कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ३० मे, २०२३

फक्त...

 भवसागराच्या तुफान लाटांतूनही

वाटलं होतं तरुन जावं...

इतकं मनसोक्त जगले की

फक्त वाटतं मरुन जावं


तूच तुझ्या नामाची देता 

मिळकत मी पण विरुन गेले

जिंकणं अजून काय असावं

तुझ्यात स्वतः मी हरुन गेले 


श्वास श्वास तुझ्या पायी अर्पूनही 

विश्वासाची शाश्वती नाही 

मायेच्या गुरफट्यात भोवळ

मळभ पांघरल्या दिशा दाही... 


तेचतेपण उदासवाणे

बेडी कर्माची जखडून आहे

कर्तव्याचा पथ सामोरी

बरेच काही रखडून आहे


बिनधास्त घेतलं जगून येथे... 

स्वारस्य आता उरले नाही 

ओंजळ भरलेली मोत्यांची

स्वप्न अजून विखुरले नाही 


जगतासाठी करीत मागणे 

तरी न पदरी काही पडले

दिवसामागून दिवस लोटता

पुन्हा गुंतले... जणू मंतरले


नाथा करी बा पाय मोकळा

कारा फसवी.... श्वास कोंडला

आता केवळ आस तूच रे

कान्हाई जा घेऊन मजला


तूज पायीची मी तर दासी

विलग अता मज नको करु

शेवटचे हे पायी मागणे

वाट पाही.. नको ना उशीर करु


©शिल्पा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: