कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, ११ जून, २०२३

🌹काव्यशुभेच्छा.. कृष्णार्पित काव्यशिल्प

शुभेच्छा 

आजच्या या समाजमाध्यमांच्या जगात अभिव्यक्ती सहज व सुलभ झाली आहे. आपल्या मनातील भावभावना  समाजमाध्यमे एक उत्तम विचारपीठ आहे. आज या समाजमाध्यमांवर आपल्याला लेख, कविता, गाणी इ. गोष्टी मुबलक प्रमाणात वाचायला मिळतात. यांतील अनेक कविता आपल्याला नकळत अंतर्मुख  करून जातात. कवयित्री शिल्पाताई वाघमारे (कुलट)  यांच्या अशाच मनाला अंतर्मुख करणाऱ्या कवितांची ओळख मला समाजमाध्यमांवरुनच झाली. या माध्यमांवर रोज एवढ्या प्रचंड प्रमाणावर कविता येत असताना शिल्पाताईच्या कवितांनी एक वेगळीच छाप कलारसिकांवर आहे. त्यांची काव्यप्रतिभा व त्यापाठीमागे असलेले त्यांचे संवेदनशील व सर्वसमावेशक चिंतन यामुळे त्यांची कविता सकस व दर्जेदार बनली आहे.

नुसते शब्दांचे इमले रचून उत्कृष्ट कविता रचली जात नाही. शब्दांना जेव्हा कृतीची व चिंतनाची बैठक असते, तेव्हाच कविता ही खऱ्या अर्थाने कविता असते. एक उपक्रमशील शिक्षिका, एक उत्कृष्ट वाचक, संवेदनशील मनाच्या व समाजभान असणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिल्पाताई आणि त्यामुळेच शिल्पाताईची कविता वाचकांच्या मनातील संवेदना जागी करते. त्यांची कविता मानवी मूल्यांवर असणारा त्यांचा विश्वास मांडते. या जगातील नकारात्मक रुढी परंपरांवर त्यांची कविता प्रहार करते हे जग फारच सुंदर आहे आणि याच सुंदर हेतूनं माणूस आपले जीवन सुंदरतेने जगू शकतो

हा की आशावाद त्यांच्या कवितेची प्रेरणा आहे.


आज त्यांच्या या कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन ATM समूहाच्या माध्यमातून होतो आहे , याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. 


ओलांडून उंबरठा ये बाहेरी 

सखे मुक्ताकाशी घे झेंप 

मळभ सार सारे अंतरीचे 

पुनः नोहे गं संधीची ही खेप... 


आपल्या 'सखी तू स्वयंसिद्धा' या कवितेत शिल्पाताईंनी सखी म्हणत... समस्त स्त्री वर्गाचे सामर्थ प्रभावीरीत्या मांडले आहे. हाच आशय व्यक्त करणाऱ्या 'पण'ती' व आदिशक्ती' या कविता आहेत. 'पण'ती" या कवितेतून त्यांनी एकीकडे नवरात्रीतून होणारी नारीशक्तीची उपासना तर दुसरीकडे समाजात वाढत चाललेल्या स्त्री भृणहत्येबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.


'नव्या युगाच्या उंबरठ्यावर', 'अखंड धागा हो' या कविता मानवी मुल्यांची गरज व्यक्त करतात. 'राममय मन', 'शिवतत्व' 'कृष्णकळी राधा' या कविता त्यांच्या मनातील भक्ती व अध्यात्माचा सुखद सुगंध रसिकांना देतात.


'साऊ तुझ्या लेकी आम्ही

 निडर आणि निष्ठावंत... 

अमृतस्पर्श तुझा लाभता 

युगायुगांची सरली भ्रांत...'


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या कवितेतून सावित्रीमाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्याची महती सुंदर शब्दांत मांडली आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुष व महामायिकांचे गुणगान शिल्पाताईंनी सुंदर शब्दांत गायले आहे. 'शूर संभाजी', 'गर्जा महाराष्ट्र माझा' वीररसातील कविता या महान व्यक्तिमत्वांना समर्पित आहेत.


'बंद कपाटातील पुस्तकाची आत्महत्या' ही कविता आजच्या मोबाईलवेड्या झालेल्या पिढीला वाचन संस्कृतीकडे पुन्हा वळविण्याचे आवाहन करते. 'हरवल्या चिऊची कहाणी' ,'तडका ताजेपणाचा,' असे यावे

वर्ष नवे', 'ध्यास शाश्वताचा', 'भय इथले संपत नाही' या कविता आशयसंपन्न व मनाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत.


खरेतर मी एक साहित्याचा एक सामान्य रसिक वाचक असताना या कवितासंग्रहाला मनःपूर्वक शुभेच्छा देण्याचा मान शिल्पाताईने मला दिला त्याबद्दल धन्यवाद मी त्यांचा आभारी आहे. यासाठी माझ्या शिक्षक भगिनी व उत्कृष्ट कवयित्री आदरणीय सविताताई ढाकणे यांनीही आग्रह केला, म्हणून हा प्रपंच!


आज लिहिते व वाचते शिक्षक दुर्मिळ होत चालले असताना शिल्पाताईसारख्या उपक्रमशील शिक्षिका आपल्या लेखनातून समाजाला नवे भान देण्याचे कार्य करत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. शिल्पाताई गेली १६ या वर्षे जिल्हा बदलीने अकोला जिल्ह्यात गेल्या याची खंत आम्हा सर्व बीडकरांना आहे. अनेक वर्षे आमच्या गेवराई तालुक्यातील शिक्षण व साहित्य, क्षेत्रात मोलाचे कार्य व सेवा शिल्पाताईनी दिली आहे. इथून पुढेही त्यांचे हे कार्य सुरु राहील व भावना सर्वांना प्रेरणा देत राहतील यात शंका नाही. ATM समुहाने त्यांच्या

'कृष्णार्पित काव्यशिल्प ' या काव्यसंग्रहाला प्रकाशित करून शिक्षक व मराठी रसिकांना हे राष्ट्रधन खुलं केल्याबद्दल ATM म्हणजेच 'कृतिशील शिक्षक महाराष्ट्र 'समुहाची कृतज्ञता व्यक्त करतो अन् समारोप करताना शिल्पाताईच्या 'आई-वात्सल्य सागर' या कवितेतील दोन ओळी उद्घृत करतो. 


'शिल्प' साकारले। तुझ्या स्पर्शामृते

प्राण तू फुंकले। पाषाणी या ।।


श्री. धर्मराज करपे

(आदर्श शिक्षक, साहित्यिक व उत्कृष्ट वक्ते) बीड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: