उत्तुंग भरारी
आत्मविश्वास अन् जिद्द बाळगून
नकार सारे झुगारून फेका
सत्ययुगाची पुन्हा निर्मिती
करण्यास पाऊले पुढती टाका... १
कळस यशोमंदिराचा गाठा
करून शिकस्त प्रयत्नांची
मर्म जाणूनी नरजन्माचे
होळी चेतवू अहंभावाची... २
प्रेरणापंखांनी घेऊ उत्तुंग भरारी
करुया ठाम निर्धार मनाचा
माणसाने 'माणूस' व्हावे
भाव जागवून माणुसकीचा... ३
दुर्लक्षित करुया सदैव ते
भ्रमित करणारे जरी भास
घेऊ रचावया हाती आता
भव्य दिव्य नवइतिहास... ४
निरपेक्ष चालून कर्तव्यापथावर
सांडूया अडसर आसक्तीचे
आपसूक मग पडेल पदरी
मृदूल पुष्प आनंदयशाचे... ५
सामावून या कवेत घेऊ
अथांगता आभाळाची
गाडूनी बोथट विचार सारे
कसली पर्वा हो चौकटीची ... ६
©शिल्पा म. वाघमारे
स.शि. मालेगाव खुर्द
ता.गेवराई जि.बीड
दि ०२.१२.१९
३.४५ pm
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा