विषय :- जागतिकीकरण....
काव्यप्रकार :- मुक्तछंद...
स्पर्धेसाठी काव्यरचना
शीर्षक : परतूनी येशील का?...
निसर्गाच्या सुगंधात न्हाऊन, सात्विकतेचे लेणं लेऊन... हाताच्या अंतरावर असलेला यशानंद सोडून भरकटलास!. वेड्या, ...तेथील मखमली पायघड्या नि लखलखते दिवे कोणत्याही क्षणी उलटतील... राख करतील सारं ....डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोवरच....
एक पाय मोकळा करू पाहताना दुसरा पाय केव्हा गुंततो.. लक्षातही येत नसावं कदाचित्...
'आम्ही' तून बाहेर पडलेला 'मी' सहजतेतही कितीतरी वादळे निर्माण करतो... व्यर्थ असतात ती... पण तुझ्या नजरेला आता ती तशी जाणवत नाहीत...अहंभावाचे बस्तान ते ...पक्के असणारच..
शिखराला स्पर्शताना खुंटली रे उंची, खुजा दिसतोस अगदी ...अबोल पाखरांसमोरही....
ती नजरही हल्ली वरच भिरभिरते.... ही तर पैसा, प्रगतीची नशाच ... प्रगतीची जरी खरी नाहीच ज्ञात तुला परिभाषा...
रुक्ष वाऱ्यात गरगरताना.. पंख फुटल्याचा फक्त आभास...
हळवे तिचे सलज्ज भाव बेफाम उधळले, स्वैराचारी मदिरेत वाहिले... फॅशनेबल वसनांसह भय, आदर फक्त छाटले गेले...
नाहीच मारली हाक मदतीला तर बरंच असतं एकदाचं.... वेळ कुठंयं...? आधीच कंपनीत लाॅस झालाय यंदा...
एकसुरी कोरड्या ताना चिरताहेत.. काळीज... नको नको म्हणून ओरडूनही.. नाही काही होत चीज...
अंगापेक्षा बोंगा तो किती! फॅशनच्याच नावाकाठी
सर्जनशीलतेचं पार वाटोळं... प्रसिद्धीच्या क्षुद्र प्रकाशझोतासाठी...
तरी अथांग अशी हाव...
अन्
नोकर उपजणारी गिरणी झाल्यागत ज्यात शिक्षणाचं हरवलं गावं...
माय मराठी ताठली रे... तिच्या लेकरांची पाहत वाट
नवनिर्माणाचा आशादीप तेवत ठेवण्यासाठी फक्त ... जागतिकीकरणाची आली ही आसुरी लाट...
तसं अनेक शब्दांनी नटवली आपण ती.. उदारीकरण, खाजगीकरण.. नि काय काय....
नवकल्पनांकुर कापून बसलो आपण, चक्क आपल्याच लेकरांचे..
पांडित्य उसनं मिळत नाही हे जाणत असतानाही...
पिझ्झा बर्गर च्या चिकट मोहिनीने कधीचे ओढत नेले, भुलवले...
चाटच्या दोरखंडाने तर भररस्त्यात आणून बांधले...
चुलीवरचं भरीत भाकर... अजूनही खमंग आहे...
जमलंच तर परतूनी ये...
ती पक्षीण अजूनही आत - बाहेर करते आहे ...पिल्लाच्या ओढीनं...
हव्यासापोटी मुल्ये ऱ्हासली... लक्ष्य जाण, वेध जगण्याचा घे..
मृत्यूचे भय जर क्षणक्षण तुजला... विसर का रे मग जन्मांच्या पिंजऱ्यांचा?
ते वळण खुणावते आहे... फिर पाठमोरा... त्या आल्या पाऊलखुणा अजूनही स्पष्ट आहेत... परतीचा पथ होण्यासाठी...
रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा