कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

@ बालकविता मनमौजी पाऊस

मनमौजी पाऊस...


आकाशाची सैर कराया

 पंख दिले मेघास कुणी

 लुसलुशीत मऊ तनुवरी त्या

निळे जांभळे रंगवूनी...१


कधी कोरडे फिरती नुसते

तया कुणाचा धाक असे? 

आई ,बाबा, ताई, दादा 

डोळे मोठे करीत नसे ...२


इकडून तिकडे वाऱ्यावरती

स्वार होऊनी बागडती

कधी फुगवूनी गालच अपुले

रुसतात असे कुणावरती? ...३


धडाड्धुम्म...नाद गर्जतो

ढोल नभीचा निनादतो

कुट्ट करी झाकूनी दिनकरा

मयूरांस रानीच्या खुणावतो...४


वारा स्पर्शे शीतल चंचल

क्षणांत झर झर धार झरे

झाडे - वेली धरणी तान्हेली

तृप्त होऊनी जाई त्वरे ...५


ओढे नाले तलाव सरीता

तुंडुंब वाहती आनंदे

चराचरांचे मनही वाहे

चिंब होऊनीया छंदे...६


स्पर्श सुधा देई संजीवन

क्षणांत अंथरे हिरवाई 

पुन्हा पुन्हा ती अशी सुखावे

जणू हरवते श्यामसई...७


रचना

शिल्पा म.वाघमारे

(शिक्षिका) अकोला 

१७/०८/२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: