कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

आंबा

आंबा

डेरेदार तरुवर
येई मोहर वासंती 
घमघम आमराई
कोण गंध हा श्रीमंती...१

 मोहरली मन, राने
 राघू-मैना नि कोकिळ
 स्वर मंजुळ घुमतो
 कानी  कुहू-कुहू शीळ...२

 दिसामाजी जाती दिस
 लगडल्या पानोपानी
 गर्द हिरव्या इवल्या
 कैऱ्या पोपटाच्यावानी... ३

कांदा भाकरी न्याहारी
तोंडी कैरीची हो फोड
रसानेस करी मुग्ध
पक्वान्नांस देई तोड...४

वाट सरे औत्सुक्याची
रसरस पाड आला
गोडवा तो वर्णू काय
शब्द नाही उपम्याला... ५

आम्र फळ बहुगुणी
राजा शोभतो फळांचा 
ग्रीष्मसुट्टीतली मजा 
गाव आठवे मामांचा... ६

रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. 16.05.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: