सर्व बंधुभगिनींना सस्नेह नमस्कार.
अनेक वर्षांपासून काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानस होता.. तो पहिला कवितासंग्रह आज सत्यात उतरलेला आहे. माझ्या अल्पमतीला जे काही गुंफता आलं.. ते भगवंताच्या कृपेमुळे...'तोच पेरतो शब्द या मनाचिया गाभारी '
म्हणूनच हे 'कृष्णार्पित काव्यशिल्प '.
आणि आज आपणास ते सुपूर्त करताना मनस्वी आनंद होत आहे.
सामान्यपणे जीवन जगताना काहीतरी असामान्य बाब सुगंधी पुष्प होऊन पावलोपावली आपल्या वाटा सुगंधीत करत असते... आणि याची साधी चुणूकही आपल्याला नसते.
निरागस कळीप्रमाणे आपल्यात ती फुलत असते... असंच काहीसं झालेलं की काय...!
जन्मापासूनच अपंगत्व लाभलेलं.. मग काय... शक्यतोवर घरात बसूनच खेळ खेळत असे.. त्यातचं ३-४ वर्षाची असताना वाचता येत नव्हतं.. तरी पुस्तकांची आवड निर्माण केली ती आईवडीलांनी...मला अधिकाधिक मनाने सशक्त बनवून माझ्यातील उणिवेची जाणिव होऊ दिली नाही. खेळण्याऐवजी पुस्तकं मिळवून दिली. मलाही खूप आनंद व्हायचा. त्यातील कविता अगदी गोड व नवनवीन चाली लावून माझी आई म्हणायची. तसेच तिच्या पाठयक्रमांतील अनेक कविता ती गायची.. यातून कवितेवर प्रेम करायला तिने नकळत शिकवलं.
तिच्यासाठी माझ्या चार ओळी...
"आई तू प्रतिमा वीणाधारी शारदेची
तू तर सम्राज्ञी शब्दांच्या जगाची
वात्सल्यसिंधू अन् महामेरू आदर्शांची
शब्दांत तुला गुंफावे.. काय औकात माझी"
जेव्हा विधात्यालाही काही अनोखं करवून घ्यायचं असतं आपल्याकडून... तोच पेरत जातो पावलोपावली प्रेरणा..
"प्रेरणा ही एक अनोखी ऊर्जा
जी पालटून टाकते प्रतिभेचे जग
सकारात्मक विचार प्रसवतो नि
यशबिंब कवेत सहज येते मग"
भगवंताच्या कृपेविना का त्याची ओढ लागते? मन स्थिर करणं ही फार अवघड बाब आहे. मात्र विषयांचा संग सारुन ही वाट चालायची आहे. योग्य नि अयोग्याची जाणीव करून देणारी विवेकजागृती आवश्यक आहे.. त्याची सगुण साकार व निर्गुण रुपांतील गंमत... ह्या आणि अशा अनेक बाबी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भावार्थदिपिकेतून काही प्रमाणात या अल्पमतीला समजल्या. त्यांच्या शब्दांच्या गोडीची तुलना अगदी कशाशीही करता येणार नाही. हा कृपाप्रसादाच मला रचनेची प्रेरणा देत आहे शब्दांना समृद्धता प्रदान करत आहे.
कविता रचण्याचा पहिलावहिला प्रयत्न इयत्ता सहावीत जवाहर नवोदय विद्यालय वाशीम येथे असतानाचा... संगीत शिकवणाऱ्या आदरणीय माधुरी पुराणिक मॅम यांनी जीवन सप्तसुरांनी सजवले व त्यांचे स्वरचित गीत ऐकले... तेव्हा मी सुद्धा काही रचना करत गेले. पण त्या योग्य की अयोग्य... हे अनेक दिवस कळलेच नाही. अन् कुणाला दाखवण्याची हिंमत होत नव्हती.
तर आदरणीय शोभना देशमुख मॅम यांनी मायमराठीचा सखोल ज्ञान व गोडी सहजपणे निर्माण केली. सहज ओळी जुळताना नवनवीन शब्दफुलांनी माझी ओंजळ भरत गेली.
पुढे हा ओघ मंदावला.
मात्र वर्ष २००६ पासून मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड येथे शिक्षिका म्हणून रुजू झाले. अन् स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठीचा संघर्ष व विचारांची अनेक भांबावून टाकणारी वादळं शांत झाली. जीवनातील हे वळण आनंदासह एक प्रकारची स्थिरता प्राप्त करून देणारे होते.
कधी चारोळ्या, कधी बालकविता, विविध सामाजिक कविता , काव्यमय कोडी, गीतरचना संग्रहवेल वृद्धींगत होत होती. ती आज सुमारे ३५० आहे... त्यातून काही निवडक कविता या संग्रहात समावेशीत आहेत.
याच काळाच्या ओघात अनेक अमृतमयी उपलब्धी म्हणजे...
विविध समाज माध्यमांची कविता समुहाची हळूहळू सदस्य झाले. प्रतिलिपी व स्टोरीमिररवर लेखन तसेच सुद्धा सारख्या त्यांतील स्पर्धा व त्यांतून बक्षीसेही मिळाली.
२०१७ मध्ये राज्यस्तरीय काव्य संमेलन लातूर येथे निवडल्या गेलेल्या कवितेने जो सन्मान मिळवून दिला, तेव्हापासून आपण योग्य दिशेने जात आहोत, हा आत्मविश्वास निर्माण झाला.
सन २०१८ ला 'राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलन उमरगा, उस्मानाबाद', तसेच कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित संभाजीनगर,पंढरपूर अहमदनगर, इ. ठिकाणी आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय साहित्य तथा शिक्षण संमेलनात सादरीकरण, आनंदग्राम पाली, बीड तसेच पैठण येथे आ. सुरेखाताई येवले यांच्या नेतृत्वाखाली उपेक्षित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी घेतली गेलेली संमेलनं अनोख्या अनुभवाची भर घालणारा होता.
३०डिसें.२०१८ अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद अमरावती येथे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या १०७८ कवितांमधून पहिल्या शंभर कवितांमधे निवड होऊन सन्मानित झालेली मानाचा मुजरा ही मायमराठीसाठी कविता,
नागपूर येथे आ. माई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते प्राप्त झालेला सन्मान तसेच सन २०१९ चा मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्याकडून काव्यरत्न पुरस्कार,
प्रसिद्ध लेखक व कवी आ.द. ल. वारे सर यांच्या मैत्रा फाऊंडेशन बीड तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यसम्राज्ञी पुरस्कार,
२०२१चा अष्टपैलू साहित्य अकादमी, महा.राज्य मान्यता प्राप्त मुंबई (रजि.) यांचा काव्यरत्न पुरस्कार,
अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद व नंतर लातूर येथे सादरीकरणाची संधी ही अनोखी उपलब्धी होती.
विविध प्रातिनिधिक कवितासंग्रह तसेच
अनेक दैनिक, साप्ताहिक मासिके व दिवाळी अंकातही कवितांना स्थान मिळवून देणारे संपादक बंधुचेही मनापासून आभार.
समाज माध्यमाद्वारे आयोजित विविध स्पर्धांत सहभाग व अनेकदा लाभलेली सर्वोत्कृष्ट मानांकनं...
ATM साठी चार गीतांची रचना करण्याची प्रेरणा आ. विक्रमदादा आडसूळ यांचीच.
या सर्व बाबींतून यशासह नवीन बाबी शिकण्याचा वेगळाच आनंद मिळत आहे.
कवितांची एक अनोखी प्रेरणा म्हणजे माझे पती, श्री. श्रीकांत कुलट, खरंतर जे माझ्या कित्येक काव्य कलिकांच्या उमलण्याचे कारण अन् ओळींची गुंफण आहेत. जे प्रत्येकवेळी विविध संमेलनात सहभागी होण्यासाठी माझा उत्साह वाढवतात. तर स्वतःचा वेळ देऊन अनेकदा माझ्यासोबत हजर असतात.
प्रेरणेसह मायेचा ओलावा देणारी, साथीला सदैव तत्पर असणारी उत्कृष्ट कवयित्री व आदर्श शिक्षिका तसेच माझ्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी सतत आग्रही व मेहनत घेणारी माझी प्रिय सखी सविताताई ढाकणे...
सविताताईंशी ओळख झाली अन् आयुष्याचं नवं पान सुरू झालं... माझी सखी म्हणजे... खरंच सुन्न मनाच्या आकाशात चांदण्यांचा सडा...
तिच्या प्रेमळ सहवासातील प्रत्येक क्षण म्हणजे मोठ्या बहिणीसमान मार्गदर्शक, नवा अनुभव देणारा व निस्वार्थ भावनेने प्रेम करायला शिकवणारा होता. तिच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य उस्मानाबाद तसेच पुणे, नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर, पंढरपूर, बीड आणि अशा अनेक साहित्य संमेलनांना जाणं व भरभरुन त्या स्नेहभरल्या क्षणांचा आस्वाद घेतला.. जिल्हा बदलीमुळे जे आज फक्त या हृदयकुपीतली साठवण बनून राहिले आहेत.
ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ,मुलांच्या प्रगतीसाठी मनात प्रचंड वादळं घेऊन चालणारे व तितकेच सहज शांतपणे शिक्षकांचे प्रश्न सोडविणारे, खरंतर स्वतःतच एक ज्ञानपीठ असणारे आदरणीय श्री. प्रविणकुमार काळम पाटील साहेब...यांनी सतत योग्य दिशा दर्शनासह साहित्यप्रेरणा दिली. त्यामुळेच माझ्या विद्यार्थ्यांचा 'उमलत्या कलिका' प्रकाशित करु शकले.अन् आज माझाही. त्यांच्या प्रेरणेमुळेच विविध राज्यस्तरीय प्रशिक्षणांचा अनुभव घेऊ शकले.
अन् बीड जिल्ह्यामध्ये गेल्यावर प्रथमतः त्यांच्यावरच एक कविता रचली. पण एवढं महान व्यक्तिमत्व माझ्या शब्दांत पूर्णतः गुंफलं जाणं अशक्यच...
अन् पुन्हा एकदा तो थांबलेला कवितेचा प्रवास पुढे सुरु झाला.
पावलोपावली समृद्ध करणारे व्यक्ती म्हणू की निस्वार्थ मनाने उत्साह वाढणारे चालतेबोलते ज्ञानमळे...ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक आदरणीय डॉ.श्री. गोविंदजी नांदेडे साहेब.. यांनी माझ्या या सामन्य काव्यशिल्पास आपली प्रस्तावना देऊन नवी झळाळी प्राप्त करून दिली.
सप्रसिद्ध बालसाहित्यिक आदरणीय डॉ. श्री. विशालजी तायडे सर यांनी पाठराखण देऊन माझ्या शब्दांचा सन्मान केला आहे.
अनेक कलांमध्ये पारंगत व विद्याविभूषित, उत्कृष्ट वक्ते असे आदर्श व कृतीशील शिक्षक मा.श्री. धर्मराज करपे सर यांनी आपल्या सुंदर शब्दांत या काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या. याहून अधिक म्हणजे काव्यसंग्रह प्रकाशनाचे स्वप्न पूर्ण होत आहे ते आमचे (ATM) कृतीशील महाराष्ट्र समुहाचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय व आयसीटी पुरस्कार प्राप्त व आम्हा शिक्षकांसाठी ठायीठायी आदर्श असणारे शिक्षक श्री. विक्रमदादा आडसूळ सर व आदर्श शिक्षिका आ. ज्योतीताई बेलवले यांच्या प्रेरणेने.
माझ्या पहिली शाळा, मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड येथे शाळेतील सर्व सहकारी शिक्षक बांधव...
आ. श्री. घाडगे सर ज्यांनी प्रत्येक वेळी अनमोल मार्गदर्शन केले व
माझी 'मानाचा मुजरा मायमराठीला' ...ही कविता शाळेच्या कार्यालयावर लिहून माझ्या शब्दांचा फार मोठा सन्मान केला आहे. यापेक्षा मोठी भेट ती काय असावी?
लहान भावाप्रमाणे असणाऱ्या श्री.मस्के सर यांनी वेळोवेळी केलेल्या अध्यात्मिक मार्गदर्शन व श्री.जोगदंड सर यांच्या अनमोल सहकार्याने सतत समृद्ध होत राहिले.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व उत्कृष्ट कवी आ. श्री. फुंदे सरांनी सदैव माझा उत्साह वाढवला. तसेच आदर्श शिक्षिका सुवर्णा सुतार मॅम, उत्कृष्ट लेखिका व कवयित्री वैशाली शिंदे मॅम या मैत्रिणींच्या स्नेहसहवासात खूप काही शिकायला मिळाले.
सुप्रसिद्ध कवी आ. श्री. कैलास बोरकर सर तसेच गावातील लहानथोर मंडळी माझे चिमुकले विद्यार्थी या सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमाने जीवन पुलकित झाले आहे. आज त्या सर्वांपासून दूर असूनही त्यांच्या मायेचा ओलावा तसाच कायम आहे व राहील. जन्मभरासाठी ते स्फुर्तीदायी मायेचा ठेवा मला स्फुर्ती प्रदान करत राहिल हा मला विश्वास आहे. असे कितीतरी प्रेरक, प्रत्येक व्यक्तीचा उल्लेख नावानिशी करणे इथे शक्य नाही. मात्र सर्वांचे मनापासून आभार.
माझ्या सोबत इतके आशीर्वाद आहेत.. हे सर्व कल्पनातीत आहे. मग मी नक्कीच सामान्य नाही...असं नेहमी वाटतं.हा योगायोग नाही त्या विधात्याने या आशीर्वादित जीवनाची अनोखी भेट देऊन मला कृतकृत्य केले आहे.
म्हणून हे काव्यशिल्प त्या भगवंताचरणी अर्पण करते.
या सर्वांचे आभार मानायला मी खरंच निःशब्द आहे.
शिल्पा म. वाघमारे (कुलट)
सहशिक्षिका
अकोला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा