तप्त उन्हाच्या झळा
जीवनाच्या विचारद्वंद्वांत
पिळवटून जातो जीव हा
प्रश्नांची उकल नसतेच कुठे
झळांत शिणतो जीव हा... १
तप्तता ही हाय अनोखी
पदोपदीच्या आव्हानांची
कुणा पुसावे कळेच ना मज
सरबत्ती अखंड संभ्रमाची... २
नकोच वाटे श्वासही पुढचा
त्यागुनी जीवन मुक्त विरावे
तप्त उन्हाच्या झळा नकोश्या
फक्त प्रभुचे नामचि ध्यावे... ३
शाश्वत आहे हरी चिरकाल
त्या चरणांतच शीतलछाया
मृगजळ जग हे जाणून घेई
निरंतर भुलवी तुज मोहमाया... ४
सांडूनी विकार, अहं मनीचा
पाशातून सोडवी स्वतःला
सोहम् म्हणूनी सोड बद्धता
स्वर्गच बघ येथे अवतरला... ५
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि १६.०४.२०२०