पाठराखण
मराठी भाषेला दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. अतिशय आशयघन कविता लिहीत शेकडो कवींनी मराठीचे काव्य दालन समृद्ध केलेले आहे. या परंपरेत नवनवीन कवी सातत्याने जोडले जात असतात. त्यातील काही ठळक नावं वाचकांच्या लक्षात राहतात. असंच मराठी काव्य प्रांतातील एक उदयोन्मुख नाव म्हणजे कवयित्री श्रीमती शिल्पा वाघमारे.
पेशाने प्राथमिक शिक्षिका असलेल्या शिल्पा वाघमारे यांनी आपल्या काव्य रचनांमधून मानवी मनाच्या संवेदना अचूक शब्दात रेखाटलेल्या आहेत. मानवी जीवन मूल्यांचा उद्घोष करणारी कविता त्यांनी लिहिलेली आहे. तसे पाहिले तर शिल्पाताईंच्या कवितेला विषयाचे बंधन नाही. तरीही त्यांची कविता ही प्रामुख्याने स्त्री जाणिवेतून आलेली दिसते. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे. तिच्या स्वातंत्र्यावर कसलेही बंधन असू नये, असा आग्रह त्यांची कविता धरते. कवयित्री म्हणते की,
'उंबरठ्याच्या बाहेर ये तू
ओलांडून निर्बंधाचे माप
मागे वळून पाहू नकोस
हात रोखणारे जरी अमाप.'
निसर्ग, अध्यात्म, मानवी नातेसंबंध, शिक्षण, समाजव्यवस्था, मानवी भावभावना इत्यादी विषयांवरही अगदी मोजक्या शब्दांमध्ये अतिशय संपन्न अशी कविता त्यांनी लिहिलेली आहे.
खरं तर काव्य निर्मिती करताना कवी स्वतःलाही उलगडून पाहत असतो. स्वतःचा आणि , सभोवतालचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याच्या काव्यरचनेतून होत असतो. कलावंताच्या आयुष्यात ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. प्रस्तुत संग्रहातही कवयित्री अगदी डोळसपणे आपला आणि आपल्या भोवतालचा मागोवा घेताना दिसते. आयुष्यातील बरे-वाईट अनुभव घेत असतानाच त्यांचा दृष्टिकोन हा पूर्णतः सकारात्मक असल्याचे शब्दा- शब्दातून दिसून येते, ही बाब महत्त्वाची आहे. आपल्या अल्पाक्षरी रचनांमधून मोठा आशय मांडण्याचं कसब शिल्पाताईंच्या लेखणीत असल्याचे दिसते. त्यांच्या हातून भविष्यातही अशीच साहित्य निर्मिती होत राहो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!
डॉ. विशाल तायडे
प्रादेशिक विद्या प्राधिकरण इंग्रजी विभाग प्रमुख, अनुवादक व सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, छत्रपती संभाजीनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा