कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

असे जगावे की

असे जगावे की...

आयुष्य  प्रवास निरंतर
खडतर कधी, कधी सुखाचा
आयुष्य हा अखंड दीप
'मी' जाळून प्रकाश द्यायचा...१

आयुष्याची सांजरात
सत्कर्माच्या चांदण्यात न्हावी
प्रेरणा होऊनी नवयुगाची
गंधमाला श्वासांत दरवळावी...२

असे जगावे वृक्षांपरी
निरपेक्षता जागवूनी मनी
आसरा होऊनही कुणाचा
जा क्षणात तू विसरुनी...३

भेदावे भेद जे इथले
धरा साहे भार जशी
झोकून दे जीवननौका
झुंझण्यास वादळांशी... ४

दिलखोल कर तू प्रीती
जो यावा विरुन जावा
स्मित गाली सुधा मधूर
क्षण त्याचा भिजून जावा...५

ऊरी नकोच तर-तम व्याधी
ना क्षोभ, दंभ, वासना
हृदयगाभारी चैतन्य उरावे
असे धन्य करी  जीवना...६

तू निमिषातून अस्मानी
तूफानी भरारी घ्यावी
अथांग नभातून तुजवर
ताऱ्यांची उधळण व्हावी...७

काव्यरचना...
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि. १२.०२.२०