कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
सांस्कृतिक मंडळासाठी... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सांस्कृतिक मंडळासाठी... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

रजा शरदाने घेता
आला हेमंत शिशिर
चुणुकली गुलाबी ही
थंडी भरे शिरशिरं... १

लागे चाहूल थंडीची
शाल धुक्याची धवल
रवी बरसे अमृत
रुप सृष्टीचं सजलं... २

श्वास भिजू दे श्वासांत
देई साद गोठलेला
विरघळे जीव जीवा
मिठीमध्ये थिजलेला... ३

तुझा सहवास मज
वाटे प्रिया हवाहवा
देही झोंबता गारवा
चेतवतो रे वणवा... ४

तनु पुन्हा शहारली
मधू प्रीत जीवघेणी
सेज सजलेली ये ना
गाते मारवा यामिनी... ५


रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शिि. जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि १६.१२.२०१६ 

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

का???...

का???


माजलेल्या दानवांचा,या भुईला भार झाला
अधमांच्या निर्लज्जपणाचा, कळस आज पार झाला ... धृ

जीवनाला रंग देऊन, सजवते जी जग तुझे
त्याच मातेसाठी का रे , दुर्दैवी तू काळ झाला... १ 

पावित्र्य सिद्ध करण्यास स्वतःला, निखाऱ्यांत घेते जाळूनी
त्या सीतेचा सांग ना रे , का न मग तू राम झाला...२

निमित्त करुनी चिंधीचे, शील राखी नारीचे
माधवा त्या विस्मरुनी , तू कसा अश्लील झाला...३

मलिन कर्मसुतांवरी या, श्वास जे  आधारले
तयांस कापण्या स्वये तू का, तलवारीची धार झाला... ४

प्रेम संयम प्राशून बघ ना, एकदा विकारा सांडूनी
दुष्कृत्याचे बीज पेरण्या, मायेवर का स्वार झाला...५

बाग कोमल जीव सारे, प्रितीनेच सिंचणार
अंधाराचा भक्त नि तू, वासनेचा आहार झाला... ६

अंतरीचा ठाव घे प्रभू, थरार थांबव धाव घे
अल्पमतीवर भडीमार माझ्या, अन् जीवाचा खार झाला... ७

रचना
©शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका
मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड 
दि ३०.११.१९.. 4.47pm

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

मी सबला



            मी सबला...

कोण आहेत ते लोक जे
नारीला अबला ठरवतात
शारदा, दुर्गा नि लक्ष्मीच्या
फक्त मुर्तीच का ते पुजतात?... १

वंदितोस जिजाऊ अभिमानाने
लक्ष्मी, अहिल्येसम रणरागिनी
पुरुषार्थ मिरव ना जगी खरा
मनी भाव तोच तू उमलवूनी...२

तू "तू" आहेस तुझेठायी
अन् मी "मी" आहे माझ्यापरी
निसर्गाची अद्भुत निर्मिती
समजून घेऊया का आतातरी...३

निर्बंध लादणे सोड आता
समशेर बडी दे 'ती' च्या करी
स्वयंतेजा 'ती' निःशंक रहा तू
नको पेरु मनी त्या कमजोरी...४

अबला म्हणवून नकोस विझवू
जागू दे सुप्त चेतना अंतरीची
शब्दपिंजऱ्यात जखडूनी चपला 
करु पाहसी मस्करी सृष्टीची... ५

तूच पेरले कधी बीज जे
फळ तयाची चाखतो आहेस
तुझीच  ताई, दारा, छकुली
भयभीत क्षणोक्षणी पाहतो आहेस...६

सबला आहे नारी जगती या
प्रतिमा निर्मात्या सृष्टीची
सार काजळी, कर दे करी 
नांदी येथेचि येईल स्वर्गाची... ७

रचना
शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि ७.१२.२०१९
३.४० pm

सोमवार, २ डिसेंबर, २०१९

उत्तुंग भरारी



               उत्तुंग भरारी

आत्मविश्वास अन् जिद्द बाळगून
नकार सारे झुगारून फेका
सत्ययुगाची पुन्हा निर्मिती
करण्यास पाऊले पुढती टाका... १

कळस यशोमंदिराचा गाठा
करून शिकस्त प्रयत्नांची
मर्म जाणूनी नरजन्माचे
होळी चेतवू अहंभावाची... २

प्रेरणापंखांनी घेऊ उत्तुंग भरारी
करुया ठाम निर्धार मनाचा
माणसाने  'माणूस' व्हावे
भाव जागवून माणुसकीचा... ३

दुर्लक्षित करुया सदैव ते 
भ्रमित करणारे जरी भास
घेऊ रचावया हाती आता
भव्य दिव्य नवइतिहास... ४

निरपेक्ष चालून कर्तव्यापथावर
सांडूया अडसर आसक्तीचे
आपसूक मग पडेल पदरी
मृदूल पुष्प आनंदयशाचे... ५

सामावून या कवेत घेऊ
अथांगता आभाळाची
गाडूनी बोथट विचार सारे
कसली पर्वा हो चौकटीची ... ६

रचना
©शिल्पा म. वाघमारे
स.शि. मालेगाव खुर्द​
ता.गेवराई जि.बीड
दि ०२.१२.१९
३.४५ pm

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

क्रांतिज्योती

महात्मा ज्योतिबा फुले ...


ज्योती कसली, ती धगधगती
मशाल होती ज्ञानक्रांतीची
तमास हरवले असे तयांनी
आभाही लाजली सूर्याची...||१||

तूफानांचाही हाणून पाडला
डाव अनोख्या ढंगात
बहु साहले, आपदा झेलित
आम्हा रंगवूनी ज्ञानरंगात...||२||

फुलवले माळरानावरही
खळखळते सुहास्य मुक्त
पंख होऊन विश्वासाचे
दिधले एकीचेही सुक्त...||३||

संगिनी जणू रणरागिणी
घेऊनी लढवले अवघे समर 
ज्ञानाची ज्योती देऊन करी या
युगयुगे झालेत अमर...|| ४||

 जागवू चला मन, मती पुन्हा 
मनमानी चालली जिथे जिथे 
 अधर्म, अंधश्रद्धधेस जाळण्या
ज्योतीच होऊया तिथे तिथे....||५||

रचना
@©शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि २८.११.२०१९

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

एकाकी



        एकाकी


शीर्षक : एकाकी

आज पिकले पान मी
काल काही और होते
सुरांच्या मैफिलीतला
मी ही धुंद सूर होते... १

आज बाग ही मनाची
फुले ती आठवणींची
काल होती किलबिल
मनगाभारी पाखरांची... २

आज भयाण हे जग
माझ्या सुन्न करी जीवा
होती रंगीत दुनिया
रंग कोणता हा नवा?...३

आज पिल्ले माझी सारी 

झालीत मजला पारखी

ओळख ना देई कोणी
जणू की परक्या सारखी...४

माझा लळा, प्रेम, माया
काल होते त्यांना हवे
पंखांमध्ये येता बळ
आकाश शोधले नवे...५

होती जगण्याची आशा
आस आणि स्वप्ने नवी
निराशेचे हे मळभ नि
नित्य मृत्यूला आळवी...६

रुक्ष पिकले पान हे
आहे पानगळ बाकी
कवडसाही न तमी या
आज फक्त मी एकाकी...७

रचना
© शिल्पा म. वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड 



गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

संसार (षडाक्षरी)

संसार (षडाक्षरी)

कसा हा संसार
कधी उमगेना
फक्त वाहते मी
का ते समजेना..

कर्म कर्तव्याच्या
पथावर स्थिर
ओढती विषय
मज का सत्वर...

किती मी सांभाळू
तोल जाऊ पाहे
वारे शुष्क सारे
ओल सरु पाहे..

प्रेम शुद्ध सारे
वाहुन टाकले
तरी संसाराने
मज अव्हेरले...

मोल नच कोठे
हृदये दुष्काळी
तूच तार आता
येई वनमाळी...

नको देऊ मोक्ष
अपात्र त्या ठायी
तोड जन्मबेडी
शरण दे पायी...

रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि ०१.१०.२०१९

आधार षडाक्षरी

 आधार (षडाक्षरी)

आधार चरांचा
धरणी माऊली
घास देई ओठी
दुःखात सावली...

तीच एक माय
वाहे सारा भार
खांद्यावरी तिच्या
नांदतो संसार...

तुझ्या माझ्यासाठी
वैशाखी तापते
उगवाया घास
भादव नाहते...

जाहले निसूर
बीज मी टाकून
तया अंकुरण्या
देतसे झोकून...

समसमानच
सर्वांवरी माया
लेकरांच्यासाठी
झिजवीते काया...

जाग रे माणसा
ऋण तिचे जाण
पदरात तुझ्या
सुखाचं हे दान...

श्वासांची तुझ्या रे
दोरी तुझ्या हाती
तोड स्वार्थ-बेडी
जप खरी नाती...

शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि २७.०९.२०१९

चिंता षडाक्षरी

चिंता

निरर्थक आहे
मना तुझी चिंता
सहज जीवनी
वाढविसी गुंता...१

आपसूक वाढे
गुंतागुंत पेच
येथे विचारांची
फक्त खेचाखेच...२

नित्य धगधग
चिंतेच्या चितेत
मालवत जाते
आनंदाची ज्योत...३

कर्म कर्तव्याच्या
पथावर स्थिर
चाल निरंतर
नको सोडू धीर...४

विकार त्यागून
होय मुक्त राजा
स्वमन जिंकून
दुःख कर वजा...५

वाळवीच जणू
विषय आसक्ती
हरीनाम जप
मना कर भक्ती...६

चिंता ही व्यर्थच
ठिणगी चेतवी
विषय आसक्ती
खोलात बुडवी...७

 रचना
©शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

हो मतदारा जागा...

हो मतदारा जागा...

सत्पात्री दान कर मतदारा
तू दाता लोककल्याणकारी
आमीषास  पडू नको बळी
नमवून प्रतिभा खरी...१

केवळ काही क्षणांचे
कर्तव्य पाडूनी पार
जनसामान्यांना नेण्या
उज्ज्वल प्रगतीपथावर... २

हक्क तुझा हा मतदान
बजावून सामर्थ्याने
कर्तव्य करी राष्ट्रीय
घालवू नकोस अविचाराने... ३

ही सुवर्णसंधी जाण
होई मतदारा जागा
निसटून काळ हा जाता
तुझा व्यर्थच ठरेल त्रागा... ४

तू जागव जनमाणसा
होऊन त्यांची प्रेरणा
तेजप्रवाह तुझ्याच हाती
तू मशाल हो नवतरुणा... ५

रचना
शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका  जि प प्रा शाळा,
 मालेगाव खुर्द
 ता गेवराई जि बीड
दि. २०.१०.२०१९

दिव्यपदिपावली दिवाळी

दिव्यदिपावली
==============

लक्ष लक्ष दीप प्रज्वल
आसमंतास  उजळतील
दीपावलीचे पर्व पावन
तम मनातील क्षालतील...१

आगमन दिपोत्सवाचे होता
सकल तिमीराचा होईल अंत
उत्सव व्हावा मनामनांचा
फुलावे हास्य, नुरावी खंत...२

कुंद कळ्या त्या आनंदाच्या
सजाव्या जीवन वेलीवरी
गंधीत होईल जगत मनाचे
साद घाल त्या अलगद हसरी...३

पणत्यांच्या लखलखाटाने
पुनव भासे अवसयामिनी
पूजन जरी हे विष्णूप्रियेचे
आदरावी जीवनसंगिनी... ४

कन्यारुपी लक्ष्मींचाही
बाळगावा अभिमान
मग अपुली वा परकी ती
मनी ठेवा मानसन्मान... ५

प्रकाशाने लख्ख व्हावी
 सकल अंतरांची दालने
काळोखाची शाल फेकून
प्रितीसागर व्हावी लोचने...६

दिव्यप्रकाशात चिंब व्हावे 
 मनी जागावी निरागसता
स्वार्थ,असुया विरुन जाव्या
 गंधाळून जावी मानवता ...७


रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
  
दि २६.१०.२०१९
================

शांती (ओवी)

शांती... (ओवी)

सुखे सारी वरवर
संपत्तीची भरमार
समाधान नाही जर
अशांतीच मनात...१

जीव झिजला झिजला
मातीमध्येच विझला
घर्मधारांत भिजला
तरी न दिसे सुख...२

बाल्य तारुण्य जराही
सांजा निवत तीनही
शांती दिसेना कुठेही
कोडे सुटेना आता...३

पांडुरंगा महादाता
मज वाहते मी आता
तुझे पायी भगवंता
चिरशांती लाभेल...४


रचना
शिल्पा म वाघमारे
स शि बीड

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

@ किशोर कविता प्रिय तरुवरा

: प्रिय तरुवरा... 

चल दोस्ता,जीवलगा
क्षमा कर ना एकदा
गंभीर माझा गुन्हा रे
तरी साहले तू कैकदा..

आधाराचा हात तू तरी
 मी अंधपणे झिडकारला
काळोखात ढकलूनी
उद्याच्या रंगीत पहाटेला...

हिरवे मैत्र जपण्यासाठी 
तप्त झळा तू झेलतो
तमा न वादळांची केली
विनातक्रार विष प्राशतोस..

आम्हा सजीवसृष्टीसाठी 
नित्य फलामृते ती मधुर
मनुजास ना कळाला
भावमहिमा गूढ थोर..

भोगतो आहे भोग आता
मलिन माझ्याच कर्माचे
डोळे उघडले अकस्मात
भयकाळोख दाटता मृत्यूचे..

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 15.06.2019

आंबा

आंबा

डेरेदार तरुवर
येई मोहर वासंती 
घमघम आमराई
कोण गंध हा श्रीमंती...१

 मोहरली मन, राने
 राघू-मैना नि कोकिळ
 स्वर मंजुळ घुमतो
 कानी  कुहू-कुहू शीळ...२

 दिसामाजी जाती दिस
 लगडल्या पानोपानी
 गर्द हिरव्या इवल्या
 कैऱ्या पोपटाच्यावानी... ३

कांदा भाकरी न्याहारी
तोंडी कैरीची हो फोड
रसानेस करी मुग्ध
पक्वान्नांस देई तोड...४

वाट सरे औत्सुक्याची
रसरस पाड आला
गोडवा तो वर्णू काय
शब्द नाही उपम्याला... ५

आम्र फळ बहुगुणी
राजा शोभतो फळांचा 
ग्रीष्मसुट्टीतली मजा 
गाव आठवे मामांचा... ६

रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. 16.05.2019

रुसलेला पाऊस

रुसलेला पाऊस*


ये रे पावसा पावसा
का रे असा रुसलेला
गाल फुगवुनी का तू
ढगांमधे बसलेला        ॥१॥

"ये रे पावसा" हे गाणे
आम्ही कितींदा गायले
आमिषही पैशांचे ते
कैकवेळा दावियले      ॥२॥

सांग ना रे बापराजा 
कधी येशील तू खाली्
तुझ्याविना माझी माय
धरणीही व्याकुळली    ॥३॥

उभ्या जगाचा पोशिंदा
उभा तुझ्या वाटेवर
बेतू नये हे रुसणं
उद्या त्याच्या जीवावर ॥४॥
 
रान भेगाळले सारे
तुझ्या अशा रुसव्याने
बीज तिच्या कुशीतले
होरपळले उन्हाने      ॥५॥

चूक जाणतो मी माझी
तरी अजाणाचे सोंग
स्वार्थापायी वृक्षतोड 
मुढांपरी माझी ढोंगं     ॥६॥

हात माझे माखलेले
गळा घोटता वृक्षांचा 
अपराधी मीच खरा
गर्भातल्या त्या बीजाचा ॥७॥

यज्ञ-याग आणि नवस 
तुझ्यासाठी करताहे
त्याच यज्ञासाठी पुन्हा
जंगलेही तोडताहे   ॥८||

रचना✍✍✍

*शिल्पा म.वाघमारे*
स.शि.मालेगाव खुर्द
ता.गेवराई जि.बीड
दि.02.08.2018

तू, मी अन् पाऊस

 तू, मी अन् पाऊस

छत्रीने मला पावसात
भिजण्यापासून वाचवले...
प्रेमात चिंब होण्यासाठी मात्र
पाऊसच कारण झाले...

लाजण्याचा फक्त बहाणा
वाटे क्षणााततुज बिलगावे
गारव्यात भडकलेल्या
ज्वालांस कसे विझवावे...

मनात चलबिचल, काहूर
परी शब्द फुटेना ओठी
क्षण असेच हे थांबावे
प्रितफुला अपुल्यासाठी...

त्या अनामिक घटिकेचे
वेध आता लागले
सहावेना, राहवेना
ओठांत फक्त थांबले...

जड झाले तन, मन, 
धडधडीची बेफाम गती
सांगवेना, थांबवेना
अजब कशी ही सख्या प्रीती...

शोधते मी ही बहाणे
कारणांना चाळते
येत गाली लाज लाली
बोलायाचे मग टाळते...

प्रितीचं झुळझुळ पाणी
सदोदित वाहत राहावं
तुझ्या प्रेमभऱ्या शब्दांनी
जीवनाचं गाणं व्हावं...

रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड 🙏
दि. 2.4.19
11.40 pm

अंधाराची पहाट.. ओवी

अंधाराची पहाट


रवी येतो चढूनिया, बाई माथा डोंगराचा
अंधाराची होते पहाट, गर्व हरे काळोखाचा...1

झाडीते गं मी अंगण, हुरूप येतो पहाटेला
कमरेला नाही धीर, उभा जन्म संसाराला... 2

दळते गं, मळते गं, हसे भाकरी गालात
वाट पाहे शिदोरीची, धनी उभा गं दारात... 3

मायेला जी माया, सासू कशी ती जाणे ना,
तिच्या लेकीस जपे ती, मज लेक का मानेना... 4

घामाझोकील हा जीव, सदा कामात कुटला,
हात फिरवी जो माथी, आज बाप कुठं गेला... 5

क्षणोक्षणी माझ्या मनी, दाटे कसले काहूर,
मायेच्या पंखांवरी,थेट गाठावे माहेर... 6

सांजेला सांजवात, रात सजनाची मीठी,
पाडे विसर दुःखाचा, जन्म वाहे तयांसाठी... 7

डोळे मिटता रवीने, पुन्हा काळोखाचा थाट,
स्वप्नं लोचनी अधुरे, पहाटेच्या काळजीत... 8



रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि. 24.02.2019
10/6/19,

फॅड सेल्फीचे

 फॅड... सेल्फीचे


आजकालच्या माणुसकीची 
तुम्हा काय सांगू बात हो
बुडत आहे खरी माणुसकी
स्मार्टफोनच्या बेगडी जगात हो... १

दुर्जनांचे चेहरे बिभत्स 
हात तोकडे का झाले 
संकटात पाहून माणसाला 
कुणी ओळखेना झाले...२

माणूस बुडतोय,बघ माणसा
माणुसकीला तुझ्याच जिरवं
स्पर्धा कुठे करायची हे
सद्सदविवेकबुद्धीनेच ठरवं...३

मदतीसाठीच दिलेत खरे जे
हात अपुले पुढे कर
विश्वास देऊन बंधुसख्यांचे
होईल ते दुःख दूर कर...४

"फॅड" च्या नावाखाली मित्रा 
वाट तुझी तू चुकला आहेस
कर्तव्याच्या संधी सोडून खऱ्या 
माणुसकीला मुकलास आहेस...५

रचना 
शिल्पा म वाघमारे 
स शि.जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड 
दि २३.०१.२०२०


🙏🏻 अभंग दान धर्म ( )

: दान धर्म (शांतरस अभंग )


रत्न-कंकणांनी | हात का शोभती|
 सजती-खुलती | दानानेच ||१||

दानाचे महत्व | जाणावे पुराणी ||
सदा ते स्मरणी | असू द्यावे ||२||

नित्य, नैमित्तिक| काम्यरुपी दान|| 
 प्रकार हे तीन | ऋग्वेदात ||३||

सढळ हातांनी | करा सदा दान||
 नको अभिमान | अंतरात ||४||

कळो नये दुज्या|एका त्या हाताचे|
गंध कर्तव्याचे | मोहरावे ||५||

 वीर तो अमर| कर्ण महादानी|
 दातृत्वाचा धनी |युगे युगे||६||

दिव्य दानतत्त्व |अक्षय सुखात|
 येई पदरात | परतोनी||७||

जीवनात दान| सर्वश्रेष्ठ धर्म|
 तृप्तीचे हे मर्म | जाणुनी घे ||८||

निस्वार्थी ते दान |महादाता देव
 भोगतात जीव |जळी-स्थळी ||९||

सुपात्रास सदा| दान ते करावे |
 जगती दिखावे |करू नये ||१०||

विद्या, नेत्र, कन्या |दान श्रेष्ठ पुण्य|
 करी तोचि धन्य | जन्मांतरी||११||

चोहीकडे सृष्टी |नदी आणि तरु|
 करूनी घे गुरु| तयांसिच ||१२||

व्यय उपभोगी |लया जाई धन |
 दान आजीवन | न करी जो ||१३||

नांदी यावी मनी|नवविचारांची|
 आशा बदल्याची |नसो तेथे||१४||

रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि 16.01.2019
10/6/19, 07:33 

तुटलेली पतंग

: तुटलेली पतंग 

जीवनाच्या फुलत्या क्षणी
आनंदाचीच सारी उधळण
तुझ्या साथीने रे साजना
दुःखही झाले होते गौण...१

हरवलेली माझ्यात मी
तुझ्या मीठीत विरताना
लाजेत भिजलेली चिंब
अधरांत विरघळताना... २

का, कसे अचानक हे
विरहाचे पदरी काटे
ती काया मोहरलेली
नि हुंदका ऊरी या दाटे...३

स्पर्शाने गंधाळलेली ती
आज सुकून गेली कळी
का मीच अभागी प्रिया
मकरंद ना उरला दळी... ४


तुटलेली पतंग जणू मी
भिरभिरते विरह तुफानी
शोधते फक्त संग तुझा रे
या अनंत भयाण अस्मानी..५



रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 16.1.2019