'असे यावे वर्ष नवे'
मळभ दाटल्या मना कोमला
मलूल प्रेमाची लकेर हवी
स्नेहफुलांचा रंग लेऊनी
उमलावी गंधपहाट नवी... १
नवी नव्हाळी पदोपदी तुज
काल, आज वा असे उद्या
भिंतीवर चाले लपंडाव जरी
तोच सूर्य अन् तरु, नद्या... २
उषा व्हावी जगी मनाच्या
जाळूनी सल, पेटवू दिवे
कुट्ट जाहल्या, रानी पेटल्या
नवकिरणांचे येणे व्हावे...३
किती करु माधवा याचना
पुन्हा तेच का पुढती यावे?
लुप्त होता विकार, दंभ
'सत्य' नभी चांदणे व्हावे...४
तरी विझेना अनल आतला
एकदाच 'तू' बरसून जावे
आत्मानंदी चिंब होऊनी
माणसा 'माणूसपण' यावे... ५
गीत गावे माझिया धरेने
सूरताल धरावे गगनाने
असे यावे वर्ष नवे की
अमृते भिजावे शब्दाने..६
रचना
शिल्पा म. वाघमारे
सहशिक्षिका
गेवराई,जि. बीड
भ्र. क्र. 9527054205
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा