कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
बालकविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बालकविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

@ बालकविता पंढरीची वारी

 पंढरीची वारी.... (बालकविता)


पंढरीच्या राजा

पांडुरंगा विठ्ठला

मलाही यायचंय

देवा तुझ्या वारीला. . १


वारीला चालले

आजोबा नि आजी

मलाही बघायची रे

एकदा पंढरी तुझी. . .२


माऊलीच्या दिंडीसह

यंदा मला जायचंय

विटेवरचं सुंदर ध्यान

मलाही पहायचंय। . . .३


लहान आहेस तू असं

आई-बाबा म्हणतात

दरवेळी अशीच ती

कारणे देत असता. . .४


ज्ञाना-तुका आणि

भक्त पुंडलिकाचा

केलास उद्धार

तू तुझ्या भक्तांचा. . .५


या मोठ्यांना तुच आता

एकदा समजव रे

निरागस या जीवाची

पुरव ही आस रे. . . ६



         📝 *रचना* 📝

      *शिल्पा म.वाघमारे*

           *स.शि. बीड*

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

@ बालकविता आरोग्यम् धन संपदा

 आरोग्यम् धन संपदा...


आरोग्य धनसंपदा अनमोल

साऱ्या धनाहूनही श्रेष्ठ

स्वच्छ राहू, पौष्टिक खाऊ

काळ आला हो महादृष्ट... 


हात धुवा सेकंद वीस

वेळोवेळी ठेवून लक्ष

त्या विना डोळ्यांस स्पर्श 

न होवो, राहूया दक्ष...


अलिप्त राहू अल्पावधी

एकी दर्शवू भारताची

घरट्यात राहून पिल्लांसह

काळजी घेऊ साऱ्यांची...


 देहासह मन, मती

सदैव राखून निर्मळ

हरवूया रोग - व्याधी

जळी स्थळी शुद्धतेचा परिमळ... 


नाती विणली भोवतीली

जरी सोबती सफरीला

देहास पोचता क्षती क्षणिकही

कुणी न येईल संगतीला... 


रचना...

शिल्पा म वाघमारे

स शि बीड

@ बालकविता... पाटी..

 पाटी आणि माझेही

ऋणानुबंध अनोखेच

तंत्रज्ञानाची चमचम

तयापुढे ते तोकडेच...१


तो स्पर्श मऊसर

माझ्या भरलेल्या मनी

अनुभवांची शिदोरी 

कशी जाऊ विसरुनी?...२


तीच जणू सखी होती

माझ्यासवे खेळणारी

तासन्‌तास तिच्यामधे

मी जणू विरघळणारी...३


इवली इवली बोटे करती

चित्र, अक्षरांची दाटी

प्रगतीचा पथ झाली 

तीच माझी पाटी

माझी पहिली ती पाटी... ४


रचना 

शिल्पा वाघमारे (कुलट) 

स शि अकोला 

दि १९.७. २०१९

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

@ बडबडगीत


बडबडगीत... 


डोक्यावरती पंख्याची घरघर 

घरघर घरघर नुसती घरघर

कश्य झोपेल बाल शांगा? 

नुसती टॅहॅटॅहॅ.. नुसती रडरड... 


इकडून तिकडून लागला डोळा

बाबांच्या टिव्हीची नुसती खरखर

पुन्हा उथलं बाल गं आई 

पुन्हा टॅहॅटॅहॅ पुन्हा रडरड... 


अंगाई गाऊन, थापटून थोपटून 

बाळाला मग आली गाई

मोबाईलची ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग 

झोपल्या बाळाला उठवून जाई...


काकांच्या स्कूटरची सारखीच कशी

ढरढर खडखड ढरढर खडखड 

झोप येईना बाळाला, 

मग... आईची पळपळ

आईची पळपळ... 


रचना ✍️ 

© शिल्पा म वाघमारे 

स शि बीड 

दि. ७.९.२०२०

@माझे हात (बालकविता)

  बडबडगीत 

शीर्षक : देखणे हात


दोन हात मला

दोन हात तुला

झटपट चला 

लागा कामाला... १ 


दात घासू चकचक

नि आंघोळ खसाखसा

हात धुवून स्वच्छ 

जेवायला बसा...२


दोन चार कामे 

टाकूया उरकून

आईही कधीची

गेली असेल दमून...३


माझी सारी कामे 

मीच आता करणार 

मोठा झालो बघ आई

तुला त्रास नाही देणार... ४


बाई सांगत होत्या 

माणूस फक्त घेतो

सांगा बरं देणाराला

आपण काय देतो?... ५


झाडे लावीन,जगवीन

स्वच्छ करीन परीसर

चिऊला दाणापाणी 

ठेवीन मी छतावर... ६


आई म्हणते सुंदर कामं

करत रहावे खूप 

देखणे होतील हात

खुलवा पुन्हा धरेचं रुप... ७


काव्यरचना 

©शिल्पा म वाघमारे 

स शि

जि प प्रा मराठी कन्या शाळा बार्शीटाकळी जि अकोला 

दि. १९/०४/२०२१

@बालकविता अक्षरांचे गाणे


अक्षरे हसली गाली


'अ' हे अक्षर

 पहिले वहिले

पहिल्याच दिवशी

 वाचून लिहिले


आरसा आणि आगगाडी

'आ' मध्ये लपली 

आईच्या कुशीत 

आनंदी झोपली 


'इ' ची वाकडी

 इमारत न्यारी,

पाटीवर गिरवताना

गंमतच सारी


'ई' जवळ येताच

हसले ईडलिंबू,

चंदूच्या ओठांचा 

झाला ना चंबू


उखळाचा 'उ' 

लिहित होती हर्षा 

तीनासारखा आकार 

मग दिली शिरोरेषा 


ऊसाचा 'ऊ' तर

उखळीतूनच आला 

अगं बाई! बघा की

शेपटी फुटली त्याला!


ऐटीत असतात उभे

'ए' आणि 'ऐ'

'ओ', 'औ' उच्चार वेगळे

जरी दिसतात भाईभाई


'ॲ' आणि 'ऑ' यांनी    

 मराठीत घेतली उडी 

'अं', 'अः' मित्र खरे

जमली  छान जोडी 


काव्यरचना  :

शिल्पा म. वाघमारे (कुलट) 

शिक्षिका, 

अकोला

भ्र. क्र. 8830680101


@ बालकविता पृथ्वीगोल 🌏

 पृथ्वीचा गोल


खेळ खेळूया रे

खेळ खेळूया 

खेळता खेळता 

सारे शिकूया... १ 


नवलाईचा भारी

पृथ्वीचा गोल 

अक्षांश रेखांशांचे

ज्ञान अनमोल...२


उत्तर नि दक्षिण

ध्रुव टोके छान 

सात आहेत खंड

मात्र आशियाचाच मोठा मान...३


सागरांनी साऱ्या

जलमय धरा

साधनसंपत्तीचा

खजिनाच खरा... ४


परिवलन आणि 

शिकू परिभ्रमण 

दिवस, रात्र, ऋतू

अन् होते कसे ग्रहण...? ५


भूगोलाचे नित्य नवे

घेत राहू ज्ञान 

अभ्यासासाठी आता

मुक्त आहे रान... ६


. * रचना 

शिल्पा म. वाघमारे 

 सहशिक्षिका बीड

रविवार, १७ जुलै, २०२२

@ बालकविता जलसंपदा..

 चित्रकाव्य 


जलसंपदा


चला, धावा, धावा 

आले पाणी नळा

नका वेळ दवडू

लगबगीनं पळा... १ 


शकू, जना, मीना

कामे सारी सोडा

आणा कुणी बादल्या

कुणी लावा हंडा...२


सारी सारी कामे

होती तशीच पडून

पाण्याविना राही

सारं काही अडून... ३


पिण्याच्या पाण्याच्या

स्वच्छ करुन घागरी

रोगापेक्षा आपली

काळजी घेतलेली बरी... ४


असेल आई कामात

तर मदत तिची करा

ताई, दादा मोठे

नि करा बाबा त्वरा... ५


घालवू नका वाया

नको व्हाया चिखल

पाणवठा ठेवण्या स्वच्छ

घेऊया आपण दखल... ६


गाईगुरे असतील

वा घरी असेल मोती

साठवून ठेवा पाणी

पुरेसे हो तयांसाठी ... ७


रचना

© शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

दि. ४/७/२०२१

बुधवार, १६ मार्च, २०२२

@ बालकविता आनंदसरी 2025

आनंदाची वारी

आनंदसरी



कित्ती येणार ना रे मज्जा 

 भेटला वाटेत हा पाऊस

इथेच खेळूया ना दादा

नको शाळेत जाऊस... ||१||


ठेवून दे रे ते दप्तर

उघडूबिघडू नकोच छत्री

नाही होणार सर्दीबिर्दी

मला पक्की आहे खात्री...||२||


कितीतरी दिवसांनी

मिळाली ना छान संधी

नाहीतर असतोच ना

खिडकीमागे आपण बंदी... ||३||


मनसोक्त आनंदाच्या

जलसरी चल झेलू

डोलता डोलता गाऊ नि

गाता गाता डोलू...|| ४||


वाजू दे रे थंडी जरा

चिंब चिंब भिजूया

थप्पक उडी मारुन

मोरासंगे नाचूया...|| ५||


नको ठेवूस  मनात 

आता आईचा धाक 

सांगून देऊ खरंखरं 

करील बघ माफ... ||६||


आनंदाच्या गाण्यांमध्ये 

भिजवून टाकू सारी

आभासी त्या गुंतलेल्या 

मोठ्यांनाही घडवू वारी... || ७||


काव्यरचना 

*शिल्पा म वाघमारे*

सहशिक्षिका बीड



सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

@ बालकविता मनमौजी पाऊस

मनमौजी पाऊस...


आकाशाची सैर कराया

 पंख दिले मेघास कुणी

 लुसलुशीत मऊ तनुवरी त्या

निळे जांभळे रंगवूनी...१


कधी कोरडे फिरती नुसते

तया कुणाचा धाक असे? 

आई ,बाबा, ताई, दादा 

डोळे मोठे करीत नसे ...२


इकडून तिकडे वाऱ्यावरती

स्वार होऊनी बागडती

कधी फुगवूनी गालच अपुले

रुसतात असे कुणावरती? ...३


धडाड्धुम्म...नाद गर्जतो

ढोल नभीचा निनादतो

कुट्ट करी झाकूनी दिनकरा

मयूरांस रानीच्या खुणावतो...४


वारा स्पर्शे शीतल चंचल

क्षणांत झर झर धार झरे

झाडे - वेली धरणी तान्हेली

तृप्त होऊनी जाई त्वरे ...५


ओढे नाले तलाव सरीता

तुंडुंब वाहती आनंदे

चराचरांचे मनही वाहे

चिंब होऊनीया छंदे...६


स्पर्श सुधा देई संजीवन

क्षणांत अंथरे हिरवाई 

पुन्हा पुन्हा ती अशी सुखावे

जणू हरवते श्यामसई...७


रचना

शिल्पा म.वाघमारे

(शिक्षिका) अकोला 

१७/०८/२०२१

रविवार, १४ मार्च, २०२१

@ बालकविता एक होती चिऊताई...


एक होती चिऊताई 

एक होती चिऊताई 

तिचा एक होता चिऊ

ना राहिलं होतं घरट

ना खायला होता खाऊ... १ 


वणवण भटकत दोघे

उन्हातान्हात फिरले

दमून गेले बिचारे

पण झाड नाही गावले... २


तेव्हा कुठे मनाला

विचार शिवून गेला

सिमेंटच्या जंगलातच

घरटं घेतलं बांधायला...३


ना कापूस ना गवतकाडी

दूरवर शोधून शिणले खूप 

कसं बसं झालं विरळ घरटं

बाळाला देऊ म्हणे मायेची ऊब...४


गोंडस बाळ दोघांचा मग

हळूहळू फुलू लागला

चिऊताई आणी दाणापाणी

चिमणा बाबा भरवू लागला...५ 


चिंता क्षणोक्षण टोचे

उद्याची त्या उभयतांना

काळ कोपतोया भारी

आणि काहीही सुचेना...६


"कर जागं माणसाला"

देवाजीस विनविती

जीवा इवल्या कळाली

माणसा रे तुझी गती?...७


रचना 

© शिल्पा म. वाघमारे 

सहशिक्षिका बीड 

दि. १४.०३.२१

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

@ बालकविता काळे काळे ढग ☁

 काळे ढग


काळे काळे ढग बघा

घेऊनी पाऊस आले

पसरला गंध रानी

भरतील नद्या-नाले


काळे काळे ढग आले 

काळे काळे ढग आले

 रान चिंब-चिंब झाले

तरुवर आनंदले


पानपान नहालेले

फूल गालात हसले

माय धरणीचे मन

बघा कसे हरखले


रानी मोराचे पिसारे

कसे फुलले फुलले

मनमोराचेही माझ्या

पद जणू थिरकले


पिलांचिया काळजीने

पंख पक्षीणीने  पसरले

ऊरी भरले कापरे 

पर तिचे होता ओले.. 




रचना 

© शिल्पा म वाघमारे 

स शि बीड

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

पुन्हा बहरली शाळा

 पुन्हा बहरली शाळा 



बघा बहरली शाळा, मुले आली आली 

आनंदली मनी शाळा, किती हो खुलली...धृ


अंगणात तिच्या जणू फुललेली फुले

निरागस आनंदात भिजलेली मुले...

भरल्या अंगणी जणू रांगोळी सजली...१


पुन्हा आता चैतन्याचे संगीत गुंजले

ज्ञानाच्या सरींत शब्द सूरही भिजले

वाट पाहता पाहता, झाली होती रडवेली... २


रचना

© शिल्पा म वाघमारे

स शि बीड

दि 31.1.2021

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

बालशब्दस्पंदन

 *बालशब्दस्पंदन...*


साहित्याची नांदी येईल

  भवितव्यासाठी होईल प्रेरणा

इवल्या डोळ्यांत चमकेल

आत्मविश्वास अन् चेतना...१ 


बालग्रामच्या अंगणात उद्या

किलबिलती पाखरे गोजिरी

स्वयंप्रकाशी ध्येय ऊरी अन्

बरसतील निर्मळ आनंदसरी...२ 


काव्यमंजिरी दरवळून टाकील

कथांत रमतील थोरसान

बिनधास्त झेप साहित्याकाशी

घेताना मग नुरेल भान...३ 


गोष्टरंगचा इंद्रधनू भुलवेल

मुलाखतीत मन हरवेल

गीतमालांच्या मंजूळ वाणीने

तार काळजाची झंकारेल...४


प्रेरिका असेल ती घटीका

स्वप्नवाट प्रकाशणारी

सुखस्वप्नांच्या जगतामधुनी

विश्वास सत्याचा देणारी...५


शब्द होऊन स्पंदने हृदयीची

 देतील जगण्याला नवा श्वास

आस घेईल नभी उत्तुंग भरारी

मळभ सारुन तरारेल ध्यास...६



रचना

©शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका

जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द

ता गेवराई जि बीड

दि. ४.२.२०२०

सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

@ बालकविता बाळाचे मित्र

 बडबड गीत 


बाळाचे मित्र 



तुरुतुरु चालता वाजतात चाळ

चुटुचुटु बोलते सानुलं बाळ

दुडूदुडू धावलं, अंगणात बसलं

खेळायला बघा... कोण कोण आलं... १ 


डुलत डुलत आला हत्ती

बाळ म्हणाला झुलता किती 

केवढी मोठी तुमची सोंड 

कुठे हरवलं तुमचं तोंड 


चिऊ आली हसली गाली 

दाणा तिचा पडला खाली 

बाळ म्हणालं चिऊ गं चिऊ

आणला का गं मला खाऊ 


कावळा बसला फांदीवर 

पावसात मोडले त्याचे घर 

बाळ म्हणालं ये माझ्या घरी 

तुला देईल मी खीरपुरी 


 मनीबाई करी म्याऊ म्याऊ 

उंदीर मामा तिचा आवडता खाऊ 

बाळ म्हणे वाटीतलं दूध घे पिऊन 

माझ्या वाट्याचं देशील का ठेवून? 



रचना

© शिल्पा म वाघमारे

स शि बीड

7.12.2020

रविवार, ७ जून, २०२०

@बालकविता मोराची युक्ती...

बालकविता


मोराची युक्ती... 

टुणटुण टुणटुण उड्या मारत 
माकड म्हणालं... ऐका हो ऐका... 
मोर, ससा, हरीण, हत्ती
साऱ्यांचा मग एकच गलका... १ 

खमंग खबर ऐकायला
डोळेही मग कान झाले
काय सांगणार मंकुबाबा
राघू-मैनाही आतुरले...२

काम टाकूनी हातातले
लगबग आली चिऊताई
सांगेन सारे.. काळजी नको
बाळाची आई हत्तीणबाई...३

ऐटीत बसूनी मंकूनेही
सूचना दिली सभेची
पौर्णिमेला सायंकाळी 
वेळ पाळूया सातची...४

सारे जमले आवरुन काम
नियमच होता जंगलाचा
वनराज येता व्यासपीठावर
मुजरा केला मानाचा...५

विरळ झाले रान सारे
नदी, तलावही आटलेले
या माणसांनी स्वार्थाचे 
दुकानच हो  थाटलेले...६

दाणा शोधायाला सारे
जंगल जातील सोडूनी
पोटातल्या भूकेसाठी
मित्र जातील हरवूनी...७

 सांगेल कोणी का उपाय यावर?
विचारांत पडले भारी
मोरदादा सुचवी युक्ती
जंगलास वाचवणारी...८

आळस झटकून टाकू आता
दुःख नका हो करु कुणी 
मेघ दाटण्यापुर्वी आपण
बिया टाकूया रुजवूनी ...९

संकटे येऊनही जरी का
कळे न काही माणसाला
आपण सजवू सृष्टी पुन्हा ही
वाचवत राहू जंगलाला...१०

शाब्बास म्हणूनी, बोले राजा
उशीर नको सत्कार्याला
सभा संपली उठा मित्रहो
लगेच भिडूया कामाला...११

रचना 
शिल्पा म वाघमारे 
सहशिक्षिका बीड 
७.०६.२०

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

@ बालकविता स्वच्छतेसाठी




स्वच्छतेसाठी....

चल रे रामा, गोपू, चंदू
साथ देऊ एकमेकांना 
स्वच्छ भारत करण्यासाठी
हात देऊया हातांना... 

स्वच्छतेची प्रेरणा ती
मनामनातून येऊ दे
स्वच्छ शरीरात स्वच्छ मन
विचार हा स्वच्छ फुलू दे...

मी राहीन स्वच्छ नि
मगच सांगेन  जगताला
त्याविना का विचार माझा
भिडेल तयांच्या हृदयाला...

पुरे ते संकल्प आता
थेट भिडूया कामाला
घर, शाळा, गाव माझा
स्वच्छ करुया देशाला...

बीज स्वच्छतेचे आता
मनामनांत रुजवूया
प्रदुषणाच्या विळख्यातून
भारतमातेला सोडवूया ...

दुषित वायू, जल, भूमीने
श्वास इथले खंगले
प्लास्टिकचे तर भावी पिढीचे
भवितव्य काळोखी कोंडले...

उमलाया मग उषा नवी
चला जाळूया आळसाला
मीच उज्ज्वल 'भारत'उद्याचा
पटवून देऊ विश्वाला...

✍🏻रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
10/2/19, 

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

@ बालकविता खारुताई

खारुताई

इटुकली गोजिरी तू
सानुकली खारुताई 
सरसर  लगबग
चढूनिया वर जाई... १

लगबग कसली ही
तुला कसली ग घाई 
इवल्याशा पायांनीच
तुरुतुरु धाव घेई   ...२

टुकूटुकू बघतेस
गोल टपोऱ्या डोळ्याने
शेपटीचा झुबका तो
मिरवीशी तू तोऱ्याने.. ३

शेंगा भुईमुगाच्याही
कडाकडा फोडूनिया
गालांमध्ये गोबऱ्या त्या 
तोबराच भरुनिया...४

भागूबाई भित्रीच तू 
कानी येता चाहूलही
बघ शिवबासम मी
भीत नाही कोणासही...५ 

बिया जमवून ठेवी
भुईमध्ये लपवून
विसराळू नार अशी
जाशी मग विसरून...६

सर येता आपसूक
सारे रान अंकुरते
नकळत खाऊताई
रुजवण शिकवते... ७

आजी सांगे रामकथा
मज सेतूबंधनाची
इवलासा देई वाटा
थाप घेई कौतुकाची... ८

रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड

चाखून बघ ना गं खारु
मधुमकरंद सये आणला
सोनसळी किरणे वाट पाहती
जाऊ लपाछपी खेळायला

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

सांग ना गं आई.. कोडं पडलं

सांग ना ग आई


आज मला खरं एकदा
सांग ना ग आई
कढईला दोन कान
तरी ऐकू का न येई?

टेबलालाही बघ ना
चार पाय असून
चालत नाही कसा?
नेहमी असतो बसून


तीन डोळे आहेत
जरी या नारळाला
दिसत नाही कसं
सांग ना ग त्याला?

खुर्चीला तर बघ ना
जरी दोन हात आहेत
तरी तिला काही काम
 नाही ना करता येत?

बाई सांगतात माणूस तर
सर्वांत बुद्धीमान असतो
तरी तो निसर्गाशी असं
विरुद्धच का वागतो?

पण मी नाही आई
असं वाईट कधी वागणार
सुंदर या सृष्टीला मी
नेहमीच जपणार !!!

 "रचना"
         शिल्पा म.वाघमारे
               स.शि.बीड
22.07.2018