कळी नेणिवांची
ते मौन बोलके होते नि
अजुनी जे ओठी साठलेले
भावनांच्या अन् चेतनांच्या
ऊरी करकचून बांधलेले... १
धरणीस तृप्त कराया वेगे
नभ होतसे ना उतारु
त्या संत का न म्हणावे
मुक्तानंद उधळती जे तरु... २
मी फक्त गाळते अश्रू
मजला नच काही कळते
शब्दांत न गुंफता येई
हे मौन मजला छळते...३
अशा कुण्या रे दागिन्यांनी
मढवसी आम्हा नित्य नित्य
जणू अमृते नहातो वाहतो
कर्म साधते फक्त निमित्त...४
युगे बंद जाहली कैक
कल्पांतही साही वेदना
मौनातील वेचूनी बोल
कधी जाणशील का मना...५
शब्दातीत सारे काही
ही जाणीव खोल जावी
सल हाय सलते भलती
कळी नेणिवेची खुलावी...६
रचना
*शिल्पा म.वाघमारे*
सहशिक्षिका
बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा