विषय : लपंडाव ऊन पावसाचा
शीर्षक : लक्ष्य प्रकाशाचे
ऊन्हं पळताती पुढं
मागे धावतो पाऊस
म्हणे '' लागली रे धाप''
आता नको रे धावूस... १
मेघ श्यामल गं आला
स्वप्नसरी बरसल्या
माराव्याने चिंब केले
धरणीस आतुरल्या...२
मन सुखात भिजलं
साजनात विरुनिया
कधी दुःखात थिजलं
विरहात पोळुनिया... ३
बाळ कोवळं धरेच
पात तृणाचं नाहलं
गालावरी खळी आज
दवं कान्हाईने ल्यालं...४
क्षितिजाच्या कोऱ्या पानी
ऊन्हं चित्र रेखाटूनी
उधळण सप्तरंगी
धनु येई आकारुनी...५
ठाव लपल्या उन्हांचा
घेत पाऊस धुंडाळी
कधी शिरवा ओलावी
कधी चांदणं झळाळी...६
ओल जाणीवांची जपा
लक्ष्य प्रकाशाचे गाठा
ठायी ठायी सांगे सृष्टी
सांडी काम क्रोध ताठा...७
रचना
© शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका, जि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा