कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
कृष्णार्पित काव्यशिल्प(प्रकाशित) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कृष्णार्पित काव्यशिल्प(प्रकाशित) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

सखी तू स्वयंसिद्धा

  सखी तू स्वयंसिद्धा 

ओलांडून उंबरठा ये बाहेरी
सखे मुक्ताकाशी घे झेप
मळभ सार सारे अंतरीचे
पुनः नोहे ही संधीची खेप ||१||

हाक ऐक सखे अंतरीची
बंधने व्यर्थ ती सारी तोड
खुणावती तुज सुवर्णसंधी
का ही आयुष्याशी तडजोड?||२||

पुरुषप्रधान संस्कृतीला
लादून ते मोकळे झाले
तुझे कोंडलेले श्वास ते
कधी कुणा का जाणवले? ||३||

उंबरठ्याच्या बाहेर ये तू
ओलांडून निर्बंधांचे माप
मागे वळून पाहू नकोस
हात रोखणारे जरी अमाप ||४||

गृहपंजरीचा झालीस रावा
परंपरा युगांची तोड सखी
कोमलतेस कमजोरी ठरवून
विषप्यालाच तुज दिला मुखी ||५||

त्या चार भिंतींना तू ही
मानून बसलीस विश्व खरे
मुकलीस ना गं मुक्तजीवना
 तन-मन-धन अर्पूनही सारे ||६||
  
तप्तलोहगोलास्त्र भिरकाव ज्ञानाचे
थरथरू दे मातल्या काळोखास
सडेतोड कर प्रहार त्या तमी
चेतव स्वतःप्रत अटळ विश्वास ||७||

माळून विजा वेणीत सये
घे परखड विचारलेखणी
दुरितास लयाला तूच नेशी
जागव आतली रणरागिणी ||८||

त्या क्षितीजाच्या पल्याडही
तू झेप अशी घे खरोखरी
बनव तुझा तू मार्ग असा की
करू शकेल ना कुणी बरोबरी||९||

स्वयंसिद्धा तू इतिहास घडवण्या
क्रांतीज्योती तुझ्यातच 'साऊ'        
 घडवण्यास शिवबा उद्याचा
तूच दैदिप्यमान सक्षम जिजाऊ ||१०||


रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. 7/4/19