कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

🎵हरवल्या चिऊची कहाणी... ...




    दमलेल्या बाबाची कहाणी...

चालीवर एक गीत...


हरवल्या चिऊची कहाणी... ...

भकास ती ओसरी नि उजाड अंगण
तुझ्याविना दिस आला जाई गं निघून...

रोज आठवती बालपणीचे ते क्षण
चिवचिव मज उठवी गे झोपेतून...

सैरभैर नजरेला तीच आज आस
सुने सुने आज माझ्या मनाचे आकाश..

हरवली कुठे तू गं.. शोधते तुला
साद दे ना चिऊ...क्षमा मागते तुला...१

कुठे हरवली तुझी… पिंपळावरची शाळा
गोड आनंदाचे गाणे, फांदीचा हिंदोळा..

नाही पिंपळ दारी, आता टाॅवर तिथे झाला
तरुछाया हरवली, कुठे बोलवू मी तुला...

हरवली तू की माणूसच हरवला???
साद दे ना चिऊ... क्षमा मागतो तुला....२

चार पावलांनी थोडे मागे जाऊनिया
दिस सोनियाचे आणू का गे परतुनिया

पुन्हा एकदा गोड गात येशील तू का गं
वाटीतले दाणे तुला भावतील का गं..

चिवचिवत ये ना, खाऊ घेई जो हवा
उजाडल्या अंगणास श्वास दे नवा...३

कळून चुकले आता, असे पुन्हा होणार नाही
नको रुसू, तुझ्याविना रिते सारे काही

गुंतलाय कुठे, कसा जीव हा भुलला..
साद दे ना चिऊ, क्षमा मागतो तुला...

*गीतरचना*
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड


हरवल्या चिऊची कहाणी 

भकास ती ओसरी नि उजाड़ अंगण 
तुझ्याविना आला दिस जाई गं निघून

 रोज आठवते बालपणीचे ते क्षण
 चिवचिव' मज उठवी गे झोपेतून
'
सैरभैर नजरेला तिच आज आस 
सुने सुने आज माझ्या मनाचे आकाश 

कुठे हरवली तुझी पिंपळावरची शाळा 
गोड गाणे आनंदाचे- फांदीचा हिंदोळा

हरवली तू की- माणूसच हरवला...... 
साद दे ना चिऊ क्षमा मागते तुला... ना .ना. ना... ना... १

नाही पिंपळ दारी - आता टॉवर तिथे झाला
तरुछाया मावळली- कसे सांगू तुला

 चार पावलांनी थोडे मागे जाऊनिया 
दिस सोनियाचे आणू का गे परतुनिया

पुन्हा एकदा गोड गात येशील तू का गं
वाटीतले दाणे तुला भावतील का गं 

चिवचिव करीत पुन्हा ये ना माझ्या दारी
काय हवा खाऊ सये सांगशील तरी

 उजाडल्या अंगणाला श्वास दे नवा
 साद- दे ना चिऊ क्षमा मागते तुला...ना...ना...ना...ना.... २

कळून चुकलं आता, असे पुन्हा होणार नाही 
नको रुसू तुझ्याविना रिते सारे काही

भास-भास- तुझा माझ्या ध्यानात मनात 
पुन्हा वाटे भय, आस नाही ना विझत 

काय सांगू मनी काय दाटते काहूर..  
येऊ पाहे जवळी तू जाते जणू दूर

 वाटते की सवे तुझ्या आकाशी उडावे
तुझ्यापरी पुन्हा सये लहानगे व्हावे

नाचूनिया गाऊनिया-फेर गे धरावा
बाबांनी जो आणला का  खाऊ तो हवा... ना.. ना.. ३

साऱ्या तुझ्या सख्यांना तू बोलावं ना बाई 
चुकलं-माकलं पोटी घाल.. विसर गे सई

पुन्हा हसू खेळू मग धरा ही फुलेल 
माणसाच्या ठायी  नवा भाव उमलेल 

रंग नवा, गंध नवा उधळूया सारी 
काळावर कोरुया ना छबी ती हसरी 

गुंतलाय कुठे, कसा जीव हा भुलला
-साद दे ना चिऊ क्षमा मागते तुला...ना.. ना.. ४ 
ना... ना... ना.. ना...
हं......
ला.....

गीत रचना : 
शिल्पा म.वाघमारे
(शिक्षिका) जि प प्रा शाळा मालेगाव खु ता गेवराई जि बीड
२०.०३.२०२२