सखी तू स्वयंसिद्धा ओलांडून उंबरठा ये बाहेरी सखे मुक्ताकाशी घे झेप मळभ सार सारे अंतरीचे पुनः नोहे ही संधीची खेप ||१|| हाक ऐक सखे अंतरीची बंधने व्यर्थ ती सारी तोड खुणावती तुज सुवर्णसंधी का ही आयुष्याशी तडजोड?||२|| पुरुषप्रधान संस्कृतीला लादून ते मोकळे झाले तुझे कोंडलेले श्वास ते कधी कुणा का जाणवले? ||३|| उंबरठ्याच्या बाहेर ये तू ओलांडून निर्बंधांचे माप मागे वळून पाहू नकोस हात रोखणारे जरी अमाप ||४|| गृहपंजरीचा झालीस रावा परंपरा युगांची तोड सखी कोमलतेस कमजोरी ठरवून विषप्यालाच तुज दिला मुखी ||५|| त्या चार भिंतींना तू ही मानून बसलीस विश्व खरे मुकलीस ना गं मुक्तजीवना तन-मन-धन अर्पूनही सारे ||६|| तप्तलोहगोलास्त्र भिरकाव ज्ञानाचे थरथरू दे मातल्या काळोखास सडेतोड कर प्रहार त्या तमी चेतव स्वतःप्रत अटळ विश्वास ||७|| माळून विजा वेणीत सये घे परखड विचारलेखणी दुरितास लयाला तूच नेशी जागव आतली रणरागिणी ||८|| त्या क्षितीजाच्या पल्याडही तू झेप अशी घे खरोखरी बनव तुझा तू मार्ग असा की करू शकेल ना कुणी बरोबरी||९|| स्वयंसिद्धा तू इतिहास घडवण्या क्रांतीज्योती तुझ्यातच 'साऊ' घडवण्यास शिवबा उद्याचा तूच दैदिप्यमान सक्षम जिजाऊ ||१०|| रचना © शिल्पा म.वाघमारे स.शि मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड दि. 7/4/19
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९
सखी तू स्वयंसिद्धा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा