कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, १० मे, २०२६

 ती आई असते


फक्त फक्त विश्वासाचं बळ

पूर्णत्व देऊन अंश निर्मिते

'हे निर्मिका' तुझी ही अजब निर्मिती 

 जणू न सुटणारे कोडे ठरते... १


सजवते तुज वात्सल्य सुमांनी,

 अद्वितीय तो जीव घडतो

 शिस्त, संस्कारांनी मढूनी

जीवन संग्राम सारे लढतो... २


चुकत असेलही काही.. पण सर्वस्व ती देऊन टाकते... 

स्वतःस कित्येकदा अपूर्ण ठेवत...

आजारपण,झोप, थकवा, आनंदाचे कित्येक क्षणही...न जाणो कुठे गाडते... ३


वेळोवेळी चुकीचं.. कमी... ठरवताना एवढा विचार येणं गरजेचं असतं... 

तिला कुठं आईपणाच ट्रेनिंग मिळालेलं असतं..!४


डोळे बंद करून विचारा स्वतःला की 

तिला स्वतःचं आयुष्य नसतं का? 

तरीही तिच्यापेक्षा जगात best

 कुणी तरी दिसतं का? ५




©®कृष्णार्पित शिल्पा

10.05.2026

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

आजी

 

 आजी...हरवलेलं नातं


मधाळ पाझर |जणू माय दुजी|| 

असते ना आजी | आम्हासाठी ||१||


 स्पर्श सुसंस्कारी | लाभला मजला||

जन्म हा जाहला | धन्य-धन्य ||२||


रखरखलेला | तिचा  कर गाली ||

टोचे बाल्यकाली | चरचर || ३||


आज आठवाने | ओघळती धारा ||

 स्पर्श  तो गहिरा | प्रेमभरा ||४||


आधार वाड्याचा | जणू की कोंदण ||

 शीतल चांदणं | शरदाचं ||५||


तेवती समई | मृदू मंद स्वर ||

कथेचे भांडार | आजी माझी ||६||


 अनामिक ऊब | गोडी ती मधाची ||

ओवी हो जात्याची | आजी माझी ||७||


हरीनामी भिजे |ओटा तुळशीचा ||

नाद चैतन्याचा | घुमे कानी ||८||


तिच्या आठवाने| आसवे दाटली ||

गाभारी भेटली | स्वप्नवत||९||


संकुचली मने | नाती विभागली ||

आजी 'हरवली' | सापडे ना ||१०||


बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

अश्वत्थामा.....

 हे कृष्णा हे राधा रमणा

मी तर नसेल अश्वत्थामा... 

त्या भडभडणाऱ्या जखमा घेऊन

अजूनही.... तुझ्या एका कृपाकटाक्षासाठी

न जाणो कशी युगे घातलीत पायदळी... 

जिथे एक एक क्षण युगांचे लेणे लेऊन आलेला... 

न संपणाऱ्या प्रवासाच्या जणू अश्वावर आरुढ झालेला

पिळवटून टाकतोय हे काळीज... नयनांची कधीची हरवलेली नीज

किती कर्कश्श आहेत त्या वेदना...देहावरील  जखमेपेक्षाही 

मनाच्या... अविचारी.. अधर्मी कर्माच्या... त्यासाठी तुझे नामाचे औषध फक्त लावित आहे... 

एकटाच मुकुंदा रडत आहे.. कण्हत आहे... 


तू दिलेला शब्द पाळणार खात्री आहे म्हणून 

हे मुरारी... आनंदीही होत आहे... एक एक छळून टाकणारे पळ मागे टाकत.... 

नामरंगी रंगत आहे.... 

अन् ताकही आता माधवा फुंकर मारुन पित आहे... ... 




रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

बालभारती


 

*या बालभारतीच्या अंगणातली* 

*आपण फुलपाखरे सारी*

*ती संवेदना अजून सजीव आहे*

*काळ जाऊ देत... गेला पुढे जरी*


*बालमनी त्या कोमला*

*कविता तिनेच होती कोरली*

 *जी आठवता उमलती बकुळफुले*

*की मनेच होती चोरली*


✍️शिल्पा

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

दिव्यांग

 *दिव्यांग बालक कौतुक सोहळा*


तुम्ही जगास या ठणकावून सांगा... 

लावूनी झेंडा अटकेपार... 

या देहाची गौण ती बाधा... 

इच्छाशक्तीस चढवता धार...१


 मनी धैर्य नि जिद्दीने...

 सदा जाऊनी आघाडीला...

  लेकरे साऊ - ज्योतीची शोभावी...

सलाम करतील सारे धडाडीला... २ 


जग आतले वा बाहेरचे... दिव्यतेने भारावे... 

 यशाच्या किर्तीने... 

नभी तोरण बांधावे ...३ 


सुगंधित करणारी भविष्य... 

स्नेहलताच विद्येच्या उद्यानाची... 

लाजतील भलेभलेही... 

अशी खाणी आदर्शांची...४ 


 अभिमान आमचा तुम्ही... 

तुम्ही गौरव सत्कर्मांचा... 

गुणी बाळे आमची... 

तुम्हावर वर्षाव शुभेच्छा अन् आशीर्वादांचा...५


✍️काव्यरचना 

©शिल्पा म. वाघमारे (कुलट)

सहशिक्षिका बार्शीटाकळी

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

अवकाळी पाऊस अष्टाक्षरी


दि. ०७/१२/२०२५ 

अविवेकी कर्म


अवचित अवकाळी 

नभ काजळीला ल्याले

काळोखाच्या काजळाने

डोळे आसवांत न्हाले ||१||


थांब थांब माझ्या बापा

माय धरणीला जाण

तुझा एक अविचार   

 उजाडेल तिचं रान ||२||


स्वप्न सोनेरी ओंजळी

मनी भरते आलेले

तुझं पाहता थैमान 

आसवांत ओघळले ||३||


'घाला' काळजास कसा

नाही नशीबी आनंद

श्वास चालला विरत 

झाला विचारही बंद ||४||


दारा-पोरांचीही आता

पुन्हा तीच का रे गत?

जडेललं बळी तुझं

पुन्हा भूकेशीच नातं || ५||


श्वास एकही पुढचा 

डोळा मरण दावितो

अविवेकी 'त्या' कर्मांचे

'हेचि फळ' मी जाणतो ||६||


शिल्पा म वाघमारे (कुलट) 

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

बालकवीसंमेलन

 प्रभात किड्स स्कूल अकोला 


बालकवीसंमेलन 


छोट्या फुलपाखरांचे हे साहित्य संमेलन...म्हणजे बालशब्दस्पंदनच जणू...

बालपणाच्या  सुखस्वप्नी मज 

खेचत नेणारी मधूर वेणू... १ 


साहित्याची नांदी येईल

भवितव्यासाठी होईल प्रेरणा

इवल्या डोळ्यांत चमकेल

आत्मविश्वास अन् नवचेतना...२ 


प्रभात किड्सच्या अंगणात आली

किलबिलती पाखरे गोजिरी

स्वयंप्रकाशी ध्येय ऊरी अन्

बरसतील निर्मळ आनंदसरी...३ 


काव्यमंजिरी दरवळून टाकील

कथांत रमतील थोर नि सान

बिनधास्त झेप ही साहित्याच्या आकाशी

घेताना मग... नुरेल भान...४


प्रेरिका जणू ही घटीका

स्वप्नवाट प्रकाशणारी

सुखस्वप्नांच्या  जगतामधुनी

विश्वास सत्याचा देणारी...५


शब्द होऊन स्पंदने हृदयीची

 जगण्याला देतील नवा श्वास


आस घेईल नभी उत्तुंग भरारी

मळभ सारुन तरारेल ध्यास...६


बोबड्या बोलांतून  

इंद्रधनूच साकारणारे

 नवकल्पनांनी भान हरवणारे

इवले जरी हे रोप आजचे

या काळजाची काळजी मिटवणारे...७

 

रचना


©शिल्पा श्रीकांत कुलट

सहशिक्षिका

जि प प्रा मराठी कन्या शाळा बार्शीटाकळी

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

स्वागतगीत....

 स्वागतम् स्वागतम्   २

तव स्पर्श करी धरणी पावन २

 स्वरपुष्प साहित्य करितो वंदन १

 स्वागतम २


अर्पित समस्ता सुमनांनी द्यावा आशिष मम् रसिकांनी 

आ$$$$

अर्पित समस्ता सुमनांनी द्यावा आशिष मम् रसिकांनी 

(तव स्वागतास फुलले चंदन २)

स्वरपुष्प सहित..करितो वंदन.... स्वागतम

||  १ ||

  


(पनिसाग मगरेप)२

 (गमप निधप सानि निध मधप)२

  स्विकार विनंतीचा करुनी 

 श्रम वेचियेले अपुले म्हणून आ..... 


वाहुनी सृजना तन मन धन २

 स्वरपुष्प करितो वंदन...


स्वागतम...

स्वागतम

स्वा ग त म....

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

थकले रे पांडुरंगा

 पांडुरंगा

 थकले रे पांडुरंगा,

अजुनी किती धावू

विषयांनी जीवा का 

घातले रे न्हाऊ


सांडू पाहे कैकदा 'मी', 

जीवा कैसी या सोडवू

दया कर दयानिधी..

असा घोर नको लावू...



तूच घे करुनी भक्ती

मज ना खरी खोटी ठावे

कुठे ठेवू वाचवोनी

मन मलिन न व्हावे


कहर केला संसाराने

नाथा सांग कुठे जाऊ...

तुझी काया वाचा मन

त्यात पांडुरंग जप, ध्यान



का मग कोंडले श्वास दीन

ना ही तू सोडविशी यातून 

दीप तुझ्या नामाचा हृदयी 

जपला.. नको विझू देऊ...



वाट तुझी चालते

चुको नये... सांभाळ

तूच करवून घे 

प्रवास हा सारा पार

 'राम' रंगी भिजूनी आत्मा 

हे अनात्मा  


रचना

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खु ता गेवराई जि बीड

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

शेतकरी... शासन

 शासनाने मुद्दाम  दुर्लक्षित केलेला शेतकरी...

 हा दुरावा कधीच का मिटणार नाही...? 


आमच्याचं भाकरीवर पोसणारे...

तिलाच पारखं होणारे... 

या पाषाणांस का पाझरच फुटणार नाही...?

भ्रष्टाचाराचा खळबळ वाहणारा झरा कधीच का आटणार नाही...? 


सत्याचाच विजय होईल..

पुन्हा नवी प्रभा येईल 

मग  आशा सोडून कसं चालेल? 

कंस आलाच असेल..  तर कृष्ण कसा त्यास भेटणार नाही...?


विश्वासाचा श्वास रोमरोमी वाहू दे... 

युगाचा फक्त महिमा आहे... 

घडतंय ते घडू दे... 

तो पिळवटून घेतो रस... कस... आपला

अन् धीराचा अंत पाहतो... 

या तगमगी नंतरचा....हृदयातील दिवा शांत पाहतो

सहज मग स्मित देऊन

तोच टाकतो पुढे पाऊल

अन् उचलून घेत अलगद... म्हणतो...  

आता लागली मला तुझ्या मुक्तीची चाहूल...

 


शिल्पा श्रीकांत कुलट

अकोला

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

*संकेतस्थळ



         संकेतस्थळ


नित्याचीच ही घालमेल

अन् अंतरीची हुरहूर 

वन्हीस या शमवितो 

तुझ्या पाव्यातला सूर ||१ ||


 हृदयात खोल खोल

 कल्लोळ दाटलेला

नरजन्मी विषयपसारा

अस्ताव्यस्त विखुरलेला ||२||


संकेतस्थळ मुक्त आनंदचं

तूच या भृकुटीवर कोरलेलं

गीतेच्या मृदूल स्वरपाकळ्यांत 

गीत मुक्तीचं पेरलेलं ||३||


संकेतवर्ण सजता अधरी

रोमरोमी या भिनावा

अनंत प्रवास जरी अनंता

पायी तुझिया सरावा ||४||


उत्थान होता सप्तदिपांचे

जागर चेतनेचा व्हावा

सुखसोहळा खराखुरा

याच देही अनुभवावा ||५||


द्वैताद्वैत द्वंद्व माधवा

चरणांत तुझ्या विरावे 

रिक्तता लाभता अखंड

मी न माझी उरावे ||६||


काव्यरचना :

शिल्पा मनोहर वाघमारे 

अकोला 

भ्र. क्र. ९५२७०५४२०५


द्वितीय क्रमांक मनस्पर्शी समूह 

मंगळवार, १८ मार्च, २०२५

*अभिजात मराठी...व आभार 2 कविता

 अभिजात मराठी 


तू स्थितप्रज्ञ, तू स्वामिनी आहेस

मनी अढळ विश्वास होता

मात्र आम्हा लेकरांचा गे माये, 

अडकलेला श्वास होता... || धृ ||


'मी मराठी' हे तर आम्ही    

 छाती फुगवून सांगतो... 

तिच्या प्राप्तीसाठी बा विठ्ठला  

पुन्हा याच मातीत जन्म मागतो... 

कधी का अखंडतेचा 

 पाहिला कुणी ऱ्हास होता...? 


आम्हा लेकरांचा गे माये अडकलेला श्वास होता... ||१||



माझ्या ज्ञानमाऊलीच्या शब्दफुलांतून 

हळूवार ती गंधाळली...

अभंग, किर्तनी मनांगणी

 टाळ घेऊन मनसोक्त नाचली...

अंतरंगी उमलला कोमल

एकच मनी ध्यास होता... 


आम्हा लेकरांचा गे माये अडकलेला श्वास होता... ||२||



छत्रपती शिवबांनी जपली ती,  

माता जशी पुजिली... 

माय भवानीचे तेज भाळी

अखंडता सर्वांगी ल्यालेली.. 

विश्वरुप तिजला लाभणे,

 हा क्षणच काही खास होता... 


हा लेकरांचा माये तुजसाठी

अडकलेला श्वास होता...||३||


कोण आम्ही तुजसाठी लढणारे! 

तूच आमची अदम्य शक्ती झालीस...

तूच अनंताच्या प्रवासाची साक्षी नि

 अस्थिर मनांची भक्ती झालीस...

धन्य आम्ही तूज तारांगणीचे                

 तेज असे लाभता...


हाच लेकरांचा माये तुजसाठी अडकलेला श्वास होता... ||४||



'अभिजात' मराठी झाली ,

अक्षरकळ्या खुलल्या गाली...

उचंबळून मायभू धरणी,

 नभास त्या स्पर्शूनी आली...

वाकून मुजरा तुजला माये

लुप्त सारे भास आता... 


 मुक्त झाला आम्हा लेकरांचा, 

अडकला जो श्वास होता...||५ ||



संस्कृतीची घडण...मराठी, 

चैतन्याचे स्फुरण...मराठी 

शब्द की प्राजक्त भरली ओंजळ,

अमृतमंथनी नवनीत.. मराठी

मायमराठी कुशीत तुझिया,      

 सांडला निःश्वास आता

सार्थ इथला जन्म जाहला, 

 मुक्त हा गे श्वास होता... ||६|| 



काव्यरचना :

©शिल्पा म.वाघमारे 

(शिक्षिका )

जि.अकोला




आभार... मनगाभाऱ्यातून


तू स्थितप्रज्ञ, तू स्वामिनी आहेस

मनी अढळ विश्वास होता

मात्र आम्हा लेकरांचा गे माये, 

अडकलेला श्वास होता... || धृ ||


'मी मराठी' हे तर आम्ही    

 छाती फुगवून सांगतो... 

तिच्या प्राप्तीसाठी बा विठ्ठला  

पुन्हा याच मातीत जन्म मागतो... 

कधी का अखंडतेचा 

 पाहिला कुणी ऱ्हास होता...? 

आम्हा लेकरांचा गे माये अडकलेला श्वास होता... ||१||


माझ्या ज्ञानमाऊलीच्या शब्दफुलांतून 

हळूवार ती गंधाळली...

अभंग, किर्तनी मनांगणी

 टाळ घेऊन मनसोक्त नाचली...

अंतरंगी उमलला कोमल

एकच मनी ध्यास होता... 

आम्हा लेकरांचा गे माये अडकलेला श्वास होता... ||२||


छत्रपती शिवबांनी जपली ती,  

माता जशी पुजिली... 

माय भवानीचे तेज भाळी

अखंडता सर्वांगी ल्यालेली.. 

विश्वरुप तिजला लाभणे,

 हा क्षणच काही खास होता... 

हा लेकरांचा माये तुजसाठी, अडकलेला श्वास होता...||३||


कोण आम्ही तुजसाठी लढणारे! 

तूच आमची अदम्य शक्ती झालीस...

तूच अनंताच्या प्रवासाची साक्षी नि

 अस्थिर मनांची भक्ती झालीस...

धन्य आम्ही तूज तारांगणीचे                

 तेज असे लाभता...

हाच लेकरांचा माये तुजसाठी अडकलेला श्वास होता... ||४||


'अभिजात' मराठी झाली ,

अक्षरकळ्या खुलल्या गाली...

उचंबळून मायभू धरणी,

 नभास त्या स्पर्शूनी आली...

शतशः आभार, वाकून मुजरा तुम्हा

सरकार मायबापा आता...

 तुम्ही मुक्त केला लेकरांचा, 

 अडकला जो श्वास होता...||५ ||


संस्कृतीची घडण...मराठी, चैतन्याचे स्फुरण...मराठी 

शब्द की प्राजक्त भरली ओंजळ,

अमृतमंथनी नवनीत.. मराठी

मायमराठी कुशीत तुझिया,      

 सांडला निःश्वास आता

सार्थ इथला जन्म जाहला, 

 मुक्त हा गे श्वास होता... ||६|| 



काव्यरचना :

©शिल्पा म.वाघमारे 

(शिक्षिका )

जि.अकोला

भ्र. क्र. ९५२७०५४२०५

विदर्भातील 2 पैकी 1 निवड

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

🚩 अभंग चोविसाआगळा पांडुरंग


अभंग 


निर्गुणाची वारी


अगा पांडुरंगा| चोविसावेगळा ||

सहस्त्रांआगळा | तूच एक ||१||


रम्य मनोहारी | भक्त गोतावळा ||

पायी त्या मोकळा | श्वास माझा  ||२||


विवेक जागृती | हेच पारिपत्य ||

भेटीचे अगत्य | पांडुरंगा||३||


अलभ्यच लाभ | सुखाचेही सुख ||

देखताचि मुख | माधवाचे ||४ ||


येता अनुभूती | तूच जीवनार्थ ||

सत्व मतितार्थ | भक्तीचाही ||५||


देही नवद्वारा | विकारा अव्हेरु||

विठू महामेरू | वारी तुझी ||६||


नमो नमो आद्या | निराकार रुपा ||

चैतन्य स्वरुपा | विश्वाधारा ||७||


विठ्ठल विठ्ठल |पंचप्राण गाती||

निर्गुणाची प्राप्ती| हाचि ध्यास ||८||


नको मोक्ष मुक्ती | न लगे वैकुंठ||

दाटलासे कंठ| भेटीसाठी ||९||


घडो मजलाही | निर्गुणाची वारी ||

सरो भ्रांत सारी| एकदाची ||१०||

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


देवा पांडुरंगा| चोविसावेगळा ||

सहस्त्रांआगळा | तूच एक ||१||


विवेक जागृती | हेच पारिपत्य ||

भेटीचे अगत्य | पांडुरंगा ||२||


अलभ्यच लाभ | सुखाचेही सुख ||

देखताचि मुख | माधवाचे   ||३||


विठ्ठला विठ्ठला | तूच जीवनार्थ ||

सत्व मतितार्थ | भक्तीचाही ||४||


देही नवद्वारा | विकारा अव्हेरु|

विठू महामेरू | वारी तुझी ||५||


मोक्ष मुक्ती, सिद्धी| न लगे वैकुंठ||

दाटलासे कंठ | तुझ्यासाठी ||६||


घडो मजलाही | निर्गुणाची वारी ||

सरो भ्रांत सारी | एकदाची ||७||


नमो नमो आद्या | निराकार रुपा ||

चैतन्य स्वरुपा | विश्वाधारा  ||८||



नमो नमो आद्या | निराकार रुपा ||

चैतन्य स्वरुपा | विश्वाधारा ||८||






रचना

श्रीम्. शिल्पा म.वाघमारे

सहशिक्षिका बीड

दि. ११.०७.२०२२


अभंग


देवा पांडुरंगा| चोविसावेगळा ||

सहस्त्रांआगळा | तूच एक ||१||


रम्य मनोहारी | भक्त गोतावळा ||

पायी त्या मोकळा | श्वास माझा  ||२||


विवेक जागृती | हेच पारिपत्य ||

भेटीचे अगत्य | पांडुरंगा||३||


प्रीत सवंगडी | आदर्श नीतीचा ||

संसारी मोक्षाचा | वारकरी ||४||


अलभ्यच लाभ | सुखाचेही सुख ||

देखताचि मुख | माधवाचे ||५||


येता अनुभूती | तूच जीवनार्थ ||

सत्व मतितार्थ | भक्तीचाही ||६||


देही नवद्वारा | विकारा अव्हेरु||

विठू महामेरू | वारी तुझी ||७||


नमो नमो आद्या | निराकार रुपा ||

चैतन्य स्वरुपा | विश्वाधारा ||८||


विठ्ठल विठ्ठल |पंचप्राण गाती||

निर्गुणाची प्राप्ती| हाचि ध्यास ||९||


नको मोक्ष मुक्ती | न लगे वैकुंठ||

दाटलासे कंठ| भेटीसाठी ||१०||



रचना

© शिल्पा म.वाघमारे

सहशिक्षिका, जि प प्रा मराठी कन्या शाळा बार्शीटाकळी जि अकोला 

दि. 12.07.2019



असीम आभाळी |अथांग सागरी||

मापदंड करी |

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०२४

 मला कधीच कळत नाही

गणित या क्षणांचं

ओघळत जाणं 

हातांतून मोत्यांचं



रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

* आनंदघन


 :आनंदघन


हृदयगाभारी पावित्र्याने

आत्मतेजास जागवावे

तुझ्यातल्या माणसाने 

माणसासाठी प्राणवायू व्हावे ...१


आधार हो, धीर हो दुर्बलांचा

 पाऊलखुणांनी सुवासिक व्हावे

श्वास हो मरणासन्नांचा असा

की तत्क्षणांचे संगीत व्हावे....२


घास होऊन मुखीचा कधी

क्षुधेलाही कधी लाजवावे

आशिषांच्या सुगंधात न्हाता

जगण्याला पंख फुटावे...३


माणसाने माणसासाठी सर्वदा

ज्योत समईची होऊन जळावे

विषय पतंग जाळीत जाता

सहजे तूफानांस पेलावे...४


देहभान हरपून अर्पावे मनही

निर्भेळ 'आनंदघन' व्हावे

निरागस निर्विकार 'मूळ' हे

'जडास' या जाणवून द्यावे... ५


भव तरताना निरपेक्ष भावे

दात्याचे तू  'हात घ्यावे'

श्वासांचे अविरत जाणे येणे

केवळ यांस का जगणे म्हणावे?.. ६


रचना

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

दि ३१.०५.२०२१




 :आनंदघन


हृदयगाभारी पावित्र्याने

आत्मतेजास जागवावे

तुझ्यातल्या माणसाने 

माणसासाठी गीत व्हावे ...१


आधार हो, धीर हो दुर्बलांचा

 पाऊलखुणांनी सुवासिक व्हावे

श्वास हो मरणासन्नांचा असा

की तत्क्षणांचे संगीत व्हावे....२


घास होऊन मुखीचा कधी

क्षुधेलाही कधी लाजवावे

आशिषांच्या सुगंधात न्हाता

जगण्याची रीत व्हावे...३


माणसाने माणसासाठी 

ज्योत होऊन जळावे

विषय पतंग जाळीत सहजे 

तूफानांस पेलित जावे..४


देहभान हरपून अर्पावे मनही

निर्भेळ 'आनंदघन' व्हावे

'जडास'  जाणिव दे निर्विकारी

बाळाचे निरागस स्मित व्हावे... ५

. ५


भव तरताना निरपेक्ष भावे

दात्याचे तू  'हात घ्यावे'

श्वासांचे अविरत जाणे येणे

केवळ यांस का जगणे म्हणावे?.. ६


रचना

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

दि ३१.०५.२०२१

गझल : बंध

 वृत्त - मेनका 

लगावली - गालगागा गालगागा गालगा


आज सारे बंध मी ही तोडले

भावनांचे हात आता सोडले


त्या क्षणांनी पाहिले माझ्याकडे

सोसले जे, भोगले जे खोडले


मी किती साहू, मना ताडू अता

का न त्यांनी कोष त्यांचे मोडले


रदीफ : -... नाही


कवाफी : 

तोडले, सोडले, खोडले, मोडले



अलामत : ओ


शिल्पा म वाघमारे 

सहशिक्षिका बीड

गझल : साजना

 वृत्त 

स्त्रग्विणी 

*गालगा गालगा गालगा गालगा*


साजना गीत हे का नवे वाटते

ते शहारे मला का हवे वाटते


आज माझ्या सुरांना तुझा सूर दे

रंगले ओठ की चांदवे वाटते


सांग कोठे कशी दाखवू त्या खुणा

आणखी त्या हव्या तुजसवे वाटते


फूल ते ही मुके त्या कशी मी पुसू

स्वप्न त्या वेळचे गोडवे वाटते


कोंडले मी जरी कोश माझाच तू

बाहुपाशी झरो आसवे वाटते


रचना

शिल्पा म वाघमारे

सहशिक्षिका बीड

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

@ बालकविता पंढरीची वारी

 पंढरीची वारी.... (बालकविता)


पंढरीच्या राजा

पांडुरंगा विठ्ठला

मलाही यायचंय

देवा तुझ्या वारीला. . १


वारीला चालले

आजोबा नि आजी

मलाही बघायची रे

एकदा पंढरी तुझी. . .२


माऊलीच्या दिंडीसह

यंदा मला जायचंय

विटेवरचं सुंदर ध्यान

मलाही पहायचंय। . . .३


लहान आहेस तू असं

आई-बाबा म्हणतात

दरवेळी अशीच ती

कारणे देत असता. . .४


ज्ञाना-तुका आणि

भक्त पुंडलिकाचा

केलास उद्धार

तू तुझ्या भक्तांचा. . .५


या मोठ्यांना तुच आता

एकदा समजव रे

निरागस या जीवाची

पुरव ही आस रे. . . ६



         📝 *रचना* 📝

      *शिल्पा म.वाघमारे*

           *स.शि. बीड*

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

गझल कशाचे पुन्हा भेटणे बोलणे रे...

 गझल 


वृत्त : भुजंगप्रयात

लगागा लगागा लगागा लगागा 


कशाचे पुन्हा भेटणे बोलणे रे

कुठे आसवांचे घडे ओतणे रे...


तुझ्या आठवांची जपूनी कुपी ही

मनाने मनाशीच समजावणे रे...


फुले जी कधी तू दिली ओंजळीत

पुन्हा गंध लेणे पुन्हा सांडणे रे ... 


मला का सदा हा छळे दृष्ट वारा

बटांनो नको ते पुन्हा गुंतणे रे ...


कुणी वाट माझी करा मोकळी हो

अता फक्त स्वप्नात त्या रंगणे रे...



शिल्पा म. वाघमारे 

सहशिक्षिका बीड

19.08.2022