कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ मार्च, २०२१

१ आई...

 अभंगप्रकारातील रचना... आई


           वात्सल्य सागर

विश्वाचे तू आर्त | वात्सल्य सागर||
रिती मी घागर  | तुझ्यापुढे   ||१||


तूच  आद्यगुरु | चैतन्य गाभारा  ||
ऋणांचा हा भारा | वाहू कशी ||२||


तुझ्या ममत्वाचे |मोल नच कोठे||
प्रितामृत साठे  | हृदयात ||३||


मनविश्वांगणी| मी तम,तू ज्योती ||
निर्व्याज तू प्रीती | अनुपम  ||४||


सुधा ती प्राशून | स्तन्य बोधामृत ||
न्हाले ज्योतिरात | धन्य झाले ||५||


केवडा, बकुळ | चंदन, कस्तुरी ||
तुजपुढे सारी | गंधहीन ||६||


साहित्यनगरी | सम्राज्ञी शब्दांची||
प्रतिमा ईशाची | धरेवरी ||७||


कर्तव्यफुलांनी |वाट सजलेली||
 फांदी वाकलेली| संस्कारांनी||८||


पियुषी पान्ह्याने| शब्द भिजलेले ||
ओठी  थिजलेले  | प्रसवले ||९||


तू ग वजा जाता| जगणेच व्यर्थ||
उरेल का अर्थ | अस्तित्वास ||१०||


मज गवसला | आठवा तू सूर ||
तो कर्णमधुर  | स्वर 'आई' ||११||


'शिल्प' साकारले| तुझ्या स्पर्शामृते ||
प्राण तू फुंकले| पाषाणी या ||१२||

रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. 07.12.2018
भ्र. क्र. 9527054205

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

🙏अभंग संत मीराबाई

 अभंग रचना 


कृष्णार्पित मीरा ... 


चैतन्य साकार

अद्वैताचा अंश

विकारांचा दंश

अशक्यच... १


संताच्या पंगती

बसली हो मीरा

मनाचा गाभारा

कृष्ण व्यापी...२


दंगली भक्तीत

कृष्णरंग ल्याली

कृष्णामृती न्हाली

मीराबाई...३


रस्तोरस्ती नाचे 

तल्लीन होऊनी

शर्करा जीवनी

विरे जशी...४


कृष्ण प्राणसखा

श्वासा  संजीवनी

न लगे हो कुणी

तयाविन... ५



अलभ्यचि लाभ

रान गंधाळले

विष पालटले

अमृतात... ६



अखंड गुंफण 

नाम मोतियांची

जाहली कृष्णची

मीराबाई...७


देहभान  सांडी

दंग मीराराणी 

गाई विरहिणी 

कृष्णासाठी...८


जाणला हो कृष्ण 

मीरेनेच खरा

तुजला का नरा 

उमगेना... ९



रचना

© शिल्पा म वाघमारे

स शि मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड