विषय : तुझ्या माझ्या संसाराला
शीर्षक : प्रीतीचा हिंदोळा
नको नको आणिक काही, तुझ्या माझ्या संसाराला
झुलवी प्रीतीचा हिंदोळा, मोहना तुझ्या राधेला... ||धृ||
मनाचिया गाभारी मी, रुप तुझे सजवले
अंतरी नि बाहेरीही , भान सारे हरवले
प्रीतसरी नाहले मी, श्वास श्वास अर्पियला... ||१||
धाग्यावरी विश्वासाच्या, बंध विणले विणले
माझ्यातच प्राण तुझे, तुझ्यात मी सामावले
कोमला त्या बकुळीत , गंध जसा सामावला... ||२||
ओंजळीत भरलेली, तुझ्यासाठी गंधफुले
त्यागियली सुखे सारी, मीच मज वाहियले
खुळ्या तटिनीची आस, बांधलेली सागराला...||३||
तुझे स्पर्श, गंध मनी, असे भिनले विणले
गीत झाले आज ओठी , शब्द भिजले थिजले
दृष्ट माझीच न लागो, दान मागते देवाला... ||४||
रचना
शिल्पा म वाघमारे सहशिक्षिका बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा