कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
अष्टाक्षरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अष्टाक्षरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ जुलै, २०२२

आनंद पेरणी

 

*दि. २९/६/२०२२*


*काव्यप्रकार - अष्टाक्षरी*

आनंद पेरणी


पेरु तेथ समृद्धता

मने जेथ उजाडली

'वनमाळी' वाहिलच

दिनरात 'त्या' पखाली... ||१||


आनंदाचे येता दाणे

पुन्हा यावे ते पेरता 

समाधान सुख खरे

यावे पदरी झेलता...||२||


संस्कारांची रुजवण 

नव्या कळीला ये गंध

माणूसपणाची जाग

प्रकाशाशी बांधू 'बंध'...||३||


संवेदना मनातली

अलगद अंकुरावी

जाणिवेची 'धाव' मना

जावी नेणिवेच्या गावी... ||४||


सुंदराचा वेध लागो

पिकवाया ज्ञानमळा

क्षण एकही मोहाचा

तुच्छ वाटो माझे डोळा...||५||


गुंतागुंत पेच सारा

अंथरला सभोवती

मनी मळभ घागरी

रित्या करु तरी किती?...||६||


उत्तरांस पडलेले

प्रश्न करती आकांत

आकाशाच्या विरहाने

धरेसही पडे भ्रांत...||७||


कुणी पेरली रुक्षता

कुणी फासले हे काळे

ग्रासलेल्या विचारांनो

तोडा आतातरी जाळे...||८||


पुन्हा पुन्हा जन्म देई

मज आनंद पेराया

नको मोक्षाचे 'बा' दान 

होण्या निष्प्रभ ही 'माया'...||९||


काव्यरचना

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका

मालेगाव खुर्द 

मंगळवार, १४ जून, २०२२

घाट संसाराचा


*दि. १२/६/२०२२*

*विषय - संसार*

*काव्यप्रकार - अभंग*

(६-६-६-४)


घाट संसाराचा


संसाराचे सुख | चमक बेगडी ||

विकारांची बेडी| सुटेनाच ||१||


येथे विषयांनी | उच्छाद मांडले ||

पाठीशी लागले | निशदिन ||२||


संसार नि सुख | जणू की विलोम ||

सुखाची ती गोम | विठू पायी ||३||


संसाराचा घाट | भातुकली खेळ||

कर्मांचा तो मेळ || बसवाया  ||४||


पुरे येरझार | आळवे हरीणी ||

श्रीहरी चरणी | देई दास्य ||५||


साधनेत साध |  मोक्ष हेचि लक्ष्य ||

षडांचे तू भक्ष्य | होऊ नको ||६||


सरोजासमान | राहूनी अलिप्त ||

जागव त्या सुप्त | चेतनेस ||७||


कर्मगतीस्तव | लाभलिसे 'कारा' ||

गुंफू श्वास सारा | हरीनामी ||८||


दुःखांचे हे मूळ | खुळं सारं सुख || 

होता अंतर्मुख | आत्मानंद ||९||


संसार 'तो' हवा | अंतर्बाह्य हरी || 

सुधाही विखारी | जयापुढे ||१०||

रचना

©शिल्पा म वाघमारे

स. शि

जि प प्रा शाळा मालेगाव खु ता गेवराई जि बीड 

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण


आला श्रावण श्रावण

तप्त झळा ओलावल्या

मने मंदावल्या ज्योती

तया फुलवू लागल्या...१


कधी होई प्रेमसाक्षी

प्रणयास फुलवितो

श्वासाधार बळीचा जो

विरहिण का जाळतो? ..२


प्राजक्ताच्या मृदुलांनी

साजे माहेराची वाट

वाट पाहे गं माऊली

गंधाळते आत आत...३


फांदीवरला हिंदोळा 

वारा झुलवतो सई

उंच उंच जाता झोक

मन कालवते बाई...४


पापणीला नाही लव

भाऊ येईल गं आज

किती आवरावं तरी

बाई सरेनाच काज...५


आल्या गौराई माहेरा 

सोबतीला गणपती

माझी मलाच गं ठावे

लगबग सांगू किती...६


कसा येई नि जाईही

त्याचा कळेनाच मेळ

अवखळ हा श्रावण 

तोच जाणे त्याचा खेळ... ७


रंगी रंगला श्रावण 

त्याचा अनोखाच ढंग

मोरपिसातले जणू 

ल्याला एक एक रंग... ८


शिल्पा म वाघमारे 

स शि मालेगाव खु 

ता. गेवराई जि. बीड

शुक्रवार, २५ जून, २०२१

गाव.. अमृताचा ठेवा

 

 

काव्यप्रकार-अष्टाक्षरी


गाव...  अमृताचा ठेवा


गाव निसर्गदर्पण

नित्य अमृताचा ठेवा

गाव शब्दांत मावेना

फिरकेना हेवादावा ||१||


गाव हिरव्याचं लेणं

माय धरेचं माहेर

ओल्या गंधात न्हालेला

दिव्य चैतन्य आहेर ||२||


मने स्वर्गाची दालने

विकारांचा विरघळ

सांज श्याम स्मितखळी

सुखाचाच परीमळ  ||३||


आकर्षितो जगतास 

साधेपणा, सहजता

काळ्या आईच्या मायेची

हिच खरी विशेषता ||४||


ओव्या, अभंगाचा वसा

गती देई जगतास

जरी वाहे तंत्रज्ञान

गाव जपे संस्कृतीस ||५||


म्हणवून 'त्या' अडाणी

बोट दावते शहर

तया सांगेल का कुणी

गाव 'ज्ञानाचा सागर' ||६||


खरी श्रीमंती सृष्टीची 

आहे गावाच्या मातीत 

हरवला हा सुगंध

शहराच्या डोलार्‍यात ॥७॥


अंतरावी न अंतरे

येता 'मी' पणा तोऱ्यानं 

आग पाखडता वाणी

भडकावे न वाऱ्यानं ||८||


कोमेजून आपुलकी

नको झापड मनाला

रंग उधळू दे चित्ती

विनवते श्रीरंगाला ||९||


आहे सजलेले सदा

आदर्शांच्या तोरणांनी 

माझ्या भारताचा गाव

शोभातोय विश्वांगणी ||१०||


रचना 

शिल्पा म वाघमारे 

स शि मालेगाव खुर्द ता 

शनिवार, २५ जुलै, २०२०

लपंडाव ऊन पावसाचा अष्टाक्षरी



विषय : लपंडाव ऊन पावसाचा

शीर्षक : लक्ष्य प्रकाशाचे

ऊन्हं पळताती पुढं
मागे धावतो पाऊस
म्हणे '' लागली रे धाप'' 
आता नको रे धावूस... १

मेघ श्यामल गं आला
स्वप्नसरी बरसल्या 
माराव्याने चिंब केले
धरणीस आतुरल्या...२

मन सुखात भिजलं
साजनात विरुनिया
कधी दुःखात थिजलं
विरहात पोळुनिया...  ३

बाळ कोवळं धरेच
पात तृणाचं नाहलं
गालावरी खळी आज 
दवं कान्हाईने ल्यालं...४

क्षितिजाच्या कोऱ्या पानी
ऊन्हं चित्र रेखाटूनी
उधळण सप्तरंगी
धनु येई आकारुनी...५

ठाव लपल्या उन्हांचा
घेत पाऊस धुंडाळी
कधी शिरवा ओलावी
कधी चांदणं झळाळी...६

ओल जाणीवांची जपा
लक्ष्य प्रकाशाचे गाठा
ठायी ठायी सांगे सृष्टी
सांडी काम क्रोध ताठा...७


रचना 
© शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका, जि बीड