एकाकी
शीर्षक : एकाकी
आज पिकले पान मी
काल काही और होते
सुरांच्या मैफिलीतला
मी ही धुंद सूर होते... १
आज बाग ही मनाची
फुले ती आठवणींची
काल होती किलबिल
मनगाभारी पाखरांची... २
आज भयाण हे जग
माझ्या सुन्न करी जीवा
होती रंगीत दुनिया
रंग कोणता हा नवा?...३
आज पिल्ले माझी सारी
झालीत मजला पारखी
ओळख ना देई कोणीजणू की परक्या सारखी...४
माझा लळा, प्रेम, माया
काल होते त्यांना हवे
पंखांमध्ये येता बळ
आकाश शोधले नवे...५
होती जगण्याची आशा
आस आणि स्वप्ने नवी
निराशेचे हे मळभ नि
नित्य मृत्यूला आळवी...६
रुक्ष पिकले पान हे
आहे पानगळ बाकी
कवडसाही न तमी या
आज फक्त मी एकाकी...७
रचना
© शिल्पा म. वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड