*दि. २९/६/२०२२*
*काव्यप्रकार - अष्टाक्षरी*
आनंद पेरणी
पेरु तेथ समृद्धता
मने जेथ उजाडली
'वनमाळी' वाहिलच
दिनरात 'त्या' पखाली... ||१||
आनंदाचे येता दाणे
पुन्हा यावे ते पेरता
समाधान सुख खरे
यावे पदरी झेलता...||२||
संस्कारांची रुजवण
नव्या कळीला ये गंध
माणूसपणाची जाग
प्रकाशाशी बांधू 'बंध'...||३||
संवेदना मनातली
अलगद अंकुरावी
जाणिवेची 'धाव' मना
जावी नेणिवेच्या गावी... ||४||
सुंदराचा वेध लागो
पिकवाया ज्ञानमळा
क्षण एकही मोहाचा
तुच्छ वाटो माझे डोळा...||५||
गुंतागुंत पेच सारा
अंथरला सभोवती
मनी मळभ घागरी
रित्या करु तरी किती?...||६||
उत्तरांस पडलेले
प्रश्न करती आकांत
आकाशाच्या विरहाने
धरेसही पडे भ्रांत...||७||
कुणी पेरली रुक्षता
कुणी फासले हे काळे
ग्रासलेल्या विचारांनो
तोडा आतातरी जाळे...||८||
पुन्हा पुन्हा जन्म देई
मज आनंद पेराया
नको मोक्षाचे 'बा' दान
होण्या निष्प्रभ ही 'माया'...||९||
काव्यरचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका
मालेगाव खुर्द
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा