ध्यास शाश्वताचा
शाश्वत नाही येथे दुजे
एक तुझ्या आत्म्याविना
मायामृगजळ मिथ्या जग हे
ध्यास नसावा परमात्म्याविना... १
श्वास क्षणीकसा हरवून जातो
अहं तरी तो कशास हवा
चमचमत्या धनलोभापायी
कशास व्यर्थ झिजवसी जीवा...२
मद्, मत्सर, गर्व उसळता
अंधार दाटतो नजरेत
वाट विसरतो जीव सर्वथा
अडकून पडतो गर्तेत...३
वासना जणू ज्वाला जी
तुफान उठवती देहगावी
आप-पराचा विसर त्याक्षणी
पुन्हापुन्हा ये उधळावी... ४
खोल खोल रुततो आहेस
पंकात हाय संसाराच्या
मुक्तीपथाचा पडे विसर अन्
प्रेमात बुडाला पिंजऱ्याच्या...५
अशाश्वत जे शाश्वत मानून
ओढवलीस जन्ममरणगती
मुक्त कराया हरीनाम पुरेसे
मनी प्रसव निर्विकार भक्ती...६
शाश्वताची आस धरी मना
कर्म करी, पण गुंतू नको
पुष्पांसम चरणकमली त्या
अर्पण करण्या विसरु नको...७
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि १२.०६.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा