मी सबला...
कोण आहेत ते लोक जे
नारीला अबला ठरवतात
शारदा, दुर्गा नि लक्ष्मीच्या
फक्त मुर्तीच का ते पुजतात?... १
वंदितोस जिजाऊ अभिमानाने
लक्ष्मी, अहिल्येसम रणरागिनी
पुरुषार्थ मिरव ना जगी खरा
मनी भाव तोच तू उमलवूनी...२
तू "तू" आहेस तुझेठायी
अन् मी "मी" आहे माझ्यापरी
निसर्गाची अद्भुत निर्मिती
समजून घेऊया का आतातरी...३
निर्बंध लादणे सोड आता
समशेर बडी दे 'ती' च्या करी
स्वयंतेजा 'ती' निःशंक रहा तू
नको पेरु मनी त्या कमजोरी...४
अबला म्हणवून नकोस विझवू
जागू दे सुप्त चेतना अंतरीची
शब्दपिंजऱ्यात जखडूनी चपला
करु पाहसी मस्करी सृष्टीची... ५
तूच पेरले कधी बीज जे
फळ तयाची चाखतो आहेस
तुझीच ताई, दारा, छकुली
भयभीत क्षणोक्षणी पाहतो आहेस...६
सबला आहे नारी जगती या
प्रतिमा निर्मात्या सृष्टीची
सार काजळी, कर दे करी
नांदी येथेचि येईल स्वर्गाची... ७
रचना
शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि ७.१२.२०१९
३.४० pm
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा