कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, २५ जुलै, २०२०

गोंधळ पावसाचा की.....

गोंधळ पावसाचा की..... 

वाट्टेल तसा वाट्टेल तेव्हा
येत असतो पाऊस 
कुणाचीही पर्वा नसते
 मनासारखा बरसतो पाऊस
त्याच सारखं आपलं स्वतःच्या धुंदीत वागणं
बेफाम, बेछूट अविरत कधी
तर कधी रिमझिम..कधी टपटपणं
ऊन्हं आली तरी मागेच पळत लपंडाव खेळणारा... 
काही कळत नाही याचं वागणं... 
इथे काय गरज आहे कुणाची.. 
कुणाला नकोसाही वाटतो... 
म्हणून एकदा विचारावं म्हटलं.. 
मनातली सलच काढवी एकदाची.. 
पण तो काही बोलतच नव्हता
गाल फुगवून, तोंड वेडावून बसलेला नुसता... 
खूप विनवलं.. तेव्हा कुठे बोलला.. 
मला तर थोडा ताठलेलाच वाटला.. 
पण तो म्हणतो कसा तोऱ्याने... 
माझं तरी कुठं चुकतं?
गणित सारं तुमचंच तर हुकतं... 
तुम्ही वागता मनमौजी तेव्हा मात्र सगळंच जमतं... 
मी जरा अवेळी आलो तर मात्र तुमचं डोकंच फिरतं... 
का रे वागतायं वेड्यासारखं...? 
रान सारी सपाट केलीत.. 
पाखरं बघा ना कशी बेघर झाली... 
तुमचं वितभर भरल्यावरही
हाव तरी रे कशासाठी...? 
जीव तर अगणित येथे
का स्वार्थभार तू बांधलास पाठी..?
चक्र निसर्गाचे सारे
 मानवा बिघडले...असे काही 
पुर्ववत येण्याची मात्र आता श्वाश्वती नाही... 
तूच घालून घाव भवितव्याच्या दारावरी
जाब विचारतोस उलट कसा... हात ठेवून कमरेवरी

कळून चुकले होते सारे
पाऊस डोळ्यांतून होता वाहत... . 
लाज वाटली मलाच माझी
जरी नव्हते मजला आता साहत... 

रचना 
© शिल्पा म वाघमारे 
स शि बीड 
दि २५.०७.२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: