शीर्षक- शिल्पकार जीवनाचे
कर्तव्याची बालकांस
करवून देती जाण
झिजवती स्वदेह जे
नित्य चंदनासमान... १
तिमीरात अज्ञानाच्या
कोंडलेले श्वास जरी
फुलवती कळ्या मृदू
मायेनेच मातेपरी...२
वाट सम्यक ज्ञानाची
जीवनात दावूनिया
जागवती आत्मज्ञान
यशबिंब साधावया...३
मळभास सारुनिया
दीप दिव्य स्वतेजाचा
भ्रांत जन्मांची विरवी
ज्ञानसूर्य अंतरीचा... ४
देवतुल्य गुरुजनांस
माझे त्रिवार वंदन
अल्पमती शब्दांस या
गुरु पियुषी शिंपण...५
शिल्पकार जीवनाचे
सजवले अंतर्मना
क्षण अमृतात न्हाले
कसे फेडावे या ऋणा...६
तिमीरातूनी तेजाकडे
वाट अवघी तेजाळली
'मी' पण लोपले हो
ज्ञानज्योत प्रकाशली... ७
रचना
©️ शिल्पा मनोहर वाघमारे (शिक्षिका)
मालेगाव खुर्द ता. गेवराई जि. बीड
दि. ३०.११.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा