कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, १५ मे, २०२०

स्त्री.. वाघीण कारभारीण



       वाघीण कारभारीण

माय माऊली धरा ही
किती साहते वाहते
तुझ्या माझ्या पोटासाठी
घास मोतियांचा देते...१

धनी राबतो जसा रानी
जीवा शिवाच्या साथीनं
सव्वाशेर त्याची हो पठ्ठी
आहे वाघीण कारभारीण...२

मर्दानी ती या अवनीसम
पाठी संसार वाहते
चूल-मूल सांभाळत कौशल्ये
खांदा खांद्यासही लाविते...३

न्हाते घामाच्या धारांत
जीव मातीत गाडते
संसाराच्या फिकिरीनं
रानी नांगर लोटते... ४

निसर्गाचं दान पदरी
काया कोवळी लाभली
ऋण फेडाया धन्यासंग
तिनं हिम्मत बांधली... ५

थिजे प्रज्ञा,गोठती शब्द
महिमा तिचा गाण्यासाठी
चपराक आहे ती गालीची
'अबला'म्हणत हसणाऱ्यांसाठी...६

रचना
© शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
 ता गेवराई जि बीड
दि. १५.०५.२०२०
=:=:=:=:=:=:=:=:=:=:=:=:=