कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
स्त्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ मे, २०२३

सखी शुभेच्छा

 शुभेच्छा काव्य 


शुभेच्छा देत मनस्वी

सोज्ज्वळ माझ्या सखीला ..

गुणी, सोज्ज्वळ, सालस

कवयित्री सुहासिनीला...


तुझ्या शब्दांचा गोडवा

तुझा सहवासानुभव

बहरुन गेला सखे गं

माझिया मनाचा गाव...


बहरत राहो जीवन तुझे

मोहरल्या नवदिवसांसवे

धागे मनाचे गुंतलेले

अजोड ऊबदार अंबर  व्हावे...




रचना 

शिल्पा म वाघमारे

स शि बीड

दि २३. १२.१९

मंगळवार, २८ मार्च, २०२३

स्त्री.... बाई


बाई


स्त्री नव्हेच केवळ देहरुप

ती सोनं आहे कसलेलं

विश्व अवघं तिच्याठायी

विविधांगी नटलेलं...||१||


तुझ्या डोळ्यातलं सुखचित्र 

पाहण्या ती क्षणक्षण अधीर

तिच्या सुखाची ही संज्ञा

कल्पनातीत आहे सारं...||२||


अनोखीच निर्मिती 'ती'

निर्मातीही संसाराची

नाही होणार तिच्याशी

बरोबरी गं कोणाची... ||३||


लेक,सखी,ताई,आई

भोगे सासुरवाशीण

एका-एका वाटेवर

काटे घेतीया टोचून... ||४||


जग करते पूजन

नदीमाय नि गायीचे 

लक्ष्मी म्हणवता 'दारा'

का ती वहान पायीचे... 

||५||


सदा दुःखाचीच सल

बाई उरात दाबते

येते माहेर सोडून

नव्या संसारी साजते...||६||


माऊलीच्या हृदयात

माया मधाळ पाझर

यत्ने आटणार नाही

काय वर्णू  मी पामर...||७||


मनी माया फुलविते

चिंता मनाचा कालवा

कधी कळला का बाळा?

तिच्या पान्ह्याचा ओलावा...||८||


नयनी आसवांचा पूर

आनंदाचा गं दुष्काळ

संसाराच्या काळजीने

मनी जपे हिरवळ...||९||


म्हणे नको 'ती'पणती

हवा 'दिवा' ग वंशाला

सासू, नणंदांकरवी

गालबोट स्त्री जन्माला...||१०||


वंदा सावित्रीला मनी

मुजरा जिजा,अहिल्येला

सप्तसूर्यतेजाठायी

आसमंतही लाजला... ||११||


विवेकास जागवून 

'बाई' जाण तू ही खरी

तिच गंध बकुळीचा

मंद ज्योत तेवणारी... ||१२||

बुधवार, ११ मे, २०२२

अनुपमा.. स्त्री


 अनुपमा

कोण ही? हिला कुठेतरी
पाहिल्यासारखं वाटतयं
हो... तीच ही मनात जिच्या 
मळभ चिंतांचं दाटतयं ...१ 

पहाटेपासून संसाराच्या काळजीत
काम काम अन् कामाच्या पाठी 
ती जगत आहे रे केवळ 
क्षण तुझे नव्याने बहरण्यासाठी...२

आई, ताई, सखी साऱ्या 
अनुपम रंगांनी असते नटत 
रांधा, वाढा...कायमच आहे 
चारभिंतीबाहेरचंही जग सावरत... ३

मंडई, किराणा,अभ्यास मुलांचा
बाळाचं सारंकाही पाहते
आला गेला पै पाहुणा
तरी दुखणी मात्र अंगावरच काढते...४

एक दिवसही घरी 'ती' नसताना
काय होतोय अवतार घराचा
तूच तुला शोधतोस घरभर
सोडवत अनामिक गुंता मनाचा...५ 

आईही नित्य असतेच तुझी
तुझ्यात बापही कधी शोधणारी
सहचारिणी अर्धांगी तुझी
सखी स्नेहफुले उधळणारी... ६
 
तू कधी तरी समजून घे तिजला
'राहू दे' म्हणशील का?
माठातलं पेलाभर पाणी
हातानेच घेशील का?...७

तिलाही विचार कशी आहेस?
हात ठेवून खांद्यावर...
कपाळी चुंबन हलके देऊन 
बसंव ना जवळ घटकाभर...८

अन् बघ मग क्षणांतच 
आभाळ तिचं भरुन जाईल..
'नको रे काम पडलीत' म्हणत
नव्या उमेदीनं पुुन्हा सुरु होईल...९

सोप्पं असतं खूप सगळं
तू जाणीव फक्त सजीव हो
पेलते सारं आकाश तुझं ती
तू प्रेरणा तिची आजीव हो...१०

रचना
शिल्पा म. वाघमारे 
जि बीड

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

स्त्री... म्हणजे

 स्त्री... 


स्त्री म्हणजे फक्त देहरुप

अन् सामान्य असं काही नसतं

तिच्यामध्ये विश्व अवघं

विविधांगी नटलेलं असतं...


अथकं राबणाऱ्या हातासंगे

मन सैरभैर चिंतातूर नुसतं

अन् बोलणारांचं काय जातं...

म्हणे मन नारीचं चंचल असतं..


जग सारं अवचित सुन्न झालं

कामही सुटली हातातली.. 

काळजात जिनं संसार थाटला

ती कधीच नसते थांबलेली...


घरं स्वप्नीचा महाल असतो

भिंतीचा आड येत नाही

सारं आलबेल असावं

एवढीच लगबग तिच्या ठाई...


तुमच्या डोळ्यांतील सुखचित्र

 पाहण्या ती  क्षणक्षण अधीर

तिच्या सुखाची हो संज्ञा

कल्पनातीत आहे सारं...



शिल्पा


शुक्रवार, १५ मे, २०२०

स्त्री.. वाघीण कारभारीण



       वाघीण कारभारीण

माय माऊली धरा ही
किती साहते वाहते
तुझ्या माझ्या पोटासाठी
घास मोतियांचा देते...१

धनी राबतो जसा रानी
जीवा शिवाच्या साथीनं
सव्वाशेर त्याची हो पठ्ठी
आहे वाघीण कारभारीण...२

मर्दानी ती या अवनीसम
पाठी संसार वाहते
चूल-मूल सांभाळत कौशल्ये
खांदा खांद्यासही लाविते...३

न्हाते घामाच्या धारांत
जीव मातीत गाडते
संसाराच्या फिकिरीनं
रानी नांगर लोटते... ४

निसर्गाचं दान पदरी
काया कोवळी लाभली
ऋण फेडाया धन्यासंग
तिनं हिम्मत बांधली... ५

थिजे प्रज्ञा,गोठती शब्द
महिमा तिचा गाण्यासाठी
चपराक आहे ती गालीची
'अबला'म्हणत हसणाऱ्यांसाठी...६

रचना
© शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
 ता गेवराई जि बीड
दि. १५.०५.२०२०
=:=:=:=:=:=:=:=:=:=:=:=:=

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

तुझीच ती...

तुझी 'ती'

पहाटेपासून संसाराच्या काळजीत
काम काम कामच करते...
जगत आहे कशीबशी
क्षण तुझा नव्याने बहरत आहे ..

कधी आई होऊन कधी सहचारिणी
ती अविरत झटत राही.
घरी गरम जेवण, ऑफिसात डबा
तुझा असलेला रुमालही ती कधी विसरत नाही.

मंडई, किराणा, अभ्यास मुलांचा
बाळाचं सारंकाही तीच पाहते आहे..
आला गेला पै पाहुण्याचं
सादर पाहुणचार करत
उठत बसत दुखणी सारी अंगावरच काढत आहे.

एक दिवस घरी ती नसताना
काय होतोय अवतार घराचा
तूच तुला शोधत असतोस घरभर
अन् सुटता सुटत नाही
अनामिक गुंता हरवलेल्या मनाचा

ती अन्नपूर्णा, शारदा, लक्ष्मीही
ती आई होते आजारपणात तुझ्या
कधी... सखी प्रेमप्याले ओतणारी शय्येवरची मदना

तू कधी तरी समजून घे तिजला
'राहू दे' म्हणशील का?
माठातलं पेलाभर पाणी
हातानेच घेशील का?

तिलाही विचार कशी आहेस?
हात ठेवून खांद्यावर...
कपाळी चुंबून हलके देऊन 
बस म्हणशील का घटकाभर...

अन् बघ मग क्षणांतच आभाळ तिचं भरुन जाईल..
'नको रे काम पडलीत' म्हणत... नव्या उमेदीने ती पुुन्हा सुरु होईल...
सोप्पं असतं खूप सगळं
तू जाणीव फक्त सजीव हो
पेलते सारं आकाश तुझं ती
तू प्रेरणा तिची आजीव हो...

रचना
✍🏻शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका 
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द 
ता गेवराई जि बीड

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

धिक्कार असो...

धिक्कार असो (रौद्ररस)


धिक्कार असो.....
धिक्कार असो त्यांचा
मर्द म्हणून मिरवणाऱ्या
नररुपी वासनांध जीवाचा ||१||

पुरुषांच्या वेशातील
क्रूर त्या गिधाडांच्या
आदर शब्दच स्त्रीसाठी
नाही शब्दकोशी ज्यांच्या ||२||

वासनांध कुत्र्यासम
नजरा त्या भिरभिरत्या
जाळं टाकून बसलेल्या
निष्पाप तिच्या देहावर 'त्या' ||३||

बाई फक्त विषयवस्तू
एवढंच तोकडं ज्ञान
ज्ञान म्हणावं का पण?
हा तर ज्ञानाचा अपमान ||४||

विकारी वासनांत ते
सदान् कदा बरबटलेले
त्यांच्या क्षणिक सुखासाठी
श्वास तिचे घुसमटलेले ||५||

त्या कोवळ्या जीवाची
ती अस्ताव्यस्त अवस्था
त्या माजलेल्या अधमांपायी
तिने का सहावी ही व्यथा? ||६||

तिला नाहीच का भविष्य? 
जीवंत किंकाळी ती मौनातली
अखंडपणे चिरकणारी
फक्त तिच्याच सुन्न जगातली||७||

पुन्हापुन्हा मनभित्तिकांवर
आदळून कानी घुमणारी
क्षणोक्षणी भय दावणारी
नि कधी न विसरणारी ||८||

संपूर्ण विश्वच तेव्हा जणू
धगधगत पेटून उठतं
चवताळून उठलेलं जगही
मावळतीसह विरुन जातं ||९||


माहित नाही त्यांना माणुसकी, संस्कृती...
नेमकी कशासोबत खायची?
अशा काळी देवा तूही केवळ
आंधळ्याची सोंगं घ्यायची?||१०||

कुठे मागावी दाद? नि
कुणाकडे मिळेल रे न्याय?
कोवळ्या हातांमध्ये नसतंच काही
धाय मोकलून रडल्याशिवाय
||११||

आसूरी आनंदात आकंठपणे  
 बुडालेल्या नीच नराधमांना,
"स्त्री म्हणजे खेळणे नव्हे"
मृत्यूदंड देऊनच सांगा तयांना
||१२||


रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि. बीड
दि.18.10.2018

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

महिमा स्त्री जन्माचा

महिमा स्त्री जन्माचा


ओवी सांगे तुम्हा माझी
 महिमा स्त्री जन्माचा
घ्या ना समजून 'ती'ला
होईल उद् धार युगांचा||१||


अनोखीच निर्मिती 'ती'
निर्मातीही संसाराची
नाही होणार तिच्याशी
 बरोबरी गं कोणाची ||२||

लेक,सखी,ताई,आई
भोगे सासुरवाशीण
एका-एका वाटेवर
काटे घेतीया टोचून ||३||

माऊलीच्या हृदयात
माया मधाळ पाझर
यत्ने आटणार नाही
काय वर्णू  मी पामर ||४||

सदा दुःखाचीच सल
बाई उरात दाबते
येते माहेर सोडून
नव्या संसारी साजते ||५||

म्हणे नको 'ती'पणती
हवा 'दिवा' ग वंशाला
बट् टा लावते का बाई
स्वतः स्त्रीच्याच जन्माला ||६||

मनी माया फुलविते
चिंता मनाचा कालवा
कधी कळला का बाळा?
तिच्या पान्ह्याचा ओलावा ||७||

नयनी आसवांचा पूर
आनंदाचा गं दुष्काळ
संसाराच्या काळजीने
मनी जपते हिरवळ ||८||

जग करते पूजन
नदीमाय नि गायीचे
घरची लक्ष्मीच सांगा
का हो वाहन पायीचे ||९||

वंदा सावित्रीला मनी
मुजरा जिजाऊ,अहिल्येला
सप्तसूर्यतेजाठायी
आसमंतही लाजला ||१०||

'बाई' जाण खरी मनी 
विवेकास जागवून 
तव निर्मळ मनास 
देई जाणीव करून ||११||


रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 10.03.2019

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

सखी तू स्वयंसिद्धा

  सखी तू स्वयंसिद्धा 

ओलांडून उंबरठा ये बाहेरी
सखे मुक्ताकाशी घे झेप
मळभ सार सारे अंतरीचे
पुनः नोहे ही संधीची खेप ||१||

हाक ऐक सखे अंतरीची
बंधने व्यर्थ ती सारी तोड
खुणावती तुज सुवर्णसंधी
का ही आयुष्याशी तडजोड?||२||

पुरुषप्रधान संस्कृतीला
लादून ते मोकळे झाले
तुझे कोंडलेले श्वास ते
कधी कुणा का जाणवले? ||३||

उंबरठ्याच्या बाहेर ये तू
ओलांडून निर्बंधांचे माप
मागे वळून पाहू नकोस
हात रोखणारे जरी अमाप ||४||

गृहपंजरीचा झालीस रावा
परंपरा युगांची तोड सखी
कोमलतेस कमजोरी ठरवून
विषप्यालाच तुज दिला मुखी ||५||

त्या चार भिंतींना तू ही
मानून बसलीस विश्व खरे
मुकलीस ना गं मुक्तजीवना
 तन-मन-धन अर्पूनही सारे ||६||
  
तप्तलोहगोलास्त्र भिरकाव ज्ञानाचे
थरथरू दे मातल्या काळोखास
सडेतोड कर प्रहार त्या तमी
चेतव स्वतःप्रत अटळ विश्वास ||७||

माळून विजा वेणीत सये
घे परखड विचारलेखणी
दुरितास लयाला तूच नेशी
जागव आतली रणरागिणी ||८||

त्या क्षितीजाच्या पल्याडही
तू झेप अशी घे खरोखरी
बनव तुझा तू मार्ग असा की
करू शकेल ना कुणी बरोबरी||९||

स्वयंसिद्धा तू इतिहास घडवण्या
क्रांतीज्योती तुझ्यातच 'साऊ'        
 घडवण्यास शिवबा उद्याचा
तूच दैदिप्यमान सक्षम जिजाऊ ||१०||


रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि. 7/4/19

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

नवरंग नवविचार..... पण 'ती'

💫नवरात्र..नवरंग..नवविचार💫


      👧🏻 *पण'ती'* 👧🏻
🌈
नवरंगांचा हा साज लेऊनी
सये विचार रुजवूया नवा
पण'ती च असे जर मालवलेली
मग तेवेल का वंशदिवा?.... *१*

💜
*जांभळा* जागवी संयम मनाचा
क्षोभ-शांतीचा जो अजब मिलाप
'ती' आदरमुर्ती,नसे विषयवस्तू
विझवी नरा तव विकारांचे ताप... *२*

🌕
*पीत* रंग सांगतो सदा
मनभावना जपा कोमलतेची
लेक जन्मली जर घरी तुमच्या
गुढी उभारा तेथ आनंदाची... *३*

💚
अस्तित्व स्त्रीचे माहेरी- सासरी
असे समृद्धी जीवन वेलीची
रंग *हिरवा* वदे संदेश अटळ
निर्माती ती खरी जगत् वंशाची... *४*


निर्मळता आणि औदार्य
*श्वेत* संकेत देई पावित्र्याचा
देऊया समान अधिकार
चला दुहितेसि शिक्षणाचा... *५*

🔶
दिव्यज्ञान जागवी *नारंगी*
प्रदिप्त करितसे आभा
नारी ही माता भगिनीसम
मनी वसू द्या सन्मानप्रभा... *६*

🔳
*करडा* रंग वदे तटस्थता
अंतराचे मूळ तत्त्व नित्य
तटस्थता तीच नजरेत असावी
अबला नाही ती हेच सत्य... *७*

🔴तीच ऊर्जा, शौर्या, चैतन्याही
अर्पित वाहे ममत्व निर्मला
'तांबडा' खुणावे सावध होण्या
अन्यायाविरोधी तीच अनलज्वाला
... *८*

🔵
*नील* रंग तो अथांगतेचा
विशालता नि अद्वैताचा
 नकोत आता स्त्रीभ्रूणहत्या 
संहार करा त्या कुविचारांचा... *९*

🌸
दिलखुलास हो 'गुलाबी'
रंग प्रितीचा विशुद्ध
पुरे पुरे चर्चा बाष्कळ
सदाचरणास होऊ सिद्ध... *१०*


✍️ ✍️ ✍️
  र च ना
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि.14.10.2018

आदिशक्ती

स्त्री आदिशक्ती

मी उगम शक्तीचे,
  मी सामर्थ्य भक्तीचे
    मी  छेदन आसक्तीचे
       नि तेज दिव्यतेचे...१

मी साकार रुप जगातचे
  मी क्षालन पापकर्मांचे
    मी प्रतिरुप निर्मिकाचे
       नि स्वरूप चैतन्याचे... २

मी प्रहार अज्ञानाचा
  मी संहार दृष्टजनांचा
    मी प्रतिकार वासनांचा
      नि वार भ्रष्ट आचारांचा...३

मी आस दुःखितांसाठी
  मी श्वास पिडीतांसाठी
    मी ध्यास ध्येयवेड्यांसाठी
       नि विश्वास भाविकांसाठी...४

मी धरा आधाराची
  मी स्वरा गीतांची
    मी मधुरा वाणीची
       नि वीरा रणांगणाची...५

मी सत्त्व ज्ञानाचे
  मी ममत्व मातेचे
    मी तत्व जीवनाचे
      नि महत्त्व विश्वाचे... ६

मी मृदूता कुसुमांची
  मी असीमता नभाची
    मी चंचलता मनाची
       नि स्थिरता मतीची...६

मी चारित्र्य नीतीचे
  मी पावित्र्य प्रितीचे
     मी मैत्र निर्मळ मैत्रीचे
        नि चित्र अद्वैताचे...७


रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि.3.12.2018स्त्री आदिशक्ती

मी उगम शक्तीचे,
  मी सामर्थ्य भक्तीचे
    मी छेदन आसक्तीचे
       नि तेज दिव्यतेचे...१

मी साकार रुप जगातचे
  मी क्षालन पापकर्मांचे
    मी प्रतिरुप निर्मिकाचे
       नि स्वरूप चैतन्याचे... २

मी प्रहार अज्ञानाचा
  मी संहार दृष्टजनांचा
    मी प्रतिकार वासनांचा
      नि वार भ्रष्ट आचारांचा...३

मी आस दुःखितांसाठी
  मी श्वास पिडीतांसाठी
    मी ध्यास ध्येयवेड्यांसाठी
       नि विश्वास भाविकांसाठी...४

मी धरा आधाराची
  मी स्वरा गीतांची
    मी मधुरा वाणीची
       नि वीरा रणांगणाची...५

मी सत्त्व ज्ञानाचे
  मी ममत्व मातेचे
    मी तत्व जीवनाचे
      नि महत्त्व विश्वाचे... ६

मी मृदूता कुसुमांची
  मी असीमता नभाची
    मी चंचलता मनाची
       नि स्थिरता मतीची...६

मी चारित्र्य नीतीचे
  मी पावित्र्य प्रितीचे
     मी मैत्र निर्मळ मैत्रीचे
        नि चित्र अद्वैताचे...७


रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि.3.12.2018