कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, २३ जानेवारी, २०२२

✨ *तडका ताजेपणाचा* ✨

 ✨ *तडका ताजेपणाचा* ✨


आत्मविश्वास अन् जिद्द बाळगून

नकार सारे झुगारून फेकू

सत्ययुगाची पुन्हा निर्मिती

करण्यास पाऊले पुढती टाकू... १


कळस यशोमंदिराचा गाठण्या

करु शिकस्त प्रयत्नांची

मर्म जाणूनी नरजन्माचे

होळी चेतवू अहंभावाची... २


प्रेरणापंखांनी घेऊ उत्तुंग भरारी

करुया ठाम निर्धार मनाचा

माणसाने  'माणूस' व्हावे

भाव जागवून माणुसकीचा... ३


दुर्लक्षित करुया सदैव ते 

भ्रमित करणारे जरी भास

घेऊ रचावया हाती आता

भव्य दिव्य नवइतिहास... ४


निरपेक्ष चालून कर्तव्यापथावर

सांडूया अडसर आसक्तीचे

आपसूक मग पडेल पदरी

मृदूल पुष्प आनंदयशाचे... ५


सामावून या कवेत घेऊ

अथांगता आभाळाची

गाडूनी बोथट विचार सारे

कसली पर्वा हो चौकटीची ... ६


मी कोण आणि कुठला? 

मज झाली ही जाणीव 

श्वास होते येत जात 

आज झाले ते सजीव... ७


सजगता व्याली स्वानंद 

'माणूसकी'च्या तेवल्या ज्योती

अमृताने न्हाऊन निघाली

तन, मन आणि मती...७


तुफान जाहल्या अनलज्वाला

थंडावलेल्या विचारलहरी 

तुच्छ आम्हापुढती आता

कळीकाळ कोपला जरी...८


मागे वळूनिया आता

नाही  पुन्हा ते पाहणे

मरगळ म्हणजे काय हो? 

ध्यास फक्त 'जिंकणे' ...९


प्रेम, हास्य संपदा खरी

मैत्रभाव हृदयी जागवू

माय होऊन हळूवार 

कळ्या साऱ्याच फुलवू...१०


मीच मजला जाणता

 शून्य जाहले विकार

अमृताचा स्पर्श होता

देखिला हो निराकार  ...११


अद्भुताने भारलेल्या 

अदम्य, दीप्त क्षणांचा 

जागृतीचा जाणिवेच्या 

हा 'तडका ताजेपणाचा' ...१२


रचना

©शिल्पा म. वाघमारे

स.शि. मालेगाव खुर्द​

ता.गेवराई जि.बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: