कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

ती... मुक्तछंद

  ती.... 


हो.. हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतयं...

तीच ना ही जिच्या डोळ्यांत खूप काही साठतयं...


ती रान असते अखंड 

नवनिर्माण करणारी

ती खाण असते प्रेमाची

सदोदित गंधाळणारी


 ती आस कालचक्राचा  

तिच्याभोवतीच संसार फिरतो आहे

ती सारं सारं सोसत 

श्वास क्षणोक्षण वाहते आहे 


ती ती आहे अनुपम .. 

तिला तोडच नाही या भूवरी

विवेक असेल जागा तर... 

जाग ना आतातरी... 


काय  स्वार्थ घेऊन बसलात 

कुठे जायचं हा अहम् घेऊन 

मी पणा पुरे आता 

बघ जरा   शुद्ध प्रिती देऊन... 


ती फक्त आत खोलात 

वाट पाहत उभी आहे

नजरेला विश्वास दे

ती तुझ्यावाचून रिती आहे 


ती तुझ्यावाचून रिती..

पण.. पण तू शून्य आहेस तिच्यावाचून

पुरुषार्थ मिरवतोस खरा... 

मात्र तिचं श्रेय ठेवतोस लपवून... 


ती तुझ्याचसाठी आलेली

तुलाच सर्वांगी ल्यालेली 

कर्तव्याप्रती आहे क्षणोक्षण वाहिलेली

तरी अस्थिर, चिंतांनी झाकोळलेली


लाडकी होती लेक ती 

आज तुझी जीवनसंगीनी बनून साथ देणारी 

नकळत प्रसंगी आईही झाली तुझी अन् 

तुझ्यातच कधी बापही शोधणारी... 

 मात्र तुला कधी का हे जाणवले... ? 

तिला प्रेम  हवे... नकोच काही दुजे

दिसतेही.. पण ते उथळ... जे क्षणांत टिपते

 तुझ्या भूकेल्या डोळ्यांतून ...

जे तिजपुढे केवळ खुजे... 


उसवून जाते ती आतल्या आत

तिचचं मन तिला असतं खात

गुंतलेली असते प्रश्नांच्या चक्रव्यूहात

तरी हसरीच असते ना गालात...! 

प्रितीची आस केवळ एक तिला

अन् मलूल स्वप्न ऊरी बांधलेली

स्वप्न का मग तिची रे 

काळाने लोंढ्यात वाहून नेलेली

ती अबला नाही... 

नकोस खचवून टाकू तिला

विचार कर जरा.... 

अप्रत्यक्षपणे अबला बनवतोस 

तू तुझ्याही लेकीला... 


तू फक्त फक्त प्रेरणेची ज्योत हो...

 ती मशाल पेटून उठलली 

तू फक्त  विश्वास हो... 

ती आहेच तुला श्वास वाहून बसलेली...


रचना

© शिल्पा म वाघमारे

स शि मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: