कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

🌷मुक्तछंद... भूक..

 जाणिव आहे भूक

ती माझी तुला दिसणार नाही

अतीवतेला भरती आली... तेथे ती असणार नाही


तिची एक हाक कासावीस करते जीवाला

सारं काही फिकं पडत... बाजुला सारली जातात आपसूकच सारी कामं

तेथे बळेच काही चालत नाही

केलं तरी भागत नाही


तिचा उदरातून उद्रेक होतो नि डोळ्यांतून ती ओकते आग

जाळू पाहते दिसेल ते

तरी येत नाही कुणाला जाग


ती भूक केवळ आई जाणते

अन् चट्कन सारते पदर...तृप्ती असते ती लेकरासाठी... तिलाच तेवढी कदर...

ही जाणीव होऊनही कुठे पुन्हा मग विरते 

काळाच्या ओघाने तिच्या भूकेची मग कोण कदर करते... 


हिच आर्ततेची भूक तुला लागावी

भूक ती पोटातली.. वा असेल केविलवाणी डोळ्यांतली... ती तुला दिसण्यासाठी दिव्य ती दृष्टी लाभावी.. 


नाही म्हणून वेडावत तोंड तरी बळेच ती भरवत होती

चटकावलेल्या तुझ्या जिभेला ती सकसाची गोडी शिकवत होती


आज ती लेकरु आहे 

तू तिचा बाप हो

भूकेच्या आगडोंबावर तू शीतलतेचा आलाप हो

तडफडत्या काळजातून खूप काही येथे राहून जातं

जखमी मन तलवारीहून खोल घाव देऊन जातं


मग श्वास हरवल्यावर पुन्हा ती मिळत नसते

ती असते आसपासच... पण तुझी नजर दिव्य नसते

नंतरचे ताट.. थाट...सोहळे.. नि कावळे

खरंच तिला रुचतात का? 

तुझ्या सुज्ञ मनाच्या ते, कायद्यात तरी बसतात का? 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: