अतुल्य भारत
नभी तिरंगा आज पुन्हा हो डौलाने फडकला
क्रांतीकाळ तो नजरेपुढती जणू पुन्हा झळकला...||धृ||
आदर्शांची भूमी महान,माझा भारत देश
संत समागम याने पाहिले, विरले जेथे द्वेष
या मातीचा गंध जागवी.., माणसातील माणसाला... ||१||
मुकुटमणी शोभतो हिमालय, कंठमाळा गंगायमुना
सह्यविंध्य हे कडे कटीचे, सागर चरणार्पणा
अवकाशाच्या पटलावर, जय भारत स्वर गुंजला...||२||
क्रांती, शांती अन् समृद्धीचा, रंग एकीचा न्यारा
शान अनोखी असे तिरंगा, तो नयनीचा तारा
मध्य चक्र प्रेरणा गतीची..,अखंड देई विश्वाला...||३||
उंचावून भाल गर्वाने, मशाल पेटती ठेवा
अतुल्य अमोलिक संस्कृतीत, चीरबंधुत्वाचा ठेवा
गौरवान्वित भूमीच्या चरणी.., मस्तक नमवू चला...||४||
गीतरचना
©शिल्पा म वाघमारे
स शि जि प प्रा शाळा,
मालेगाव खुर्द ता गेवराई
जि बीड
भ्र क्र 9527054205
दि २८.१२.२०१९