हरवली आजी...
मधाळ पाझर |जणू माय दुजी||
असते हो आजी | आम्हासाठी ||१||
स्पर्श सुसंस्कारी | लाभला मजला||
जन्म हा जाहला | धन्य-धन्य ||२||
रखरखलेला | तिचा कर गाली ||
टोचे बाल्यकाली | चरचर || ३||
आज आठवाने | ओघळती धारा ||
स्पर्श तो गहिरा | प्रेमभरा ||४||
आधार वाड्याचा | जणू की कोंदण ||
शितल चांदणं | शरदाचं ||५||
तेवती समई | मृदू मंद स्वर ||
कथेचे भांडार | आजी माझी ||६||
अनामिक ऊब | गोडी लाडवांची ||
ओवी हो जात्याची |अशी आजी ||७||
हरीनामी भिजे |ओटा तुळशीचा ||
नाद चैतन्याचा | घुमतसे ||८||
काव्य निमित्ताने | आसवे दाटली ||
मनी उमलली | आठवण ||९||
संकुचली मने | नाती विभागली ||
आजी हरवली | सापडे ना ||१०||
रचना
© शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि २४.०५.२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा