कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, २५ जून, २०२१

गाव.. अमृताचा ठेवा

 

 

काव्यप्रकार-अष्टाक्षरी


गाव...  अमृताचा ठेवा


गाव निसर्गदर्पण

नित्य अमृताचा ठेवा

गाव शब्दांत मावेना

फिरकेना हेवादावा ||१||


गाव हिरव्याचं लेणं

माय धरेचं माहेर

ओल्या गंधात न्हालेला

दिव्य चैतन्य आहेर ||२||


मने स्वर्गाची दालने

विकारांचा विरघळ

सांज श्याम स्मितखळी

सुखाचाच परीमळ  ||३||


आकर्षितो जगतास 

साधेपणा, सहजता

काळ्या आईच्या मायेची

हिच खरी विशेषता ||४||


ओव्या, अभंगाचा वसा

गती देई जगतास

जरी वाहे तंत्रज्ञान

गाव जपे संस्कृतीस ||५||


म्हणवून 'त्या' अडाणी

बोट दावते शहर

तया सांगेल का कुणी

गाव 'ज्ञानाचा सागर' ||६||


खरी श्रीमंती सृष्टीची 

आहे गावाच्या मातीत 

हरवला हा सुगंध

शहराच्या डोलार्‍यात ॥७॥


अंतरावी न अंतरे

येता 'मी' पणा तोऱ्यानं 

आग पाखडता वाणी

भडकावे न वाऱ्यानं ||८||


कोमेजून आपुलकी

नको झापड मनाला

रंग उधळू दे चित्ती

विनवते श्रीरंगाला ||९||


आहे सजलेले सदा

आदर्शांच्या तोरणांनी 

माझ्या भारताचा गाव

शोभातोय विश्वांगणी ||१०||


रचना 

शिल्पा म वाघमारे 

स शि मालेगाव खुर्द ता 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: