कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, २४ मे, २०२०

नव्या युगाच्या उंबरठ्यावर


    नव्या युगाच्या उंबरठ्यावर         

नव्या युगाच्या उंबरठ्यावर
सूर शांतीचे पेरत जाऊ
आभाळावर  शिल्प देखणे
माणुसकीचे कोरत जाऊ... १ 

सुसज्ज स्वागता हसतमुखाने 
कर्तव्यफुलांची भरुनी ओंजळ
मन हे निश्चल सताड उघडे
संतांसम करुया ना प्रांजळ... २ 

मागे टाकूया चुकले मुकले
परी बोधामृत घेऊया हाती 
अपवृत्तींची करुनी निवृत्ती
निर्व्याज प्रीतीच्या पेटवू वाती...३

सृष्टी हसावी, खुलून गाली
जपू तिजला मृदुला कळीपरी
महादानी जी निरिच्छ सर्वथा
लागो त्या करांचा गंध करी...४

अज्ञानाच्या तोडून बेड्या
विज्ञाना संगती झेपावू
स्मरण असो, अतिरेक नको
की दुःखसागरी वाहत जाऊ...५

विसरु, जाळू, गाडू विषया
स्पर्शही क्षणीक ना होवो मना
पुरे आता हे येणे-जाणे
श्वास श्वास वाहू समचरणा...६

सत्कर्म, धर्म हे लक्ष्य करु
संसार जाणूनी केवळ मिथ्य 
सत्यरथावर स्वार होऊया
विधाता स्वये घेईल सारथ्य...७

( *समचरण= विठ्ठल*)

रचना
© शिल्पा म. वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि २४.०५.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: