सावली
प्रकाशी तू जाणवसी
एरवी तू लपलेली
माझ्या अस्तित्वाची सय
सावलीने जपलेली.....१
बेगडी हे जग सारे
आज आहे उद्या नाही
तूच साथी जन्मांतरी
जड देही सांधलेली.....२
सुख नभी शोधताना
दुःख ऊरी भोगताना
सखी काळजा समीप
केवळ तू लाभलेली.....३
घाव माझ्या प्राक्तनाचे
आवर्तन वेदनांचे
ओल खोल जखमांची
तुझ्या मनी साठलेली.....४
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका
मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि. ९.६.२०२०