मैत्रगंध
शब्द आज फूल झाले
ओंजळीत भरुनी आले
मैत्र सुखात नाहले
जणू माहेरी लेक झाले...१
सप्तसुरांत भिजले
ओठी ओले भाव झाले
झाले पाकळी मलूल
सुधा झाले, बरसले...२
कवितेच्या रसधारा झाले
मैत्रांगणी मंद वारा झाले
अंतरात दाटुनिया
मुक्त मधु प्रीत व्याले... ३
मन-मन विणलेले
क्षण-क्षण जपलेले
स्नेहरंग उधळता
एकबंध विणलेले...४
धरेसाठी जलबिंदू झाले
आसमंती तेच गंधाळले
जीवनाचा ग्रंथ होण्या
लेखणीची धार झाले...५
काळजाच्या पात्यावर
दवमोती खुललेले
वचनास जागावया
पुन्हा पुन्हा जन्मलेले...६
नयन कधी ओलावले
आशादीप मालवले
मैत्रगंध दरवळता
श्वास परतून आले... ७
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा