कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

रविवार, ११ जून, २०२३

प्रस्तावना.. कृष्णार्पित काव्यशिल्प

 'कृष्णार्पित काव्यशिल्प' हा अर्थ, आशय, संवेदना  आणि भावनेने भरलेला असा संपन्न काव्यसंग्रह आहे. मनाला हुरहूर लावणारा भूतकाळ यामध्ये अस्वस्थ करतो . कवयित्री शिल्पा वाघमारे यांनी प्रतिभेचे साकार रूप शब्दांशब्दात आकारास आणलेले आहे. कवयित्री आपल्या हळव्या मनाच्या आरस्पानी आरशात आपलाच भूतकाळ पाहून अस्वस्थ होतात.* 

  "भकास ती ओसरी

नि उजाड अंगण..

तुझ्याविना आला दिस 

जाई ग निघून ..."

 हरवल्या चिऊची कहाणी ऐकून रसिक हळवा होऊन त्या निरागस चिमणीची व्यथा मनाला लावून घेतो...

  कवयित्री आपल्या अनुभवाशी अत्यंत प्रामाणिक आहेत... जे जे पाहिले , भोगले , अनुभवले ते ते त्या शब्दांत गुंफून त्यावर भावनेचे गंधित शिंपण करतात... !

     कवयित्री जितकी हळवी आहे तितकीच ती सत्य शिव सुंदरासाठी आग्रही आणि हकदार आहेत.

"ओलाडून उंबरठा ये बाहेरी .. सखे मुक्ताकाशी घे झेप... 

मळभ सार सारे अंतरीचे... 

पुनः नोहे गं ही संधीची झेप..."

बंडखोर मन जेव्हा मुक्तीची आस मनी धरून आकाशात झेप घेण्याची बंडखोरी रक्तातून उसळू लागते..

"हाक ऐक सखे अंतरीची

बंधने व्यर्थ ती सारी तोड खुणावती तुज सुवर्णसंधी ... का ही आयुष्याशी तडजोड..."

अस्सल प्रतीची स्वत्वाची भूमिका कवयित्रींच्या शब्दशब्दात ओसंडून वाहत आहे...

शिल्पाताई एक प्रतिभाशाली वास्तववादी कवयित्री आहेत त्यांना सोंगाढोंगाचे राजकारण कधीच जमलेले नाही .. जे आहे ते आहे या सिद्धांताचा अस्सल शब्दानुभव आपल्या कवितेतून त्या प्रकाशित करतात..

   अलीकडील वीस वर्षांत नवोदित कवयित्रींच्या काव्याचा आई हा आत्मा आहे.. शिकल्या सवरल्या मुली आईच्या आदर्श शुचिर्भूत जीवनाला आपल्या शब्दांचा गंधभरला साक्षात्कार अर्पण करताना दिसत आहेत. शिल्पाताई ह्यांनी "आई वात्सल्य सागर" या  कवितेत आईचे महात्म्य सादर केलेले आहे.

 "विश्वाचे तू आर्त ।

वात्सल्य सागर ...

रीती मी घागर ।

तुझ्यापुढे..."

आई आकाशा एवढी असते. आणि तिच्यापुढे कन्या रीती घागर असते

आईच्या ममत्वाचे मोल विश्वात सर्वाधिक असल्याचे कवयित्री सांगून तिच्या हृदयात प्रेमाचे सागर असल्याचे कवयित्रींला वाटते...

कवयित्री निसर्ग पूजक आणि निसर्ग सौंदर्याची आसक्त आहे  ..

"भय इथले संपत नाही" या कवितेत कवयित्री म्हणतात...* 

डोळ्यातील आसवांना मिळेल का रे उसंत...

भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत ...ही अतिशय सुगम, सुंदर आणि सुलभ अशी कविता वाचताना वाचक शब्दांच्या गुंजनात गुंतून जातात.. अशी कविता कधी कधीच प्रसवते आणि जीवनाचे सार्थक होऊन जाते...पुढे कवयित्री म्हणतात...

'माजलेल्या दानवांचा , या भुईला भार झाला...'

'अधमांच्या निर्लज्जपणचा , कळस आज पार झाला.' 

अशा काही कविता अर्थ आणि अन्वयार्थाचा कळस गाठतात...* 

कवयित्रींच्या लेखणीला अग्निपंखांची धग आहे.*

"क्रांतीज्योती साऊ" हे शीर्षक मनाला खूप खूप भावते .. क्रांतीज्योति सावित्रीबाईंच्या महान कार्याला वाहिलेली अनुपम शब्दांजली म्हणजे ही कविता आहे.

"ज्योती कसली , ती धगधगती मशाल होती ज्ञान क्रांतीची... तमास हरविले असे तिने असे कीं आभा ही लाजली सूर्याची.." 

 अतिशय अलंकार प्रचुर काव्यरचना अलीकडे लुप्त होत असताना कवयित्रींच्या काव्यात रूपके, प्रतिमा आणि प्रतीके विपुल प्रमाणात रसिकांना  अनुभवायला मिळतात.

 कवयित्रींच्या काव्याला आणि साहित्याला अत्यंत सुंदर भविष्यकाळ आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिष्यांची गरज नाही... शिल्पाताई तुमच्या अनुपम, अद्वितीय काव्य प्रतिभेला हार्दिक शुभकामना आणि भविष्यात आपल्या कवितेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळण्याची अनिवार शक्यता मला शब्दाशब्दांत दिसते... आपण लेखन सातत्य ठेऊन काव्याराधना करत गेल्यास उद्याचे महाराष्ट्र सारस्वत तुम्हाला डोक्यावर घेऊन सन्मानित करेल या विश्वासासह आपणास मनःपूर्वक शुभेच्छा !

   डॉ. गोविंद नांदेडे

पुर्व शिक्षण संचालक, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: