अनुपमा
कोण ही? हिला कुठेतरी
पाहिल्यासारखं वाटतयं
हो... तीच ही मनात जिच्या
मळभ चिंतांचं दाटतयं ...१
पहाटेपासून संसाराच्या काळजीत
काम काम अन् कामाच्या पाठी
ती जगत आहे रे केवळ
क्षण तुझे नव्याने बहरण्यासाठी...२
आई, ताई, सखी साऱ्या
अनुपम रंगांनी असते नटत
रांधा, वाढा...कायमच आहे
चारभिंतीबाहेरचंही जग सावरत... ३
मंडई, किराणा,अभ्यास मुलांचा
बाळाचं सारंकाही पाहते
आला गेला पै पाहुणा
तरी दुखणी मात्र अंगावरच काढते...४
एक दिवसही घरी 'ती' नसताना
काय होतोय अवतार घराचा
तूच तुला शोधतोस घरभर
सोडवत अनामिक गुंता मनाचा...५
आईही नित्य असतेच तुझी
तुझ्यात बापही कधी शोधणारी
सहचारिणी अर्धांगी तुझी
सखी स्नेहफुले उधळणारी... ६
तू कधी तरी समजून घे तिजला
'राहू दे' म्हणशील का?
माठातलं पेलाभर पाणी
हातानेच घेशील का?...७
तिलाही विचार कशी आहेस?
हात ठेवून खांद्यावर...
कपाळी चुंबन हलके देऊन
बसंव ना जवळ घटकाभर...८
अन् बघ मग क्षणांतच
आभाळ तिचं भरुन जाईल..
'नको रे काम पडलीत' म्हणत
नव्या उमेदीनं पुुन्हा सुरु होईल...९
सोप्पं असतं खूप सगळं
तू जाणीव फक्त सजीव हो
पेलते सारं आकाश तुझं ती
तू प्रेरणा तिची आजीव हो...१०
रचना
शिल्पा म. वाघमारे
जि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा