संकेतस्थळ
नित्याचीच ही घालमेल
अन् अंतरीची हुरहूर
वन्हीस या शमवितो
तुझ्या पाव्यातला सूर ||१ ||
हृदयात खोल खोल
कल्लोळ दाटलेला
नरजन्मी विषयपसारा
अस्ताव्यस्त विखुरलेला ||२||
संकेतस्थळ मुक्त आनंदचं
तूच या भृकुटीवर कोरलेलं
गीतेच्या मृदूल स्वरपाकळ्यांत
गीत मुक्तीचं पेरलेलं ||३||
संकेतवर्ण सजता अधरी
रोमरोमी या भिनावा
अनंत प्रवास जरी अनंता
पायी तुझिया सरावा ||४||
उत्थान होता सप्तदिपांचे
जागर चेतनेचा व्हावा
सुखसोहळा खराखुरा
याच देही अनुभवावा ||५||
द्वैताद्वैत द्वंद्व माधवा
चरणांत तुझ्या विरावे
रिक्तता लाभता अखंड
मी न माझी उरावे ||६||
काव्यरचना :
शिल्पा मनोहर वाघमारे
अकोला
भ्र. क्र. ९५२७०५४२०५
द्वितीय क्रमांक मनस्पर्शी समूह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा