराची ऊब
शीण भुलवते सारा
बाप शोधी नजरेत
सल दाबते जी ऊरा...||७||
माये संस्कारलेण्याने
जन्मोजन्मी मी सजावे
श्वास विरल्यावरही
तुझ्यातच उगवावे...||८||
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
२०.०७.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा