कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, ७ जून, २०२०

@बालकविता मोराची युक्ती...

बालकविता


मोराची युक्ती... 

टुणटुण टुणटुण उड्या मारत 
माकड म्हणालं... ऐका हो ऐका... 
मोर, ससा, हरीण, हत्ती
साऱ्यांचा मग एकच गलका... १ 

खमंग खबर ऐकायला
डोळेही मग कान झाले
काय सांगणार मंकुबाबा
राघू-मैनाही आतुरले...२

काम टाकूनी हातातले
लगबग आली चिऊताई
सांगेन सारे.. काळजी नको
बाळाची आई हत्तीणबाई...३

ऐटीत बसूनी मंकूनेही
सूचना दिली सभेची
पौर्णिमेला सायंकाळी 
वेळ पाळूया सातची...४

सारे जमले आवरुन काम
नियमच होता जंगलाचा
वनराज येता व्यासपीठावर
मुजरा केला मानाचा...५

विरळ झाले रान सारे
नदी, तलावही आटलेले
या माणसांनी स्वार्थाचे 
दुकानच हो  थाटलेले...६

दाणा शोधायाला सारे
जंगल जातील सोडूनी
पोटातल्या भूकेसाठी
मित्र जातील हरवूनी...७

 सांगेल कोणी का उपाय यावर?
विचारांत पडले भारी
मोरदादा सुचवी युक्ती
जंगलास वाचवणारी...८

आळस झटकून टाकू आता
दुःख नका हो करु कुणी 
मेघ दाटण्यापुर्वी आपण
बिया टाकूया रुजवूनी ...९

संकटे येऊनही जरी का
कळे न काही माणसाला
आपण सजवू सृष्टी पुन्हा ही
वाचवत राहू जंगलाला...१०

शाब्बास म्हणूनी, बोले राजा
उशीर नको सत्कार्याला
सभा संपली उठा मित्रहो
लगेच भिडूया कामाला...११

रचना 
शिल्पा म वाघमारे 
सहशिक्षिका बीड 
७.०६.२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: